प्रकरण ५ वें
देव होऊं पाहणारा मनुष्य : सीझर
- १ -
रोमनांनीं कार्थेजची राखरांगोळी करून टाकली ! पण असला हा रानवटपणा त्यांच्या हातून चुकून झाला असें समजण्याची मुळींच गरज नाहीं. व्यवस्थित रीतीनें व विचारपूर्वक ठरविलेली अशी ती विध्वंसक योजना होती. आंतरराष्ट्रीय खुनाची व दुसर्यांचे देश बळकावण्याची ती उन्मत्त अशी साम्राज्यशाहीची राष्ट्रीय वृत्ति होती. रोमन सेनेचा एक भाग कार्थेजचें भस्म करीत असतां, दुसरा भाग कॉरिंथचा विनाश करण्यांत गुंतला होता, तिसरा पूर्वेकडील देशांत रक्तपात करून साम्राज्यविस्तार करण्यांत दंग होता व उरलेलें सारें सैन्य उत्तरेकडे व पश्चिमेकडे रोमन सत्ता पसरविण्यांत गुंतलें होतें.
अशा रीतीनें चोहों बाजूंस साम्राज्याचा विस्तार होत असतां खुद्द रोममध्यें काय चाललें होतें ? राज्यसत्ता बळकावण्यासाठीं तेथें सारखी भांडणें सुरू होती. रोज रोज कटकटी व काटाकाटी, रोज रोज दंगे व बंडें ! जवळ-जवळ शंभर वर्षे पराक्रमी पण हडेलहप्प गुंडांनीं रोमवर सत्ता चालविली. मॅरियस, सुल्ला, पाँपे, सीझर, कॅशियस, अॅन्टोनी, ऑगस्टस, अशी हीं नांवें चकमकतांना आढळतात. प्रत्येक जण जनमतानें श्रेष्ठ स्थानावर चढला. पण केवळ जनमतानें मात्र नव्हे ; दंडुके, दगड, खंजीर यांच्या साह्यानें त्यांची मतें मिळवून ते सर्वश्रेष्ठ अधिकारी बनले. रोममधील प्रत्येक निवडणूक म्हणजे लढाईच असे. ज्याच्यामागें अधिक गुंड व पुंड, ज्याच्या पाठीमागें अधिक मानकापू व गळेकापू तोच निवडणूक जिंकी. जो तो स्वत:साठी, रिपब्लिकसाठीं कोणीहि नाहीं, असेंच त्या दिवशीं दिसे. मॅरियसपासून ऑगस्टसपर्यंत सर्वांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांमुळें रोम शहर अखंड यादवीनें त्रस्त झालें होतें. सभ्य इतिहासकारांनीं या प्रकारांना यादवी युध्दें हें नांव दिलें असलें तरी खर्या अर्थानें ते रानटी खाटिकखान्याचेच प्रकार होते.
अधूनमधून एकादा प्रामाणिक पुरुष जन्माला येई ; त्याला स्वत:पेक्षां रोमचें कल्याण अधिक महत्त्वाचें वाटे, स्वत:च्या फायद्यापेक्षां रिपब्लिकची चिंता अधिक असे. पण धंदेवाईक मुत्सद्दी व राजकारणी लोक अशा प्रामाणिक पुरुषाचा केव्हांच चेंदामेंदा करून टाकीत, त्याला केव्हांच उडवून देत ! टायबेरियस ग्रॅच्चसनें जेव्हां गरिबांपासून बळकावलेल्या जमिनींची फेरवांटणी करण्याचा प्रयत्न केला तेव्हां सीनेट-हाऊसमध्येंच त्याचा मुडदा पाडला गेला. त्याच्या डोक्यावर सोटे बसले व तो मेला. त्याचा भाऊ गायस ग्रॅच्चस तसलेच जनहिताचे कायदे करूं लागतांच त्याचीहि तीच गत झाली. प्रामाणिक माणसांना राहण्याला रोम ही सुरक्षित जागा राहिली नव्हती.