देवाच्या देऊळी उभी मी जागत्ये
आयुष्य मागत्यें चुडे्यांना २२१
माझे हे की चुडे वज्री घडवीले
साक्ष ठेवीयेले चंद्रसूर्य २२२
माझे हे कीं चुडे बत्तीस बंदांचे
तेतीस कोटी देवाजींचे आशीर्वाद २२३
चुडे्यांच्या बळे न भीं कवणाला
लंकेच्या रावणाला देईन जाप २२४
माझे चुडे्यांचे सोने आहे सुरतेचें
वडिलांच्या पारखींचे दादारायांच्या २२५
माझे चुडे्यांचे सोने बरफीची वडी
पारख्यांना शालजोडी बाप्पाजींना २२६
सासुरवाशिणीचे तोंड दिसे हंसतमुख
तिला भ्रताराचे सुख उषाताईला २२७
गळ्यांत मंगळसूत्र गळा दिसे तालेदार
कंथ तुझा सुभेदार उषाताई २२८
काळी गळेसरी देवानें मला दिली
भूषणासाठी केली सोनीयाची २२९
आमच्या वैनीबाई गंगाबाई कोठें गेल्या
उन्हाने कोमेजल्या जाईजुई २३०
भोळा कीं भ्रतार माझ्या उषा ग बाईचा
तिनें पिंपळ दारींचा पूजीयेला २३१
शेजी देई फूल सखी घालीना केसांत
आपल्या कंथाच्या नेऊन देतसे हातांत २३२
शेजी देई फूल सजवाया वेणी
नेऊन देतसे निज कंथाला कामिनी २३३
कंथ ग रुसला कशाने समजावावा
हाताने विडा द्यावा उषाताई २३४
भ्रताराचा राग दुधासारखा ऊतूं गेला
हंसूनी शांत केला उषाताईनें २३५
तोंडात तोंड घाली राघूची लाल चोंच
आवडीची मैना तूंच उषाताई २३६
तोंडात तोंड घाली उषाबाई चेडी
आली राघवाची उडी दादारायांची २३७
दादाराया घोड्यावर वयनीबाई माडीवरी
तेथून खुणा करी विड्यासाठी २३८
तांबडे पागोटे बांधीतो सोडीतो
राणी खुणावीतो दादाराया २३९
माडीखालीं माडी माडी खालीं झरा
तेथें तोंड धुतो हिरा उषाताईचा २४०