एकदां एरंडोलमध्यें एक प्रख्यात सतार वाजवणारा आला. त्याचे अनेक ठिकाणीं कार्यक्रम झाले. गुणा त्या सर्व कार्यक्रमांस जाई. तो वेडा झाला. त्याच्या आत्म्याला संगीताची भूक लागली. एके दिवशीं तो आपल्या पित्याला म्हणाला—
“बाबा, मला शिकवा ना संगीत. मला सतार, सारंगी शिकवा. त्याशिवाय मला चैन पडणार नाहीं. शिकवाल का बाबा?”
“बाळ, कोण शिकवणार?”
“बाबा, तो नजीरखां आल आहेना, तो येथें वर्ग काढणार आहे. पुरेसे विद्यार्थी मात्र मिळाले पाहिजेत. मी घालूं का त्या वर्गांत नांव?”
“सांगेन हो उद्यां.”
गुणा शाळेंत गेला होता. घरीं रामराव पत्नीला म्हणाले, “गुणा गायन-वादन शिकू म्हणतो. त्याला संगीताचें वंड लागलें असें दिसतें. घालूं का त्याला संगीताच्या वर्गात? महिन्याला दहा रुपये द्यावयाचे.”
“पण पैसे कोठें आहेत? अब्रूचे धिंडवडे व्हायची पाळी आली. आणि आतां कशाला हीं गाणीं-वाजवणीं. अशानेच तर हे दिवस आले. परंतु शेवटीं मी काय सांगणार? येतील ते दिवस मुकाट्यानें काढायचे एवढें आम्हांला माहीत. हल्लीं मी बाहेर कोठें जात नाहीं. कोठें जायचें? देवदर्शनास जाण्यातीहि लाज वाटते. हें फाटकें लुगडें नेसून जायला धीर नाहीं होत. माझें तुम्ही ऐका. आणखी कर्ज नको, नाहीं तर या घरांतूनहि जायची पाळी येईल. तुमचीं होतील गाणीं परंतु डोळ्यांना येईल पाणी. गुणाला काय, म्हणतो काहींतरी.”
रामरावांना वाईट वाटलें. ते वरतीं दिवाणखान्यांत एकटेच फिरत होते. त्या दिवाणखान्यांत एके काळीं हंड्याझुंबरें होतीं. पूर्वीच्या काळांत तेथें कितीतरी प्रसिद्ध गवई गाऊन गेले होते, वाजणारे वाजवून गेले होते. तेथील त्या खांबांतून संगीत घुमत असेल. तेथील अणुरेणु संगीताने भरलेला असेल. पूर्वजांच्या सा-या आठवणी रामरावांना आल्या. आपल्या गुणामध्यें या घरांत भरलेला संगीताचा आत्मा का प्रकट होत आहे? लोक सांगत कीं पूर्वी एरंडोलमध्यें जर कोणी गवई आला तर प्रथम ह्या वाड्यांत त्याचा जलसा होत असे. परंतु रामराव गरीब झाले होते. आतां त्यांना गवई, वाजवणारे यांचा सत्कार करतां येत नसे. परंतु गुणाच्या गुणांचें काय करावयाचें? त्या गुणांची का माती होऊं द्यायची! आपणांस हळूहळू वाईट दिवस येणार हे दिसतच आहे. अशा वेळेस एखादी कला जवळ असली तर बरी. आणि दु:खशोकाचा विसर पाडणारी संगीताहून थोर कला कोणती? गुणाला शिकवूं या सतार सारंगी. मग जरी झाडाखाली राहण्याची पाळी आली तरी गुणा सारंगी वाजवील व दु:खाचा विसर पाडील. गुणाला मला इस्टेट ठेवता येणार नाहीं. सा-या घरादाराचें, शेतीवाडीचें लिलांव होईल. परंतु गुणाला एक स्वर्गीय कला शिकवून ठेवूं दे. ती कला त्याच्याजवळून कोण नेईल? ती गहाण टाकतां येणार नाहीं. तिचें लिलांव करतां येणार नाहीं. ती स्वत:ला रिझवील, जगाला रिझवील.