तुझ्या अंगाला माती लागली कीतिचा पवित्र पंढरपुरचा बुक्का होतो. तुझ्या अंगाला माती लागली की ती पृथ्वीमोल कस्तुरी होते. लहान मुलांचे याहून कौतुक जगाच्या वाड्.मयात क्वचितच कोठे केलेले असेल ? ज्या मातांनी हे अमर वाड्.मय अज्ञान राहून, जगासाठी म्हणून नव्हे, बाजारात मांडण्यासाठी म्हणून नव्हे, तर स्वत:च्या आनंदासाठी सहज निर्मिले व घरोघर दरवळून ठेवले, त्यांना कोण भक्तिभावाने व निरहंकारपणे प्रणाम करणार नाही ?
लहान बाळ उठतो लवकर परंतु रात्री झोपत नाही लौकर. सकाळी सूर्य वर आला, पाखरे किलबिल करू लागली, फुले फुलली की उठलाच राजा :
पांखरे उडती फुलतात फुले
उठतात मुले उजाडत ॥
सूर्य उगवला कमळें फुलली
बाळें उघडिली निजदृष्टी ॥
आईला सकाळी कामधंदा, म्हणून ती त्याला नीज म्हणते :
झोंप रे अजून कशाला उठसी
कोणी म्हणेल आळशी म्हणून का ॥
परंतु रात्री मात्र लौकर झोपत नाही :
झाली आता रात्र झोंप म्हणे आई
चंद्र कां वर येई माउलीये ॥
झाली आतां रात्र झोंप रे माझ्या तान्ह्या
नाचती चांदण्या माउलीये ॥
चंद्र झोपत नाही, चांदण्या चमचम करीत आहेत. मग मीच का झोपावे अशी शंका हा लबाड घेतो. आईला अनेक प्रश्न विचारतो. संध्याकाळ झाली म्हणजे कोल्हे कुई करू लागतात. कोकणात तर अगदी घराजवळ ही कोल्हेकुई ऐकू येते. बाळ विचारतो, “आई, का ग हे कोल्हे ओरडतात ?”
कोल्हे-कुईकुई कां ग आई सांग मशी ॥
थंडी पडेल ही भारी बाळ घ्यावा म्हणती कुशी ॥
किती सहृदय उत्तर. “आज थंडी पडेल, बाळाला कुशीत घ्या” असे कोल्हे सांगत आहेत असे मातेला वाटते. बाळ विचारतो, “आई, हे हजारो काजवे झाडांवर का लुकलुक करतात ?” आईचे उत्तर वाचा व नाचा :
कां ग झाडांवर आई काजवे नाचती
तुला ओवाळती झाडेमाडे ॥
वनदेवता बाळाला जणू हजारो नीरांजने लावून ओवाळीत आहे ! आणखी कल्पना पहा :
काजवे फुलले फुलले लाखलाख
पहाया श्रीमुख तान्हेंबाळाचें ॥
वनदेवतांचें काजवे जणुं डोळे
बघाया माझें बाळ त्यांनी रात्री उघडीले ॥
आकाशात हे तारे का ग चमचम करतात ? या बाळाच्या प्रश्नाला आई उत्तर देते :
आकाशांत तारे काय आई म्हणताती
तुझी राजा स्तोत्रें गाती अखंडीत ॥
आकाशांत तारे त्यांचे ओठ कां हालती
संगात गाणी गाती तुला बाळा ॥
तारे थरथरत असतात. त्यावर त्यांचे ओठ हलत आहेत, ते गाणी गात आहेत, तुझी स्तोत्रे गात आहेत. अशीही मनोहर उत्प्रेक्षा केलेली आहे :
थुई थुई उडे कां ग कारंजे उसळे
तुझ्यामुळे उचंबळे तान्हेबाळा ॥
चंद्राला पाहून समुद्र उचंबळतो. परंतु माझ्या बाळाचा मुखचंद्र पाहून दगडी कारंजीही उचंबळली व सारखी उडू लागली !
बाळाचे प्रश्न कधी कधी निराळेच असतात. बायका नवर्यासाठी गादी घालतील. परंतु स्वत:साठी साधेच अंथरूण करतात. बाळ विचारतो.
आई गादी कोणा साधे अंथरूण कोणा
गादी तुझ्या जन्मदात्या साधे मला माझ्या तान्ह्या ॥
गादीवर आपण निजूं बाप्पाजी निजो खाली
वेडा कुठला म्हणे आई हळूच थापट मारी गाली ॥