- ३ -
कार्ल मार्क्सच्या विचारसरणींत व मॅझिनीच्या विचारसरणींत येथवर साम्य आहे. बहुजनसमाजाला मुक्त करण्यासाठीं जागतिक क्रांति व्हावी असें दोघेहि म्हणत. ज्या कम्यूनिस्ट- मॅनिफेस्टोंत मार्क्सचे विचार अत्यंत स्पष्टपणें व अत्यंत जोरदारपणें मांडले गेले आहेत, तो मॅनिफेस्टों मॅझिनीच्या यंग इटली व यंग युरोप या संघटनांनींहि एकत्र येण्याला घेतला असता. मॅझिनी व मार्क्स यांच्यांतील मुख्य फरक हा कीं, मॅझिनी ईश्वरी इच्छेला अनुरूप असें स्वातंत्र्याचें उपनिषद् देत होतो. 'सर्वांनीं मुक्त व्हावें अशी दैवी-ईश्वराचीच-इच्छा आहे' असें तो प्रतिपादी; तर 'भवितव्यतेच्या—नियतीच्या--अभंग कायद्याप्रमाणें सर्व मानव मुक्त होणारच.' असें मार्क्स म्हणे. भवितव्यतेला म्हणजेच नियतीला शास्त्रीय सांचांत बसविलें कीं तिला उत्क्रांति म्हणतात.
पण या वेळेस मार्क्स अधिक क्रांतिकारी होता. तो अजून संपूर्णपणें विज्ञानवेत्ता म्हणजे शास्त्रीय दृष्टीचा झाला नव्हता. त्याचा कम्यूनिस्ट-मॅनिफेस्टों १८४८ सालीं लिहिला गेला. त्या वेळीं सारें युरोप उठावाच्या प्रक्षोभांत होतें. ती वेळ नि:पक्षपाती, तात्विक निबंध लिहिण्याची नव्हती, तर हातीं शस्त्र घेण्यासाठीं जळजळीत हांक मारण्याची होती. त्यानें आपलें ऐतिहासिक तत्त्वज्ञान अद्यापि अर्थशास्त्राच्या पायावर उभारलें नव्हतें. जगांतील कामगारांना शिक्षणाचे पाठ देण्याऐवजीं त्याना तो या वेळीं बंड करण्यासाठीं चेतवीत होता--उठवीत होता.
पण युरोपांतील सत्ताधारी कामगारांना दडपून टाकूंच् इच्छीत होते. मॅझिनी व मार्क्स यांसारखे युरोपांतील शांततेचे विघातक लोक एका देशांतून दुसर्या देशांत सारखे फेंकले जात होते. शेवटीं मार्क्सहि हद्दपार होऊन मॅझिनीप्रमाणेंच इंग्लंडांत येऊन राहिला. या कालीं (१८४९) इंग्लंड हा युरोपांतील सर्वांत उदार देश होता. त्याला 'निर्वासितांची माता' असें म्हणत. अनियंत्रित सत्तेपासून मुक्त असल्यामुळें क्रान्तीच्या भीतीपासून इंग्लंड मुक्त होतें. तें दुसर्या देशांतील घरदारहीन परित्यक्त क्रांतिकारकांना आश्रय देऊं शके. एकोणिसाव्या शतकांतील ही इंग्लंडची पक्षपाती सज्जनता, येणार्या क्रांतिकारक पाहुण्यांना भेदाभेद न करतां अभय देण्याचें इंग्लंडमधील राजसत्तेचें हें धोरण नि:संशय अत्यंत स्तुत्य होतें. मार्क्स इंग्लंडला आला तेव्हा त्याच्याजवळ एक दिडकीहि नव्हती. श्रमजीवी कामगारांची बाजू घेऊन व त्यांचा कैवारी बनून तो लढला तेव्हां तो स्वत:हि एक मजूर झाला. त्याचें पोट भरण्याचीहि पंचाईत होती. त्यांतच त्याला तीन मुलें होती व थोड्यात दिवसांत चौथें होणार होतें.
कामगारांचा हा महर्षि-श्रमजीवी लोकांचा हा प्रेषित-गलबतांतून इंग्लंडच्या भूमीवर पाऊल ठेवण्याच्या वेळीं कसा होता हें क्षणभर पाहूं या. आतां पुढील कष्टाचें जीवन त्याला इंग्लंडमध्येंच कंठावयाचें होतें. या वेळीं त्याचें वय एकतीस वर्षांचें होतें. ''त्याच्या डोक्यावर काळया केंसांचें जंगल होतें. त्याची दाढी भव्य व वाटोळी होती. त्याचे हात केंसाळ होते. त्याच्या अंगावरच्या ओव्हरकोटाचीं बटणें चुकून खालींवर लागलेलीं होतीं. पण त्याला पाहतांच एकदम मान लववावीसें वाटे. दुसर्यांपासून मान मागण्याचा या पुरुषास हक्क आहे, दुसर्यांनीं मान द्यावा अशी शक्ति त्याच्या ठायीं आहे, असें वाटे. हा पुरुष कसाहि दिसो वा कांहींहि करो, तो जगापासून मान घेतल्याशिवाय राहणार नाहीं, असें वाटे. त्याची चालरीत जरा चमत्कारिक वाटत असली तरी तींत निर्भयपणा व आत्मविश्वास प्रतीत होत होते. त्याची वागणूक सामाजिक जीवनाच्या ठरीव रूढीशीं विरोधक होती. तो स्वाभिमानी दिसे; आसपासच्या प्रतिष्ठित जगाविषयीं तो तुच्छता दाखविणारा होता. त्याचा आवाज कठोर व कर्कश वाटे; त्यांत एक प्रकारचें नाद-गांभीर्यहि असे. व्यक्ती व वस्तू यांविषयींच्या त्याच्या क्रांतिकारक मतांना अनुरूफा तो दिसत होता.''