हें ऐकून जॉन राजाच्या तोंडाला पाणी सुटलें. कारण, स्वार्थ व धर्मप्रसार या दोन्ही गोष्टी साधारण होत्या. पृथ्वी वाटोळी आहे ही गोष्ट कांहीं कोलंबसानेंच प्रथम नाहीं सांगितली. ख्रि.पू. चौथ्या शतकांतला अ‍ॅरिस्टॉटल म्हणतो, ''पृथ्वी वाटोळी आहे असें पूर्वीपासून बरेच जण म्हणत आले आहेत.'' अ‍ॅरिस्टॉटलच्याहि काळीं ही गोष्ट—हा शोध—जुनाच होता. मध्ययुगांत या बाबतींत मोठमोठे पंडित वाद करीत असत. जॉन राजाच्या दरबारांत येण्यापूर्वी कोलंबसानेंहि ही गोष्ट पुष्कळदां चर्चेत ऐकली असेल. जॉन राजानें इटलींतील प्रसिध्द ज्योतिर्विद् टॉस्क्नेली याला पत्र लिहून 'युरोप व हिंदुस्थान यांच्यांतला सर्वांत जवळचा रस्ता कोणता ?' असें विचारलें होतें, ही गोष्ट तर प्रसिध्दच आहे. टॉस्क्नेलीनें उत्तर दिलें, ''पृथ्वी नि:संशय वाटोळी आहे. अर्थातच अटलांटिक ओलांडून पश्चिमेकडे जातां जातांच हिंदुस्थानचा रस्ता सांपडेल.'' तो पुढें लिहितो, ''ज्या देशांत मसाले होतात, ते देश पूर्वेकडील असें आपण म्हणतों; पण या देशांना मी पश्चिमेकडचे म्हणतों याचें आश्चर्य वाटूं देऊं नका. कारण, जे समुद्रमार्गानें सारखे पश्चिमेकडे जात राहतील त्यांना हे प्रदेश साहजिकच पृथ्वीच्या दुसर्‍या बाजूला आढळतील.''

टॉस्क्नेलीचें हें निश्चित मत कळल्यावर जॉननें कोलंबसास न समजूं देतां आधींच एक तुकडी पाठवून देण्याचा प्रयत्न केला. कारण, कोलंबस पोर्तुगीज नव्हता व एका विदेशी माणसाकडे या टोळीचें प्रमुखत्व जावें ही गोष्ट जॉन राजाला नको होती. पण जॉन राजानें पाठविलेल्या तुकडींतील खलाशांनीं बंड केलें, त्यामुळें त्या तुकडीच्या कप्तानाला परत यावें लागलें.

जॉन राजाचा हा लपंडाव पाहून कोलंबस चिडला, विटला व स्पेनच्या राजाकडे गेला.

- २ -

या वेळेस स्पेनच्या गादीवर फर्डिनंड व इझॅबेला हीं होती. तीं कोलंबसाच्या म्हणण्याकडे लक्ष देईनात. त्यांचे लक्ष मुसलमानांबरोबरच्या लढायांत होतें. ज्यूंविरुध्द चाललेल्या दुष्ट कारवायांत तीं मग्न होतीं, त्यामुळें कोलंबसाच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यास त्यांचें मन तयार नव्हतें. कोलंबसानें निराश होऊन आपला भाऊ बार्थोलोमो यास इंग्लंडचा राजा सातवा हेन्री याच्याकडे पाठविलें. तो स्वत:हि फ्रान्सच्या राजाकडे जाणार होता; पण इतक्यांत अकस्मात् १४९२ च्या वसंतॠतूंत स्पेनच्या दरबारांतून त्याला मदत मिळाली. पश्चिम युरोपांतील मुसलमानांच्या हातचें शेवटचें मजबूत ठाणें ग्रॅनाडा हें स्पॅनिशांच्या हातीं पडलें. ज्यू लोक देशांतून हांकलले गेले होते व जग आतां ख्रिश्चन धर्मीयांसाठीं सुरक्षित झालें होतें. अर्थातच कोलंबसाच्या योजना ऐकावयाला फर्डिनंड व इझॅबेला यांना आतां फुरसत होती. हिंदूंना फसवून ख्रिश्चन करण्याची, तशीच त्यांना लुटण्याची कोलंबसाची योजनाहि त्या स्वार्थी व रानटी राजाराणींना पसंत पडली.

राजाराणींचे उत्तेजन मिळालें. पॅलास शहरांतल्या कांही श्रीमंत व्यापार्‍यांनीं मदत केली. आणि तीन लहान गलबतें घेऊन कोलंबस आपल्या ऐतिहासिक सफरीवर निघाला. त्या दिवशीं शुक्रवार होता, ऑगस्टची तिसरी तारीख होती. त्याच्याबरोबर अठ्ठयाऐंंशीं खलाशी होते. ते बहुतेक कैदी व कायदेबाह्य असे लोक होते. कोणीहि प्रतिष्ठित नावाडी कोलंबसाच्या साहसांत सामील व्हावयाला तयार नव्हते. कारण, आपण असेच पुढें गेल्यास पृथ्वीवरून खालीं एकदम खोल खड्डयांत पडूं असें त्यांना वाटे.

पर्यटन सुरू झालें; प्रवासांत रोमांचकारी प्रसंग फारसे नव्हते; हवा चांगली होती; खलाशांनींहि बंड वगैरे कांहीं केलें नाहीं. ते समाधानांत होते. महासागराच्या पलीकडे अपरंपार संपत्ति मिळेल या आशेनें ते उत्साही होते. कांहीं रसवेल्हाळ इतिहासकारांनीं खलाशांनीं कोलंबसाविरुध्द बंड केलें वगैरे कल्पित कथा दिल्या आहेत. पण तसें कांहीं एक झालें नाहीं. ऑक्टोबरची नववी तारीख उजाडली. त्या दिवशीं मंगळवार होता. त्या दिवशीं रात्रभर डोक्यांवरून पक्षी जातांना त्यांना दिसले व दुसरे दिवशीं पाण्यावर तरंगत येणारी एक झाडाची फांदी दिसली. ऑक्टोबरच्या अकराव्या तारखेला उजाडतां उजाडतां ते एका बेटावर उतरले. हें बेट जपानच्या बाह्य सीमेवर असावें असा कोलंबसाचा तर्क होता. पण फ्लॉरिडाच्या दक्षिणेस असणार्‍या वेस्ट इंडीज बेटांपैकीं तें एक होतें. पृथ्वी वाटोळी आहे हा त्याचा तर्क खरा ठरला; पण पृथ्वीचा आकार त्यानें फारच लहान कल्पिला होता. जेथें अमेरिका आहे तेथें हिंदुस्थान, जपान वगैरे पूर्वेकडचे देश असतील असें त्याला वाटलें. मरेपर्यंत कोलंबसाची अशीच समजूत होती कीं, आपण एकादें नवीन खंड शोधलेलें नसून आशियालाच जाऊन पोंचलों.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel