तो स्वत:च्या प्राणांविषयीं जसा बेफिकीर होता, तसाच इतरांच्याहि प्राणांविषयीं बेपर्वा होता. त्याचा एक आवडता शिपाई आजारी पडला व वैद्याच्या सल्ल्याप्रमाणें न वागल्यामुळें मेला. पण अलेक्झांडरनें 'या वैद्यानें माझा शिपाई मारला' असें म्हणून त्या वैद्याला क्रॉसवर चढविलें ! तरीहि त्याचें मित्रवियोगाचें दु:ख कमी होईना तेव्हां त्याचा विसर पडावा म्हणून तो अकस्मात् एका शहरावर चालून गेला व त्यानें तेथील सर्व नागरिकांची कत्तल करून त्यांचा आपल्या मृत मित्राला बळी दिला. शत्रूकडील सेनापति त्याच्या हांती पडत तेव्हां त्यांना कधीं कधीं तो अत्यंत उदारपणें वागवी, तर कधीं कधीं जवळच्या झाडावर फांशीं देई. अलेक्झांडरची स्वारी कशी वागेल हें त्या त्या प्रसंगीं त्याची जी लहर असेल तीवर अवलंबून असे. एकाद्याला ठार करावें असें त्याच्या मनानें घेतलें कीं तो स्वत:च आरोप करणारा, न्याय देणारा व न्यायाची अमलबजावणी करणारा म्हणजे ठार मारणारा बने. शत्रूंना छळण्यासाठीं नवनव्या क्लुप्त्या शोधून काढण्यांतहि त्याचें डोकें कमी चालत असे असें नाहीं. प्ल्युटार्क म्हणतो, ''एकदां दोन झाडें वांकवून त्यांच्यामध्यें त्यानें एका कैद्याला बांधविलें व मग मुद्दाम वांकवून भिडविलेलीं तीं झाडें एकदम सोडून देण्याचा हुकूम केला. तसें करतांच तीं झाडें इतक्या वेगानें आपल्या मूळ स्थितीप्रत गेलीं कीं, त्या दुर्दैवी कैद्याचे उभे दोन तुकडे झाले व प्रत्येक झाडानें त्याचें अर्धे अर्धे रक्तबंबाळ शरीर उचलून वर नेलें व जणूं विजयाची ढाल म्हणून मिरविलें !
त्या कैद्याचा अशा राक्षसी छळणुकीनें वध केल्यावर अलेक्झांडर होमर वाचीत पडला ! त्याच्या बहुमूल्य वस्तूंत होमरच्या काव्यांची एक सुंदर प्रत सदैव असे. इलियडमधील युध्दप्रसंग वाचणें आपणांस फार आवडतें असें तो म्हणे. इलियडमधील समर-वर्णनें वाचूनच तो युध्दप्रिय बनला होता. विजयध्वजा सर्वत्र मिरवावी, अजिंक्य म्हणून सर्वत्र गाजावें असें त्याला त्यामुळेंच वाटूं लागलें होते. होमरच्या काव्यांनींच त्याला समर-स्फूर्ति दिली होती.
- ६ -
तो लढत नसे किंवा होमरहि वाचीत नसे तेव्हां तो दारू पिऊन पडत असे. रणांगणावरील पराक्रम असोत किंवा दुसरीं दुष्कृत्ये अथवा व्यसनें असोत, तो सर्वच बाबतींत इतरांवर ताण करी. जेथें जाऊं तेथें आपण बिनजोड असलों पहिजे असेंच जणूं तो म्हणे ! सामान्य लोकांइतपत अतिरेक त्यास पसंत पडत नसे. त्याचा अतिरेक अमर्याद, अतुल असे. तो पिऊं लागला कीं पिपेंच्या पिपें रिकामीं करी आणि मग दारूच्या धुंदींत एकाद्या मत्त देवाप्रमाणें वाटेल तें करीत सुटे. एकादां तो एक मेजवानी देत असतां एका वेश्येचा सन्मान करीत होता ; नशा केलेली ती रमणी त्याला म्हणाली, ''इराणी राजाच्या राजवाड्याला आग लावा.'' आणि त्यानें आग लावली !