ऑगस्टसमागून टायबेरियस गादीवर आला. त्यानें इ.स. १४ ते ३७ पर्यंत राज्य केलें. रोमनांच्या मानानें तो कांही फार वाईट नव्हता. त्याला 'दारूडा टायबेरियस' म्हणत. जरा अधिक कठोरपणें लिहिणारे इतिहासकार त्याच्या बाबतींत म्हणतात, 'तो दारू व रक्त पिऊन मस्त असे.' त्यानें कांही रक्त सांडलें हें खरें. 'पण त्या काळाच्या मानानें त्यानें सांडलेलें रक्त फार होतें असें मात्र म्हणतां येणार नाहीं.' इतर सम्राटांप्रमाणें त्यानेंहि अनेकांना फांशीं दिलें. दुसर्यांना मारण्यांत त्याला आनंद वाटे. पण तुलना केली असतां त्यानें कमी बळी घेतले असेंच म्हणावें लागेल. आयुष्याचा बराचसा भाग त्यानें कॅप्रि बेटावर घालविला. हें बेट समुद्रसपाटीपासून एक हजार फूट उंच होतें. ज्यांच्यावर त्याची खप्पा मर्जी होई त्यांना तो तेथील टेकड्यांवरून समुद्रात लोटी व तें दृश्य मजेनें पाही. आपला मुख्य प्रधान सेजानस याच्या लहान मुलीला त्यानें ठार केलें. हीच त्यानें केलेल्यांपैकीं सर्वांत जास्त दुष्टपणाची व नीचपणाची गोष्ट होय. तो प्रधानहि त्या वेळीं मारला गेला. त्या लहान मुलीनें विचारलें, 'येवढ्याशा लहान वयांत मीं असें काय पाप केलें आहे कीं, त्यासाठीं तुम्हीं मला ठार मारावें ?' पण सम्राटाचा शब्द म्हणजे कायदा होता. अर्थातच तिला उत्तर कोण देणार ? तिला तुरुंगांत नेऊन गळा दाबून ठार मारण्यांत आलें !
तरीहि टायबेरियस हा प्राचीन सम्राटांतला कमींत कमी दुष्ट सम्राट् होता. तो मेल्यावर कॅलिगुला सम्राट् झाला. त्यानें इ.स. ३७ ते इ.स. ४१ पर्यंत म्हणजे फक्त चार वर्षे राज्य केलें ; पण या चारच वर्षांत त्यानें अनंत क्रूर कर्मे केलीं. त्यानें स्वत:च्या तीन बहिणींवर बलात्कार केला ! करमणूक म्हणून तो माणसें ठार करी ! एकदां सर्कशीच्या रंगणांतील हिंस्त्र पशूंना पुरेंसें अन्न नव्हतें म्हणून त्यानें त्यांच्यासमोर कैद्यांची रांगच्या रांग उभी करून त्यांना पोटभर जेवण दिलें ! कधीं कधीं मेजवानीच्या वेळीं मेजवानीचाच एक गंमतीचा भाग म्हणून तो आपल्या समोर लोकांना फांशी देववी ! तरवारीच्या एकाच घावासरशी डोकें उडविलेलें पाहण्यांत त्याला विशेष आनंद होत असे. त्यानें एकदां दोघां कॉन्सल्सना घरीं जेवणास बोलाविलें होतें. तो एकदम खो खो करून हंसूं लागला तेव्हां त्या कॉन्सल्सनीं नम्रतेनें विचारलें, 'हंसण्याचें कारण काय ?' त्यावर त्यानें उत्तर दिलें, 'डोक्यांशिवाय तुम्हां दोघांचीं धडें कशीं दिसतील असा विचार मनांत आल्यामुळें मला एकदम हंसूं आलें.'
त्यानें खुनाच्या कलेंत पारंगत व्हावयाचें ठरविलें व तें शिक्षण पुरें घेतलें. लॅटिन इतिहासकार सुएटोनियस लिहितो, ''बलिदानार्थ काढलेल्यांच्या वेदना कशा वाढतील, त्या बराच वेळ कशा टिकतील. हें तो नेहमीं पाहत असे. तो सांगत असे, 'असे घाव घाला कीं, आपण मरत असल्याची जाणीव त्या मरणाच्या मुखीं पडणार्यास नीट व्हावी ; एक घाव नि दोन तुकडे असें करूं नका.''
ज्युपीटर देव आपणाशीं नेहमीं बोलत असतो असें तो म्हणे. रस्त्यांतून तो आपला एक कान जरा उंच करून चाले व पुटपुटत चाले. जणूं काय देवाशींच आपलें संभाषण चाललें आहे असें तो भासवी. चंद्राला तो आपली बायको म्हणे. त्यानें आपल्या एका घोड्याला चंद्राचा उपाध्याय म्हणून नेमलें होतें. थोडक्यांत सांगावयाचें तर तो वेडा होता. त्याच्यांत राम नव्हता. त्याच्या या दुष्ट लहरी नष्ट होतील अशी आशा नव्हती. ज्यूलियसपासून नीरोपर्यंत सारेचे सीझर वेडे होते. त्यांची वेडेपणाची लहर जणूं आनुवंशिक होती ! रोमनांनीं कॅलिगुलाचे हे वेडेचार चार वर्षे सहन केले. नंतर मात्र त्यांनी त्याला ठार केलें ! पुढचा सम्राट् कॅलिगुलाचा चुलता क्लॉडियस यानें इ.स. ४१ ते इ.स. ५४ पर्यंत राज्य केलें. तो रोगट, नेभळट, असंस्कृत व किळसवाणा माणूस होता. हंसतानां तो तोंडानें एक विशिष्ट आवाज करी, बोलतांना अडखळे, रागावला कीं एकाद्या मूर्खाप्रमाणें वाटेल तसे हातवारे करी. स्वत:च्या मूर्खपणाच्या करमणुकीसाठीं त्यानें सार्या रोमचें जणूं सर्कशींत परिवर्तन केलें ! रोमन लोक त्याच्याकडे सर्कशींतला एक विदूषक या नात्यानेंच पाहत. त्याला प्रजेविषयीं प्रेम नव्हतें व प्रजेलाहि त्याच्याबद्दल आदर नव्हता.