बायका भांडी शक्यतो स्वच्छ ठेवतात. परंतु पुष्कळशी भांडी जरी बाहेरून स्वच्छ दिसली तरी आत काळी असतात. ह्या अनुभवामुळे स्त्रिया म्हणतात :

वरूनी आरशाचें             आंत परी भांडे काळें
सर्वच जीवांचें                 आंत बाहेर निराळें

जो अंतर्बाह्य एकरूप आहे. असा क्वचितच एखादा महात्मा दुनियेत असतो.

संसारात कोणी सुखी होईल का ? सर्वांचे मनोरथ पुरतात का ? या जगात समाधान शेवटी मनात निर्मावे लागते. अभ्यासाने समाधान प्राप्त होते :

संसारी मानावें             लागतें समाधान
सगळे मनींचे                 होईना कधी पूर्ण

आणि या दोन ओव्या पहा :

पिकतात केस             गळते बत्तीशी
वासना राक्षसी                 जैशीतैशी
पांढुरके केस             परि वासना हिरव्या
कळेना कोणाला             त्या कैशा जिरवाव्या

मनुष्य म्हातारा होतो, नाक लोंबू लागते, दृष्टी कमी होते, केस पिकतात; परंतु वासना नेहमी तरुणच असते. वासना नेहमी हिरवीगारच असते. आयुष्याचा क्षय होत आला तरी माणसाला माकडे बनविणार्‍या स्वैर वासना अक्षयच असतात !

तारूण्य अंगात मुसमुसत असते तेव्हा मनुष्य ऐटीने चालतो. त्याला सारे जग क:पदार्थ वाटते. परंतु पुढे हे यौवन गेले म्हणजे तोंडाभोवती माश्या घोंघावू लागतात. तारुण्यात तरुणींच्या भोवती युवजनांची फुलपाखरे नाचत असतात. परंतु ते सौंदर्य गेले की कोण राहतो जवळ ?

नवतीची नार             नार चाले दणादणा
नवती गेली निघून             माश्या करीती भणाभणा

किती सुंदर आहे ओवी ! शब्द कसे समर्पक आहेत !

आणि गर्जना करणार्‍या समुद्राला एक स्त्री काय म्हणते ऐका :

समुद्रा रे बापा             किती करीशी बढाई
नाही पाण्याला गोडी             तिळमात्र

इंग्रजी कवी कोलेरिज् याने समुद्राचे वर्णन करताना म्हटले आहे :

Water, water everywhere
Not a drop to drink

सर्वत्र पाणीच पाणी, परंतु तोंडात एक थेंब घालण्याची सोय नाही. काय करायचे ते अपार पाणी ? एखाद्या माणसाजवळ खूप संपत्ती असते. परंतु त्यांतील दिडकीही कोणाच्या कामी येत नसते ! तो ऐट मिरवितो, मी श्रीमंत म्हणून तोरा मिरवतो. परंतु त्याच्या त्या मोठेपणाचा जगाला काय उपयोग ?

आणि शेवटी एक ओवी देऊन हा रसपरिचय संपवितो :

गोड बाळपण         गेले बागडोनी
पांखरांच्यावाणी             सदोदित

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel