परंतु शेवटचा शेजीचा उपदेश ऐका :

शेजीला पुसतो            माउली कां बोले ना
दुखविशी तिच्या मना            घडीघडी ॥
शेजी मला सांगा            आईचा जावा राग
चरणी तिच्या लाग            भक्तिभावें ॥

तुकाराममहाराजांनी पाय धरण्याचा सार्वभौम उपाय सांगितला आहे.

तुका म्हणे कळ । पाय धरल्या न चळे बळ ।

लहान मुलाला आईचा लळा अधिक असतो. त्याला आई प्रेमळ वाटते, बाबा कठोर वाटतात. परंतु पित्याच्या वरकरणी कठोरपणात मुलाचे हितच साठवलेले असते. आईबापांची तुलना ज्यात आहे, त्या ओव्या किती मार्मिक आहेत :

बाप्पाजी चंदन            घासलीया वास
आईचा सुवास                आपोआप ॥
बाप्पाजी भास्कर            माउली चंद्रमा
बाळाला वाटे प्रेमा            माउलीचा ॥

किती गोड ओव्या.

लहान मुलाला जर आई नसेल तर कोण घेणार त्याची काळजी ?

कोमल रोपाला            काय नको पाणी
नको का जननी                तान्हेबाळा ॥

या पुढील ओव्या वाचा व नाचा :

माउली असावी            रानीच्या पांखराला
चोंचीने त्याला चारा            भरवीते ॥
माउली असावी            गोठयांच्या वांसराला
आंग चाटायला                पान्हावोनी ॥

आई मुलांसाठी किती कष्ट काढते. तिचे उपकार कसे फिटणार ?

माउलीचे कष्ट            कुठे रे फेडूं देवा
तळहाताचा पाळणा            नेत्रीचा केला दिवा ॥
बापाचे उपकार            फिटती काशी गेल्या
आईचे उपकार                फिटती ना काहीं केल्या ॥

कितीही भाग्य जवळ असले, परंतु जर बाळ जवळ नसेल तर मातेला ते विष आहे, वमनवत् आहे. मुलाशिवाय स्वर्गात राहण्याऐवजी मुलासंगे ती रस्त्याच्या कडेला उभी राहील व त्यात स्वर्ग मानील. मातेचे हे थोर उद्‍गार
ऐका व मान लववा :

धन ग संपदा            आग लागो त्या वस्तेला
माझ्या बाळाच्या ग संगे            उभी राहीन रस्त्याला ॥


आणखी एक मधुरतम व सहृदय ओवी पहा :

नदी वाहे झुळझुळ        परी पाण्यावीण मासा
जीव माझा तोळामासा            बाळावीण ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel