भावजयीचे वर्तन पाहून बहिणीला वाईट वाटते. आपल्या भावाला वैनी बोलते हे पाहून बहीण कष्टी होते :

गोर्‍ये भावजयी           नको बोलू एकामेकी
हळुवार भाईराया            चंद्र कोमेजेल एकाकी ॥
गोर्‍ये भावजयी           किती उर्मट बोलणें
मन दुखवीलें                 माझ्या भावाचें कोवळें ॥
गोर्‍ये भावजयी           किती बोल रागाचे
फूल कोमजलें               देवा शिवशंकराचें ॥
गोर्‍ये भावजयी          किती बोल अहंतेचे
फूल कोमेजलें                भाईराय ममतेचें ॥

वैनी उभ्या उभ्या कुंकू लावते. नीट बसून प्रेमाने सौभाग्यतिलक लावीत नाही. कपाळीच्या कुंकवाची सुध्दा वैनी अशी हयगय करते हे पाहून बहिणीचे हृदय चरकते. ती म्हणते :   

वैनीबाई भावजये        नको उभ्याने कुंकू लावू
नवसाचा माझा भाऊ             किती सांगूं ॥

घरी दोन दिवस बहिणी आलेल्या. भावाला वाटते कौतुक करावे. परंतु त्याच्या पत्‍नीला राग येतो. बहिणी कशाला लुटायला आल्या असे ती म्हणते :

भाऊ ग म्हणती            आल्या बहिणी भेटीला
भावजया ग म्हणती                आल्या नणंदा लुटीला ॥
भाऊ ग म्हणती            बहिणीला द्यावा पाट
भावजया ग म्हणती                धरा नणंदा आपुली वाट ॥

बहिणी मनी म्हणतात, “आपण वैनीपासून अपेक्षा तरी का करावी ? किती झाले तरी परक्या घरून ती आलेली :”

माउलीची माया               काय करील भावजयी
पाण्यावीण जाईजुई                       सुकतील ॥
आईबापांच्या राज्यांत       खाल्या दुधावरल्या साई
भावजयांच्या राज्यांत                  ताक घेण्या सत्ता नाहीं ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel