द्रौपदी चतुर्भुज होताच सारे आश्चर्यचकित होऊन टकमक पाहू लागतात. द्रौपदी मग नाना प्रकारचे पदार्थ वाढते. सारे जेवून उठतात. द्रौपदी शेण लावून थकलेल्या कृष्णाला वाढते. देवाला ती साधे लोणचे आणते :

राजसूय यज्ञी             द्रौपदी वाढी लोणचें
कृष्णाचे पान कोणचे             विचारीते

कृष्णाची द्रौपदीवर फार प्रीती. सख्ख्या बहिणीवर त्याची प्रीती कमी आणि द्रौपदीही म्हणते : “कृष्ण माझा कोणी नाही. तरी खरी माया त्याचीच माझ्यावर.”

द्रौपदीमाई म्हणे         नव्हे माझा सख्खा भाऊ
मायेचा कृष्णनाथ             किती त्याची वाट पाहूं

द्रौपदीवर तो केवढा कठीण प्रसंग ! दुर्योधन तिला उघडी करू पाहतो. परंतु देव लाज राखतो. अनंत रंगांची वस्त्रे भराभरा आतून निघतात. शेवटी दुष्ट दमतो :

वस्त्रे फेडुनिया             पापी चांडाळ दमला
कैवारी कृष्ण झाला         द्रौपदीचा

कृष्ण व द्रौपदीचे हे प्रसंग बहारीने वर्णिले आहेत.

अभिमन्यू बाळाच्याही ओव्या सुंदर आहेत.

चक्रव्यूही शिरें             पुत्र प्रतापी पार्थाचा
भाचा प्रत्यक्ष कृष्णाचा             अभिमन्यू

अभिमन्यू बाळ             सिंहाचें ग पिलुं
लागले सारे पळुं             कौरवांचे

शेवटी रणांगणात तो सिंहाचा छावा मरून पडतो. तोंडाने गोविंदनाम तो जपत असतो :

गोविंद गोविंद             मंजुळ मुखी वाचा
पति पडे उत्तरेचा             रणांगणी

याच प्रकरणात नारदांच्या वर्णनाच्याही ओव्या आहेत. हे शब्दचित्र पाहा :

कळीचा नारद             उभारीतो शेंडी
वीणा तो काखुंडी             शोभे सदा

या प्रकरणात शेवटी तुळसादेवीच्या ओव्या घातल्या आहेत. तुळस म्हणजे पवित्र वस्तू. मरताना तोंडात तुळशीपत्र ठेवून देवाघरी जायचे. तुळशीला पाणी घातल्याशिवाय बायका जेवत नाहीत. रानावनातील तुळस परंतु प्रेमाने तिला अंगणात जागा दिली :

तुळशी ग बाई             जन्म तुझा रानीवनी
बैस अंगणात                 जागा देते वृंदावनी

तुळशीच्या पवित्र झाडाला माता पाणी घालीत असते. त्या वेळेस माता कशी दिसते :

तुळशीला पाणी घाली         तुळशी खाली बसे
प्रत्यक्ष गंगा दिसे             मायबाई

गरीब बायका म्हणतात : “आम्हां कोठली काशीयात्रा ? अंगणातील तुळशीचे दर्शन हेच काशीदर्शन.”

काशी काशी म्हणून         लोक जाती ग धावत
काशी माझ्या अंगणात             तुळसादेवी
काशी काशी म्हणून         लोक जाती दुरी
काशी माझ्या घरी             तुळसादेवी

बाहेर सायंकाळ व्हावी, दिवा लावून तुळशीला दाखवावा, तुळशीला हात जोडावे.

संध्याकाळ झाली         वाजले ते सात
तुळशीला हात                 जोडीयेले

भगिनी निवेदिता देवींना अशा प्रसंगांची चित्रे किती सुंदर काढता येतील असे नेहमी वाटत असे.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel