कोणी बांधली ही पर्वती ? तिचे सोन्याचे कळस कोणी केले ?
पर्वती पर्वती तिला कळस सोन्याचे
प्रिय दैवत पेशव्यांचे नवें झालें
आणि ती तुळशीबाग !
चला जाऊं पाहूं तुळशीबागेचा सांवळा
नित्य पोषाक पिवळा रामरायाचा
मैत्रिणी जमलेल्या असाव्यात; आपल्या गावाहून त्या आलेल्या असतात. कोणी वाईची, कोणी पुण्याची, कोणी सातार्याची, कोणी कोल्हापूरची. मग आपापल्या गावाची बढाई त्या सांगतात. वाईवाली म्हणते:
काय सांगूं बाई वाई देशाची बढाई
तटाखालून कृष्णाबाई वाहतसे
काय सांगूं बाई वाई देशाची रचना
हिरे जडले सिंहासना कृष्णाबाईच्या
पुणे झाले जुनें वाईला बारा पेठा
सवाई झेंडा मोठा कृष्णाबाईचा
परंतु सातारकरीण काय म्हणते ऐका:
पुणे झाले जुनें सातारा नित्य नवा
जलमंदिराची हवा चला घेऊं
सातार्याजवळ समर्थांचा सज्जनगड, ती माहुली, तेथील ती कुत्र्याची समाधी, तेथील अहिल्याबाईने बांधलेले मंदिर ! सातार्याची सर कोणाला येईल ?
परंतु कोल्हापूरची म्हणते :
पुण्याची थोरवी सातारा नुरवी
सर्वांना हारवी कोल्हापूर
आणि इंद्रायणीच्या तीरावरची आळंदी!
आळंदीला जावें जीवें जीवन्मुक्त व्हावें
तेथे श्री ज्ञानदेवे दिव्य केले
तसेच देहू गाव; ही गोड ओवी ऐका:
देहूला जाऊन देह विसरावा
अंतरी स्मराचा तुकाराम