आयुष्याच्या मध्यभागीं त्याला तीन सुंदर व रमणीय वस्तू मिळाल्या—प्रेमळ पत्नी, गोजिरवाणा पुत्र व निष्ठावंत मित्र. तीन दैवी देणग्या ! वयाच्या एकोणचाळिसाव्या वर्षी म्ह० १७८८ सालीं ख्रिस्टियेन व्हल्पियसशीं त्याची गांठ पडली. प्रथम ती त्याची रखेली होती. पण पुढें दोघांनीं कायदेशीररीत्या लग्न केलें. १७८९ सालीं त्याला मुलगा झाला. १७९४ सालीं प्रख्यांत नाटककार शिलर याच्याशीं त्याचा दाट परिचय झाला. त्या वेळीं गटे पंचेचाळीस वर्षांचा होता व शिलर पस्तीस वर्षांचा होता.

गटे व शिलर यांच्या कोणत्याहि उत्कृष्ट काव्यापेक्षां त्यांची मैत्री ही अधिक सुंदर कविता होती. त्यांची मैत्री म्हणजे एक देवसदृश मानव व एक मरणोन्मुख माणूस यांची मैत्री होती. शिलर आजारी होता; त्याचें एक पुच्पत्रपुच्स गेलें होतें. गटे ग्रीक वृत्तीचा होता; त्याला निसर्गाविषयीं परमादर होता. शिलर ख्रिश्चन होता; त्याला न्यायाची तहान होती. दोघांनींहि बंडखोरीपासून प्रारंभ केला; पण दोघेहि शेवटीं शांत वृत्तीचे झाले. गटेची बंडखोरी त्याच्या सुखासीनतेनें मारली, शिलरची बंडखोर वृत्ति त्याच्या दारिद्र्यामुळें गारठली. पण दोघांचाहि कलेच्या बंडखोरीवर अद्यापहि विश्वास होता. सामान्य माणसांचे श्रेष्ठ मानव बनविण्याचें साधन म्हणजे काव्य असें त्यांना वाटे. काव्य हें मानवांना अतिमानव करणारें प्रवित्र माध्यम आहे या विश्वासानें दोघेहि सहकार्यानें काम करूं लागले. सौंदर्योपासना हा त्यांचा धर्म होता. सौंदर्योपासनेच्या साधनानें ते जगाचा व आपलाहि उध्दार करूं पाहत होते. दोघेहि परस्परांच्या प्रतिभेचे पूरक होते. दोघांचें हें सुंदर व मंगल मैत्रीचें प्रेम अकरा वर्षे टिकलें व शिलर मरण पावला. गटेनें दार लावून घेतलें व तो आपल्या खोलींत एकाद्या लहान मुलाप्रमाणें ओक्साबोक्शीं रडला. एका मित्राला तो लिहितो, ''माझें अर्धे अस्तित्वच जणूं संपलें ! माझा अर्धा प्राणच जणूं गेला ! या काळांतील माझी रोजनिशी कोरी आहे. माझें जीवन जणूं शून्य, रिक्त झालें होतें, असें तीं कोरीं पृष्ठें दाखवीत आहेत !''

गटे म्हातारा होईतों जगला; पण दीर्घ जीवनासाठीं त्याला एकाकीपणा भोगावा लागला. ज्यांच्या ज्यांच्यावर त्याचें प्रेम होतें ती सारी मंडळी एकामागोमाग एक गेली. त्याचे प्रियतन मित्र, त्याची पत्नी, त्याची बहीण व अखेर त्याचा एकुलता एक मुलगा, सारीं सोडून गेलीं, तरी तो शूरासारखा सतत पुढें पुढेंच जात होता. आपले आनंद व आपल्या वेदना यांना तो अमर गीतांचें स्वरूप देत होता. त्यानें एकूण साठ पुस्तकें लिहिलीं. भावगीतें, शोकगीतें, उपहासगीतें, महाकाव्यें, निबंध, कादंबर्‍या, नाटकें, भुताखेतांच्या व पर्‍यांच्या अद्भुत गोष्टी, देव, दानव व मानव यांच्या सात्त्वि कथा, दंतकथांवर उभारलेल्या तात्त्वि कथा, सारे प्रकार त्यानें अमर कलावंताच्या हातानें हाताळले व शेवटीं आपली सारी प्रतिभा केंद्रीभूत करून त्यानें आपलें अमर महाकाव्य लिहिलें व जगाला दिलें, तेंच फॉस्ट होय. याचा पूर्वार्ध तो तीस वर्षे लिहीत होता. उत्तरार्धाला आणखी पंचवीस वर्षे लागली.

फॉस्ट या महाकाव्याचा अर्थ काय हें आतां पाहूं या.

- ६ -

फॉस्ट लिहितांना मानवजात समजून घेणें हा गटेचा उद्देश होता. मानवजातीच्या शक्तीनें मोजमाप करून मानवांचीं कर्तव्यें काय हें त्याला सांगावयाचें होतें. नाटकाची प्राणभूत कल्पना आरंभींच्या काव्यमय प्रस्तावांत आहे. मानवी आत्म्याविषयीं देव व सैतान यांच्यांत पैज लागते. सैतानाला मर्त्य मानवांविषयीं मुळींच आदर नसतो. सैतान म्हणजे शाश्वत संशयात्मा, 'कांहीं नाहीं, सारें नि:सार आहे,' असें म्हणणारा. 'असण्यापेक्षां नसणें व जीवनापेक्षां मरण अधिक श्रेयस्कर' अशी सैतानाची श्रध्द होती. नियतीचा जो अनंतर खेळ चाललेला आहे, त्यांत सैतानाला सार वाटत नसे. ती माणसांना मातींत मिळविण्यासाठीं त्यांना निर्मिते. ज्या शाश्वत शून्यांतून हा दिक्कालात चालणारा निरुपयोगी खेळ सुरू झाला, ज्यांतून हें विश्व यात्रेला निघालें, त्या पोकळ शून्यांत असणेंच बरें असें सैतानाला वाटे. सैतानाचें ध्येय एकच : सर्जनाला विरोध, सृष्टीचा खेळ अगर विकास चालू न देणें, मानवांचा व देवाचा सद्भव नाकारणें. सैतान म्हणतो, ''म्हातारा डॉ० फॉस्ट—महापंडित व मानवांतला अत्यंत सरळ व न्यायी पुरुष—सुध्दां, जर मी त्याला मोहांत पाडीन तर, अध:पाताच्या अन्तिम टोंकाला पोंचेल.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय