तसेंच बुध्दांची आत्यंतिक अहिंसाहि त्याच्याजवळ नव्हती.  अपकाराची फेड उपकारानें करावी, द्वेषाला प्रेमानें जिंकावें, अहंकारासमोर नम्रता घ्यावी, असा संदेश त्यानें कधीं दिला नाहीं.  एका गालावर मारलें तर दुसरा गाल पुढें करावा असें त्याचें मत नव्हतें.  हें मत त्याला शहाणपणाचें वाटलें नाहीं.  ''शत्रुबरोबर न्यायानें वागा व मित्राबरोबर प्रेमानें वागा'' असा त्याचा दूरदर्शी उपदेश आहे.  शत्रूबरोबर न्यायानें वागा, परंतु त्याच्यावरहि प्रेम करून त्याला चिडवूं नका.  अशानें तो शत्रु अधिकच रागावेल.  'मला लाजवतां काय ?' असें तो म्हणेल.  आगींत तेल ओतल्याप्रमाणें तें होईल.  दुसर्‍यानें इजा केली असतां त्याचा सूड घेऊं पहाणें हें पशुवृत्तीचें द्योतक आहे.  परंतु त्याची क्षमा करणें हेंहि मूर्खपणाचें आहे.  एकंदर गोष्टीचा नीट विवेकानें निर्णय करा व तदनुसार वागा.  शत्रूचे हक्कहि सांभाळा व स्वत:ची प्रतिष्ठाहि सांभाळा.  आपल्या अन्यायी शेजार्‍यांशी वागण्याचा सुसंस्कृत माणसाचा हाच एक मार्ग आहे.

एकदां त्याच्या शिष्यांनीं त्याला विचारलें, ''एका शब्दांत तुमच्या शिकवणीचें सार सांगा.'' कन्फ्यूशियस म्हणाला, ''जशास तसें.'' शिष्य म्हणाले, ''याचा अर्थ अधिक स्पष्ट करा.'' तो म्हणाला, ''जें तुम्ही स्वत:च्या बाबतींत करूं इच्छिणार नाहीं तें दुसर्‍यांच्या बाबतींत करूं नका.''

कन्फ्यूशियसनें जो हा सुवर्णनियम सांगितला तोच पांचशें वर्षांनीं पुढें ख्रिस्तानेंहि सांगितला.  परंतु दोघांचेंहि म्हणणें त्यांच्या समकालीनांनीं ऐकलें नाहीं.  समकालीन जनतेनें दोघांचीहि उपेक्षाच केली.

त्याचे अखेरचे दिवस दु:खाचे होते.  त्याचे प्रिय शिष्य मरण पावले.  पत्नीशीं काडीमोड करूनहि तिच्यावर तो प्रेम करी.  तीही मेली.  त्याचा एकुलता एक मुलगाहि वारला.  तो म्हणाला, ''आतां मीहि जाणें बरें.  माझीहि वेळ आतां आलीच आहे.''

तो अत्यंत दारिद्र्यांत निवर्तला.  त्याचें वय बहात्तर वर्षांचें होतें.  त्याचे हेतू विफल झाले होते.  त्याची स्वप्नें धुळीस मिळालीं होतीं.  मानवावरचा त्याचा विश्वास ढांसळला होता. फारच थोड्या लोकांनीं त्याचे शब्द हृदयाशीं धरले.  आणि जे त्याच्या शिकवणीप्रमाणें वागत त्यांचा छळ होई.  आरंभीं ख्रिश्चनांचा त्यांच्या क्रांतिकारक जहाल मतांबद्दल जसा छळ झाला तसाच कन्फ्यूशियसच्या शिष्यांचाहि झाला.  एका चिनी सम्राटानें कन्फ्यूशियसचीं सारीं पुस्तकें जाळण्याचा हुकूम त्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनीं दिला.  पुष्कळ श्रध्दावान् पंडितांनीं भक्तिमुळें ग्रंथ न जाळता लपवून ठेविले. परंतु कायदेभंग करणार्‍या अशा पंडितांना जिवंत पुरण्यांत आलें.

परंतु आज पाश्चिमात्यांत बायबल जितकें लोकप्रिय आहे तितकेच चीनमध्यें कन्फ्यूशियसचे ग्रंथ लोकप्रिय आहेत.  ख्रिस्ताप्रमाणें कन्फ्यूशियसहि आतां देव झाला आहे.  ख्रिस्त व कन्फ्यूशियस दोघांनींहि सज्जन मानवांची एक नवीन जात निर्माण करण्याचा महान् उद्योग केला.  शिष्ट मानव नव्हेत तर खर्‍या अर्थानें सौम्य व शांत असे सद्‍गृहस्थ.  परंतु आतांपर्यंत ख्रिस्त व कन्फ्यूशियस या दोघांचेंहि कोणीं ऐकलें नाहीं.  दोघांच्याहि शिकवणीपासून जग दूरच राहिलें आहे.  कोट्यवधि चिनी लोक कन्फ्यूशियसच्या नांवाची पूजा करतात ; परंतु कन्फ्यूशियससारखें आपलें मत उदार व उदात्त व्हावें अशी खटपट कितीसे करीत असतील ? तसेंच जे स्वत:ला ख्रिश्चन म्हणवतात अशांपैकीं किती जाणांना ख्रिस्तानें शिकवलेला धर्म समजला असेल. समजत असेल ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel