हे दोन्हीं व्हेनिशियन व्यापारी त्याच्या दरबारीं आले. कुब्लाईला ते आवडले. निकोलो मोठा हुषार पण जरा काळसर रंगाचा होता. तो हिर्‍यांचा तद्वतच तरवारींचा पारखी होता. त्याचा भाऊ मफ्फेओ उंच व धिप्पाड होता. त्याची दाढी लाल रंगाची होती. तो घोड्यांचा तद्वतच स्त्रियांचाहि पारखी होता. त्या दोघांचाहि असंस्कृत व रंगेल स्वभाव, वाटेल तेव्हां देवाशपथ म्हणण्याची त्यांची संवय व मोकळी वृत्ति पाहून सम्राटाला गंमत वाटली. त्यानें त्यांच्याशीं व्यापारी चर्चा केली, तीवरून ते चांगलेच हुषार आहेत असे त्याला आढळून आलें. त्यानें त्यांच्याशीं धर्म व राजकारण यांचीहि चर्चा केली, तेव्हा त्या बाबतींत मात्र ते मूर्ख व अडाणी असल्याचें दिसून आलें. दोघांनींहि सम्राटाला ख्रिश्चन करण्याची पराकाष्ठा केली. सार्‍याच मोंगोलियनांना ख्रिश्चन करावें अशी पोपची इच्छा होती. कुब्लाईखान त्या दोघांना म्हणाला, ''आपण काय बोलतों हें ज्याला नीट समजतें असा कोणी ख्रिश्चन धर्मी आला तर त्याच्याशीं मी चर्चा करीन व ख्रिश्चन धर्म काय आहे तें पाहीन. म्हणून तुम्ही पोपकडे परत जा व ख्रिश्चन धर्माचे शंभर उपदेशक इकडे पाठवायला त्याला सांगा. ते सुसंस्कृत, सर्व ललितकलांशीं परिचित व नीट वादविवादकुशल असावें. सर्व मूर्तिपूजकांस तद्वतच इतरांसहि ख्रिस्ताचा कायदाच सर्वोत्कृष्ट आहे हें त्यांना पटवून देतां आलें पाहिजे.

निकोलो व मफ्फेओ पोपकडे जाण्यास निघाले. पण ते युरोपला पोंचण्यापूर्वीच पोप मेला होता व कॅथॉलिक चर्चमध्यें मतभेद माजले होते; त्यामुळें दोन वर्षेपर्यंत नवीन पोपचीहि निवड झालीच नव्हती. चिनी सम्राटाची इच्छा ऐकतांच नव्या पोपनें शंभर सुसंस्कृत धर्म-तज्ज्ञ पाठविण्याऐवजीं साधु डॉमिनीक यानें स्थापलेल्या संप्रदायांतील दोन मूर्ख डोमिनिकन पाठविले. साधु डॉमिनिक हा स्पेनमधला सेंट फ्रॅन्सिसचा समकालीन संत होता. सेंट डॉमिनिक याचा खाक्या सेंट फ्रॅन्सिसपेक्षा अगदीं निराळा होता. तो लढाऊ वृत्तीचा होता, संकुचित ख्रिश्चन धर्माचा पुत्र होता. जिभेनें लोकांना एकादी गोष्ट पटवून देतां येत नसे तेव्हां तो तरवार हातीं घेई. तो एकदां नास्तिकांना म्हणाला, ''तुम्ही ख्रिश्चन धर्मांत आपण होऊन न याल तर तुम्हांला त्यांत हांकून नेण्यांत येईल. किती तरी वर्षे मी तुम्हांला उपदेश करीत आहें, गोड शब्दांनीं सांगत आहें, तुमची मनधरणी करीत आहें, डोळ्यांत पाणी आणून तुमचें मन वळवूं पाहत आहें. आमच्या स्पॅनिश भाषेंत म्हण आहे कीं जेथें गोड शब्दांनीं काम होत नाहीं, तेथें ठोसे यशस्वी होतात; आशीर्वाद विफल झाले तरी आघात मात्र सफल होतात. अर्थात् आम्ही आमचे राजे, महांराजे पोप, धर्मगुरू, सारे तुमच्याविरुध्द उठवूं. ते फौजा घेऊन तुमच्या देशावर चालून येतील व प्रार्थना निरुपयोगी ठरल्या तेथें प्रहार विजयी होतील.''

अशा वृत्तीचे ते दोन डोमिनिकन ख्रिश्चन वीर निकोलो व मफ्फेओ यांच्या बरोबर कुब्लाईला 'ख्रिस्ताचा धर्म कन्फ्यूशियसच्या धर्मापेक्षां श्रेष्ठ आहे' हें पटवून देण्यासाठीं आले. त्या दोघांप्रमाणेंच आपला मुलगा मार्को यालाहि निकोलोनें आपल्याबरोबर आणलें होतें. मार्को ऐन उमेदींत होता. त्याला धर्माची आवड होती तशीच व्यापाराचीहि हौस होती. त्याला बरोबर नेलें तर कुब्लाई चांगला ख्रिश्चन होईल, मार्कोहि चांगला व्यापारी होईल व चर्चच्या फायद्याप्रमाणें स्वत:चा स्वार्थहि साधेल असें निकोलो व मफ्फेओ या दोघांनाहि वाटलें.

या वेळेस ते व्हेनिसपासून चीनपर्यंत खुष्कीनें गेले. हा प्रवास दीर्घ, कठिण आणि धोक्याचा होता. पर्वत ओलांडावयाचे, वाळवंट उल्लंघावयाचीं, याला कंटाळून ते दोघे मिशनरी परत गेले; पण मार्को, त्याचे वडील व त्याचे चुलते हे तिघे मात्र संकटांस न जुमानतां पुढें पुढें चालले, ते जेरुसलेम येथें थांबले व तेथील ख्रिस्ताच्या समाधीपुढील नंदादीपांतील तेल त्यांनीं बरोबर घेतलें. कारण, त्या तेलानें सारे रोग बरे होतात. अशी समजूत होती. त्या मोंगोलियन सम्राटाचा हृदयपालट करावयाला आपल्यापाशीं धर्मोपदेशक नसले तरी निदान हें तेल तरी आहे अशी आशा तर त्यांना होतीच,

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel