मंदिरांत पुन्हा एकदां एक महोत्सव चालला होता. पुन्हा हा देवाचा खलिफा तेथें आकस्मात् गेला. या वेळेस त्याच्या हातांत मातीचा एक नवा खुजा होता. 'प्रार्थना बंद करून माझ्या पाठोपाठ या' असें तो त्यांना म्हणाला. नंतर तो खुजा एकाद्या झेंड्याप्रमाणें हातांत उंच धरून तो बाहेर पडला. तें मडकें उंच धरून शहरांतील सारी घाण जेथें नेऊन टाकीत असत तेथें तो गेला. त्याच्याभोंवतीं आतां चांगलीच गर्दी जमली. त्या कचर्याच्या ढिगार्याजवळ तो गेला. त्यानें तें मडकें तेथें फोडलें व त्याचे तुकडे त्यानें त्या कचर्यांत फेंकले. नंतर लोकांकडे तोंड करून तो म्हणाला, ''याप्रमाणें तुमचे, तुमच्या या शहराचे मी तुकडे तुकडे करीन.''
शांतताभंग करणारा, अव्यवस्थित वागणारा म्हणून त्याला अटक करण्यांत आली. घोड्याच्या चाबकानें त्याला फटके मारण्यांत आले. रात्रभर त्याला खोडा देण्यांत आला.
सकाळीं त्याला सोडून देण्यात आलें. सुटल्याबरोबर पुन्हा तो लोकांसमोर उभा राहिला. ती शापवाणी त्यानें पुन्हा उच्चारिली. सर्वांना विस्मय वाटला. त्या पागल प्रेषितांची ती बंडखोरी, तो आडदांडपणा, ती नि:शंक, निर्भय स्पष्टोक्ति थांबविण्याचा उपाय त्यांना सांपडेना.
याच सुमारास उत्तरेकडून इजिप्त व दक्षिणेकडून बाबिलोन पॅलेस्टाइनचा चुराडा उडविण्यासाठीं तयारी करीत होते. जात्याच्या दोन तळ्यांच्यामध्यें मूठभर दाण्यांचा चुरा व्हावा तसें पॅलेस्टाइनचें होणार होतें. जेरुसलेमच्या गादीवर या वेळेस झेडेका हा राजा होता. तो मागील राजाप्रमाणें नव्हता. झेडेका शांतिप्रिय होता. परंतु तो दुबळ्या मनाचा होता. सल्लागार जो जो सल्ला देतील तसा तो वागे. नवे सल्लागार आले तर पुन्हा निराळा विचार. त्याला स्वत:चें निश्चित असें मतच जणूं नव्हतें. पॅलेस्टाइन या वेळेस नांवाला का होईना परंतु बाबिलोनच्या अधिसत्तेखालीं होतें. बाबिलोनचें हें जूं कांहीं फार जड नव्हतें. जेरुसलेममधील कांही चळवळ्यांनीं बाबिलोनच्या राजाविरुध्द बंड पुकारावें असें राजाला सुचविलें. परंतु ही गोष्ट होऊं नये म्हणून जेरिमियानें आकाश-पाताळ एक केलें. तो पुरतेपणीं जाणत होता, कीं बंड होतांच बाबिलोनचा राजा जेरुसलेमला वेढा घालील. त्या वेढ्यांत जेरुसलेम टिकाव धरणार नाहीं ही गोष्टहि स्पष्ट होती. कोंकरानें सिंहाशीं झुंजावें तसा तो प्रकार झाला असता. जेरुसलेममधले उतावळे लोक बंडासाठीं फार मोठी किंमत द्यायला तयार होते. ते स्वत:चे प्राण द्यावयास तयार होते. इतकेंच नव्हे, तर स्वत:च्या बायकामुलांचेंहि बलिदान करावयास ते सिध्द होते. जेरुसलेम शहराचें केवळ स्मशान झालेलें जेरिमियाच्या प्रखर कल्पनाशक्तिस दिसत होतें. सर्वत्र प्रेतांचे खच पडले आहेत, तरुण स्त्रियांची विटंबना होत आहे, मुलें पाण्याचा घोट मिळावा, भाकरीचा तुकडा मिळावा म्हणून दीनवाणीं हिंडत आहेत, तहानलेले कुत्रे धन्यांचे रक्त चाटीत आहेत, रस्त्यावर मृतांची व मृत प्राण्यांचीं शरीरें राशीवारीं पडलीं आहेत, असें हें भीषण दृश्य जेरिमिया कल्पनाचक्षूनें पहात होता. त्या काळांतील वेढा म्हणजे काय वस्तु असे तें जेरिमिया ओळखून होता. म्हणून स्वत:चें सारें वक्तृत्व उपयोगीं आणून त्या बंडाविरुध्द तो प्रचार करीत होता. जेरिमिया म्हणाला, ''बाबिलोनच्या राजाला सोन्याची खंडणीं देणें पत्करलें, परंतु रणदेवतेला रक्ताचा नैवेद्य देणें नको.''