सासरी किती सुख असले तरी माहेरची आठवण यावयाचीच. माहेरच्या वर्णनाच्या ओव्या अति सहृदय आहेत. आई म्हणते :

माहेरा आलीस             रहावे चार मास
येऊं दे थोडे मांस             अंगावरी ॥

आईला मुलगी सुकून गेलेली दिसायची. माहेराहून कोणी येईल याची सासुरवाशीण वाट पहात असते :

पाऊस पाण्याची            धरणी माय वाट पाहे
तशी मला आस आहे             माहेराची ॥

माहेरचा रस्ता कितीही वाईट असला तरी तो मृदू वाटतो. सासरचा कितीही चांगला असला तरी वाईट असतो :

माहेरच्या वाटे             मऊ गार हरीक दाटे
सासरच्या वाटे                 टोंचती कुचकुच काटे ॥

हरिकाचे गवत थंडगार व मऊ असते. माहेरी गेल्यावर आई म्हणते, “दुधावरची साय घे, कलमी आंबा खा, लौकर उठू नको, नीज अजून.” परंतु माहेरीही ती कामे करते.

जाईन माहेरा             बाप्पाजींच्या घरा
घुसळीन डेरा                 अमृताचा ॥

माहेरी भावाजवळ गोष्टी सांगते, आईच्या हाताचे गोड जेवण जेवते. माहेरचे पाणीही अमृतासारखे वाटते :

जेवण मी जेवी             जेवण जेवत्यें पोळीचे
पाणी माहेरच्या गांवीचें             गोड लागे ॥

माहेरी गेल्यावर तिला जणू पवित्र तीर्थक्षेत्री आल्यासारखे वाटते.

बाप तो ईश्वर             मायबाई काशी
नंदी आहे पायापाशी             भाईराया ॥

शेजारीणबाईसंबंधीच्या ओव्याही मोठया समर्पक व गोड आहेत. पुष्कळसे सुखदु:ख शेजारी माणसे कशी असतात यावर अवलंबून असते. माहेराहून आलेली, सासरी कोण ओळखीचे नाही. अशा वेळेस शेजारीण बाई जर चांगली असली तर किती आधार वाटतो :

शेजारिणी बाई             तुझा शेजार चांगला
नाही मला आठवला             मायबाप ॥
शेजारिणी बाई             धन्य तुझ्या शेजाराची
सय नाही माहेराची             बारा वर्षे ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel