नंदीग्रामी राही सदा रामनाम जपे
तपश्चर्या घोर तपे भरत बंधु ६१
धन्य रे भरता धन्य रे तूं भाऊ
तुझी कीर्ति राहू चिरंजीव ६२
धन्य रे भरता धन्य रे तुझें मन
तुझ्या स्मरणें लोचन भरून येती ६३
धन्य रे भरता धन्य रे तुझी भक्ती
आलेलें राज्य हाती सोडिले तूं ६४
धन्य रे भरता धन्य रे तुझी निष्ठा
आलेलें राज्य हाता सोडियेलें ६५
राम चाले रथी लक्षुमण चाले पायी
एवढया पृथ्वीवर असा बंधु झाला नाही ६६
राम चाले वाटे लक्षुमण झाडी खडे
असे बंधू झाले थोडे पृथ्वीवर ६७
राम चाले वाटे लक्षुमण झाडी कांटे
असे बंधु नाही कोठें संसारांत ६८
राम चाले वाटे लक्षुमण झाडी पाला
असा बंधू नाही झाला भूमंडळी ६९
राम चाले वाटे लक्षुमण झाडी माती
असे बंधू झाले किती कोणी सांगा ! ७०
राम सीता वनी लक्षुमण फळें आणी
असा बंधू त्रिभुवनी भाग्यें भेटे ७१
रामकुंडावरी हिरवा मंडप जाईचा
आंघोळीला आला पुत्र कौसल्याबाईचा ७२
रामाच्या आंघोळीला पाणी नाही विसाणाला
अमृताचे झरे लाविले ग पाषाणाला ७३
रामकुंडावरी रामरायाची आंघोळी
सांवळी सीताबाई तेथें काढीते रांगोळी ७४
रामकुंडावरी रामराया संध्या करी
सांवळी सीताबाई अमृताने तांब्या भरी ७५
रामकुंडावरी रामरायाची आरती
सभामंडपात हात जोडून मारुती ७६
रामकुंडावरी कुंवारणीची झाली दाटी
परकर-चोळ्या वाटी सीताबाई ७७
रामकुंडावरी ब्राह्मणांची झाली दाटी
धोतरजोडे वाटी रामराया ७८
रामकुंडावरी सवाष्णींची झाली दाटी
हळदीकुंकू वांटी सीतादेवी ७९
रामकुंडावरी रामरायाची बिछाई
तेथें पाय चेपी सांवळी सीताबाई ८०