मग घरातल्या पडवीत बसूनच मुले खेळतात. पागोळ्या पडत असतात. त्यांच्याखाली मुले हात धरतात :
पाऊस पडतो पागोळ्या पाणी गळे
माणीक दारीं खेळे उषाताई
कोकणात कधी कधी सारखी आठवडा आठवडा संततधार लागते. सूर्यदर्शन होत नाही :
पाऊस पडतो पडतो सारखा
सूर्य झालासे पारखा चार दिवस
कधी कधी पर्जन्य येतो, त्या वेळेस विजांचा चमचमाट होतो. कडाड कडाड आवाज होतो. धरणीमायेचा पती पर्जन्य वाजतगाजत येतो :
झाडें झडाडती विजा कडाडती
धरणी माये तुझा पति येत आहे
लहान मुले असा कडकडाट व गडगडाट होऊ लागला म्हणजे भितात. आई त्यांना कुशीत घेऊन निजवते :
मेघ गरजतो पाऊस वर्षतो
कुशींत निजतो तान्हेबाळ
पावसाळ्याचे असे मनोहर वर्णन आहे. तसेच थंडीचेही आहे. फार थंडी पडलेली असली म्हणजे फुलांच्या कळ्या नीट फुलत नाहीत. त्या आखडून जातात:
थंडी पडे भारी फुलती ना कळ्या
आखडून गेल्या झाडावर
थंडी इतकी पडली की पाणी अगदी गारगार झाले. आकाशातील तारेही थंडीने थरथरू लागले :
थंडी पडे भारी तारे थरारती
करी तूं गुरंगुटी तान्हे बाळा
थंडी पडलेली असली म्हणजे ताटात किंवा शेगडीत निखारे घेऊन म्हातारी माणसे घरात शेकत बसतात :
थंडी आज भारी ताटी निखारे भरून
देऊं शेकाया नेऊन बाप्पाजींना
परंतु स्त्रियांनी उन्हाळ्याचे वर्णन केले आहे ते आता ऐका. ऊन इतके पडले आहे की दगडसुध्दा फुटून त्यांच्या लाह्या होतील :
दुपारचें ऊन दगडाच्या झाल्या लाह्या
तोंड कोमेजे देसाया भाईराया