चर्चा दोन महिने चालली.  सनातन्यांचा आवेश, त्यांची मारामारी वगैरे पाहून त्यांचें म्हणणें बरोबर असा कॉन्स्टंटाइननें निकाल दिला.  त्रिविध तत्त्वांवर विश्वास न ठेवणार्‍यांना त्यानें हद्दपार केलें व अ‍ॅरियसचीं पुस्तकें होळींत टाकलीं.  अ‍ॅरियसचें पुस्तक कोणाजवळ आढळलें तर त्याला ठार मारण्यांत येईल असें फर्मान त्यानें काढलें.

नंतर रोमन साम्राज्याच्या धर्तीवर चर्चची संघटना करण्यासाठीं त्यानें मदत केली.  बिशप चर्चचे गव्हर्नर झाले.  बिशप निवडून येण्यासाठीं रोमन निवडणुकींतल्याप्रमाणें अन्-ख्रिश्चन प्रचार होऊं लागले.  गिबन म्हणतो, ''बिशप-पदासाठीं उभें राहणार्‍या एकानें आपण उच्च कुळांतले असल्याची प्रौढी मारली, तर दुसर्‍या एकानें भरपूर खाना देऊन आपणासच निवडण्यांत यावें यासाठीं खटपट केली.  तिसर्‍या एकानें तर याहिपुढें जाऊन चर्चमध्यें होणारी प्राप्ति देण्याचें, तींत वांटेकरी करण्याचें निवडून देणारांस आश्वासन दिलें.'' आतांपर्यंत बिशपची जागा सेवेची होती.  नम्र व अधिक सेवा करणारा बिशप बने.  पण आतां ती अपवित्र डामडौल, अहंकार, जुलूम व स्वार्थ यांची जागा झाली.  धर्मपदावर आतां नवीनच नमुन्याचे लोक येऊं लागले.  या धर्मवीरांना कोर्टांत बोलावणें येई, ते राजदरबारांतील खान्यास जात, सम्राटाबरोबर युध्दांतहि जात.  थोडक्यांत सांगावयाचें तर ख्रिश्चन धर्मांतील नम्रता गेली.  ख्रिश्चन धर्म सत्तारूढ व संपन्न झाला, प्रतिष्ठित झाला, दूषित व अध:पतित झाला.  पोप हा चर्चचा पिता.  पोप या शब्दाचाच अर्थ पिता.  रोमन साम्राज्यांतील जनतेच्या मनोबुध्दीवर पोप निरंकुश सत्ता चालवी.  ख्रिस्ताच्या नव्या राज्याचे तीन भाग झाले : स्वर्गाचें राज्य, रोमचें राज्य व चर्चचें राज्य.  नाझरेथ येथील तिरस्कृत परिव्राजकाच्या—येशूच्या—साध्या, सुंदर व मधुर धर्माच्या, लोकशाहीपुरस्कर्त्या व समतेच्या शिकवणीपासून नवीन प्रतिष्ठित ख्रिश्चन धर्म कितीतरी लांब गेला !

कॉस्टंटाइननें ख्रिश्चन धर्म स्वीकारला व तो राष्ट्राचा धर्म केला तेव्हां रोमन साम्राज्यांत जवळजवळ साठ लक्ष ख्रिश्चन होते.  पण ख्रिश्चन धर्म राष्ट्रधर्म झाल्यावर त्याच्या अनुयायांची संख्या तरवारीच्या योगानें वाढूं लागली.  जगाचा बराचसा भाग ख्रिश्चन झाला, रक्ताचा बाप्तिस्मा दिला गेला, पश्चिमेचा प्रभावी धर्म म्हणून ख्रिश्चन धर्म सर्वत्र ओळखला जाऊं लागला.  पण तो प्रभावी झाला तरी ख्रिस्ताचा मूळचा सुंदर शिवधर्म मात्र राहिला नाहीं.

मृत्युशय्येवर असतां कॉस्टंस्टाइनला बाप्तिस्मा दिला गेला.  चर्चच्या प्रेमळ बाहूंत असतां मरण आलें तर केलेल्या सर्व पापांपासून मुक्ति मिळेल असें त्याला वाटलें.  तो मरतांना चौसष्ट वर्षांचा होता.  त्यानें चोवीस वर्षे राज्य केलें.  इ.स. ३३७ मध्यें तो मरण पावला.

- ५ -

सर्व रोमन सम्राटांपेक्षां कॉन्स्टंटाइन अधिक अवडंबर माजविणारा होता.  त्याचा थाटमाट अपूर्व असे.  त्याची कारकीर्द रानवट वैभवानें भरलेली आहे.  पण ती मृत्यूच्या वादळाची भव्यता होती.  रोमची शक्ति क्षय पावूं लागली होती.  कृष्ण पक्ष सुरू झाला होता.  ओहोटी लागली होती.  उत्तमोत्तम तरुण मारले गेले होते.  प्लेगांच्या साथींमुळेंहि लोकसंख्या खूप घटली.  युध्दांमुळेंच प्लेग सर्वत्र साम्राज्यभर पसरले.  रोमनांनीं सर्वत्र पेरलेल्या रक्तपाताच्या बीजांचीं फळें भोगणें त्यांना प्राप्त होतें.  रोमन सत्तेच्या र्‍हासाची मीमांसा करणारे लठ्ठ-लठ्ठ ग्रंथ लिहिण्यांत आले आहेत.  गिबनपासून आतांपर्यंतच्या सार्‍या इतिहासकारांनीं रोमन सत्तेचा र्‍हास नक्की कोणत्या तारखेस सुरू झाला हें ठरविण्याची खूप खटपट केली आहे.  पण हा प्रश्न अगदीं सोपा आहे.  त्याचें उत्तर दोनचार वाक्यांत सांगतां येण्यासारखें आहे.  ज्या क्षणीं रोम जग जिंकण्यास निघालें, त्याच क्षणीं त्याला कीड लागली.  त्याच क्षणापासून त्याचा र्‍हास सुरू झाला.  तरवारीवर विसंबल्यामुळें तें तरवारीनेंच मेलें—तरवारीलाच बळी पडलें !  कसें मारावें हें रोमनें रानटी लोकांस शिकविलें व मग त्याच रानटी लोकांनीं उलटून रोमला ठार केलें.

कॉन्स्टंटाइनच्या मरणानंतर बरोबर एकशें एकुणचाळीस वर्षांनीं म्हणजे इ.स. ४७६ मध्यें रोमचें लष्करी यंत्र हूण, व्हँडॉल व गॉथ यांच्या हल्ल्यांसमोर कोलमडून पडलें ! असीरियन साम्राज्याप्रमाणें रोमन साम्राज्यहि स्मृतिशेष झालें ! जगावर सत्ता गाजवूं पाहणारीं सारीं राष्ट्रें अखेर ज्या गतीला गेलीं तीच गति रोमन साम्राज्याचीहि झाली.  आपल्या महत्त्वाकांक्षेलाच तें बळी पडलें.  महत्त्वाकांक्षेमुळेंच त्याला मरण आलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय