पाऊस पडतो विजांचा चमचमाट
धरणीमाता हिरवा थाट मांडीतसे २१
मेघ गडगडे कडाडते वीज
कुशीमध्यें नीज तान्हे बाळा २२
झाडें झडाडती वीज कडाडती
धरणीमाये तुझा पति येत आहे २३
मेघ गरजतो पाऊस वर्षतो
कुशींत निजतो तान्हे बाळ २४
पाऊस थांबेना राऊळी कशी जाऊं
त्रिदळ कसें वाहू शंकराला २५
पाऊस थांबेना देऊळी कशी जाऊं
बाळाला कशी नेऊं कडेवरी २६
पाऊस थांबेना पांखरें गारठली
आईच्या पदराखाली तान्हे बाळ २७
पाणी पाणी झालें साऱ्या अंगणांत
नको जाऊं तू पाण्यात तान्हे बाळ २८
येईल पडसें पाण्यात नको जाऊं
घरांत खेळ पाहूं गोपूबाळा २९
येईल पडसे पाण्यांत नको नाचूं
मायेला नको जाचूं तान्हे बाळा ३०
पावसाच्या मारें जणूं डोंगर वांकले
हिरव्या रुमालें झाकलें त्यांनी तोंड ३१
पाऊस पडतो पडतो थुईथुई
भिजल्या जाईजुई विठ्ठलाच्या ३२
पाऊस पडतो पडतो कोंडाकोंडा
भिजला राज्यगोंडा विठ्ठलाचा ३३
पाऊस पडतो पडतो भिरिभिरी
भिजली अब्दागिरी विठ्ठलाची ३४
पाऊस पडतो भरले नद्या नाले
भाई माझे अडकले पैलतीरा ३५
पाऊस पडतो नद्यांना आलें पाणी
देवा सुखरूप आणी भाईराया ३६
थंडी पडे भारी पाठींत निघती कळा
कुशींत तान्हे बाळा गाई करी ३७
थंडी पडे भारी पाणी झाले जसें कालें
निजली तान्हीं बाळें कुशीमध्यें ३८
थंडे पडे भारी फुलती ना कळ्या
आंखडून गेल्या झाडावर ३९
थंडी आज भारी ताटी निखारे भरून
देऊं शेकाया नेऊन बाप्पाजींना ४०