परंतु पेरिक्लीस म्हणे, ''अथेन्स युध्दार्थहि सदैव सिध्द आहे.  शहराला सुंदर करण्यांत पैसा खर्च होतो ती उधळपट्टी नसते.  हजारों लोकांना त्यामुळे उद्योगधंदा मिळतो, काम मिळते.  या लोकांना उद्योग न मिळाला तर ते निरुपयोगी होतील, नाना प्रकारचीं वाईट कृत्यें करूं लागतील.''

अथेन्समधील सार्‍या जनतेंत सृजनशक्तिचा दिव्य प्रवाहच जणूं वाहूं लागला. सारे कलात्मक निर्मितींत रंगले. जगांतील शिल्पकारांचा मुकुटमणि जो फिडियस तो अथेन्समधील शिल्पकामावरचा मुख्य अधिकारी होता.  त्याच्या योजनेप्रमाणें सारें होत होतें.  सर्वत्र फिडियसची देखरेख असे.  फिडियस म्हणाला, ''सर्वत्र सौंदर्य फुलूं दे.''  आणि शहरभर ठायीं ठायीं अप्रतिम पुतळे उभे राहिले.  रमणीय व भव्य मंदिरें बांधलीं गेलीं.

ग्रीक लोक आपलीं मंदिरें, आपलीं शिल्पकलेचीं कामें रंगवीतहि असत.  पार्थवॉन येथील पडके अवशेष आज पाहून पूर्वीच्या सौंदर्याची खरी कल्पना आपणांस येणार नाहीं.  तें अस्थिपंजराचें सौंदर्य राहिलें आहे.  पूर्वीच्या सौंदर्याचा नुसता हाडांचा सांगाडा जणूं राहिला आहे.  प्रोपिलिआचें भव्य चित्र कल्पनेनें डोळ्यांसमोर आणा.  तेथील ते हारीनें वरपर्यंत जाणारे रमणीय स्तंभ, तें अ‍ॅक्रॉपॉलिसचें स्थान आणि तो संगीताचा सुंदर दिवाणखाना !  टेंकडीवर असलेला अ‍ॅथीनी देवतेचा स्वर्गीय पुतळा ! जमिनीवरून व समुद्रावरून तो पुतळा लांबून दिसे.  आणि सौंदर्याचें माहेरघर असें तें पार्थेनान ! पर्वतशिखरावर एकाद्या नक्षीदार हिर्‍याप्रमाणें तें चमकत असे.  निळ्या अथीनियन आकाशाखालीं हीं सर्व शिल्पकामें अत्यंत सुंदर रंगांत शोभत असत, चमकत असत.  चुनखडी, पितळ, आरसपानी दगड यांच्या ज्यांना पाकळ्या आहेत अशीं जणूं खरोखरचीं फुलें तेथल्या शिल्पांत दिसत.  फिडियसच्या हाताचा जादूचा स्पर्श होतांच दगडांधोंड्यांतून फुलें फुलतांना पाहून ग्रीक लोकांचें हृदय उचंबळून येत असेल यांत काय शंका ?  या शिल्पनिर्मितीनंतर कित्येक शतकांनीं झालेल्या प्ल्युटार्कनें जेव्हां हें कलेचें अप्रतिम प्रदर्शन पाहिलें तेव्हां तो चकित झाला.  रंग व रेषा यांचें तें निर्दोष मिश्रण पाहून त्याची जणूं समाधि लागली !  तो सांगतो, ''या शिल्पाकृतींवर अद्यापहि एक प्रकारचा ताजेपणा आहे.  काळाच्या स्पर्शापासून हा ताजेपणा या शिल्पाकृतींना सांभाळीत आहे.  जणूं या सौंदर्यमय कृतींत अमर असा आत्माच वास करीत आहे !  या शिल्पाकृती निर्माण करीत असतांना, त्यांचें मिश्रण तयार करतांना, जणूं अमर अशी स्फूर्ति व सजीवताच तेथें मिसळली जात होती !

अशा रीतीनें पेरिक्लीस अथेन्सला सौंदर्यखनि करीत असतां त्याचें शत्रू त्याच्या आसनाखालीं सुरुंग लावीत होते.  खुद्द पेरिक्लिसवरच हल्ला करण्याचें धैर्य त्यांना नव्हतें.  तेव्हां त्याच्या मित्रांवरंच त्यांनीं हल्ला चढविला.  अ‍ॅथीनी देवतेचा पुतळा अलंकृत करण्यासाठीं एकानें सोनें दिलें होतें.  त्या सोन्यांतील कांही भाग फिडियसनें चोरला असा त्याच्यावर आरोप करण्यांत आला.  परंतु फिडियसनें त्या आरोपाला उत्तर दिलें.  स्वत:वरचा आरोप त्यानें खोडून काढला.  परंतु फिडियसला पुन्हा अटक करण्यांत आली.  त्याच्यावर धर्माची विटंबना करण्याचा, नास्तिकतेचा अरोप करण्यांत आला.  देवतेच्या ढालीवर त्यानें स्वत:ची व पेरिक्लिसची प्रतिकृति काढण्याचा मूर्खपणा केला होता.  अथीनियनांच्या दृष्टीनें तो अक्षम्य अपराध होता.  त्यांनीं त्याला तुरुंगांत टाकलें.  तेथें तो आजारी पडला.  त्याला एक रोग जडला व तो मेला.  कोणी म्हणतात त्याला विष देण्यांत आलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel