मॅसिडोनियाच्या राजाच्या राजवाड्यांतील जीवनांत सदोदित कांही ना कांही धर्म-विधी चाललेले असावयाचेंच ; त्यांत भांडणें, मारामार्या, द्वेषमत्सर यांचेंहि मिश्रण असे. आई अलेक्झांडरला फूस देई व तो बापाचा अपमान करी. राजवाड्यांत एकदां एक मोठी मेजवानी चालली होती; पिता व पुत्र दोघेहि दारू पिऊन बेहोष झाले होते. अलेक्झांडरनें फिलिपचा अपमान केला ; बाप मुलाला भोंसकण्यासाठीं धांवला. पण सुरा नीट खुपसण्याइतकी शुध्द त्याला नसल्यामुळें तो तोल जाऊन जमिनीवर पडला आणि भावी आयुष्यांत व्यभिचार, बदफैलीपणा व दिग्विजय करण्यास अलेक्झांडर वांचला.
- ३ -
अशा वातावरणांत अलेक्झांडर वाढला. पित्यानें त्याला ग्रीक शिक्षण चांगलें मिळावें म्हणून खटपट केली. त्यानें मुलासाठीं अति उत्कृष्ट व नामांकित शिक्षक जमविले. कवि, तत्त्वज्ञानी, संगीतज्ञ, वैयाकरणी, अलंकारशास्त्रज्ञ सारे राजवाड्यांत येऊन अलेक्झांडरला सुसंस्कृत करूं लागले, त्याला माणसाळवूं लागले. कारण, तो जरा रानवट होता. त्याला थोडी तरी माणुसकी यावी म्हणून हे सारे आचार्य खटपट करूं लागले. या नामांकित शिक्षकांत जगत्प्रसिध्द अॅरिस्टॉटलहि होता. अॅरिस्टॉटल म्हणजे विद्वत्तेचें व ज्ञानाचें आश्चर्यकारक भाण्डार ! एक लहानशा डोक्यांत इतक्या विद्या मावत तरी कशा ? शंभर माणसांचे ज्ञान त्याच्या एकट्याच्या डोक्यांत होतें. तो सर्व विषयांवर सारख्याच अधिकारानें लिहूं व बोलूं शके. राजकारण, नाटक, काव्य सुष्टिज्ञान, वैद्यक, मानसशास्त्र, इतिहास, तर्क, ज्योतिर्विद्या, नीतिशास्त्र, गणित, अलंकारशास्त्र, प्राणिशास्त्र,—थोडक्यांत बोलावयाचें तर सर्व ज्ञानें व विज्ञानें त्याच्या समोर हात जोडून उभीं राहत. तरीहि त्याला अलेक्झांडरवर फारसा परिणाम करतां आला नाहीं ; इतकेंच काय, पण राजघराण्यांतील कोणावरच त्याचा फारसा प्रभाव पडला नाहीं. फिलिप, अलेक्झांडर, ऑलिम्पिअस, हीं तीनहि माणसें 'ग्रीक संस्कृतीचीं पूजक' म्हणून मिरवीत ; परंतु तें नुसतें सोंग होतें. ग्रीक संस्कृतीच्या झिरझिरीत बुरख्याखालीं त्यांचा रानवटपणा लपलेला होता. हीं तीनहि माणसें अंतरंगीं रानमांजरांसारखींच दुष्ट व हलकट होतीं. फिलिप पर्शियावर स्वारी करावयास निघणार तोंच त्याचा खून झाला. त्याच्या पत्नीच्याच चिथावणीमुळें तो खून झाला असें म्हणतात. मृत सम्राटाला जो मान दिला गेला होता तोच मारेकर्याच्याहि प्रेतास मिळावा, तितक्याच थाटानें व समारंभानें मारेकर्याचाहि देह पुरला जावा असा हट्ट तिनें धरला होता.
- ४ -
फिलिप मेला तेव्हां अलेक्झांडर वीस वर्षांचा होता. कसलेल्या व शिस्तशीर सैन्याचा तो मालक होता. पूर्वेकडील देशांवर तुटून पडावयाला सारी सिध्दता होती. सैनिक अपूर्व अशा सेनानीची जणूं वाटच पाहत होते. ज्याला कल्पनाशक्ति व प्रतिभा आहेत, अहंकार आहे, साहसी वृत्ति आहे, परिणामाचा विचारहि न करता जो बेछुटपणें पुढें जाईल, सर्व जगावर स्वामित्व मिळविण्याचें कार्य हातीं घेण्याइतपत ज्याच्याजवळ हिंमत व कौशल्य आहेत असा सेनापति सैन्याला हवा होता. अशा सेनापतीच्या नेतृत्वाखालीं वाटेल तेथें जावयाला ते तयार होते. हे सारे गुण तर अलेक्झांडरच्या ठायीं होतेच, पण यांशिवाय आणखीहि पुष्कळ होते. आपल्या कर्तृत्वाविषयीं अद्यापि कोणाला कांही शंका असेल तर ती दूर करण्यासाठीं तो एकदम उभा राहिला. मॅसिडोनियाच्या उत्तरेकडील जातींजमातींना त्यानें शरण यावयास लावलें आणि नंतर मॅसिडोनियाचें जूं झुगारून देऊन पुन्हां स्वतंत्र होऊं पाहणार्या इतर ग्रीक शहरांवर तो विजेसारखा चालून गेला. फिलिपच्या मरणाची वार्ता ऐकून हीं शहरें बंड करून उठलीं होतीं. अलेक्झांडरनें थीब्स शहराला वेढा घातला व फारशी अडचण न पडतां तें जिंकून घेतलें. आपल्या रक्ताळ मुठीचा इतरहि सर्व ग्रीक लोकांना कायमचा धाक बसावा म्हणून त्यानें थीब्स शहराचा संपूर्ण विध्वंस केला, शहरांतील सहा हजार लोकांस ठार मारलें व तीस हजार लोकांना गुलाम करून बाजारांत विकलें.
नंतर तो दक्षिणेकडच्या ग्रीक राज्यांकडे वळला. जेथें जेथें तो जाई तेथें तेथें त्याच्याभोंवतीं खुशामत्ये गोळा होत, त्याची खोटी स्तुति करीत, कोणी त्याला भेटी देत. बंडखोर ग्रीकांना प्रायश्चित्त मिळालेंच होतें, त्यामुळें नीट धडा शिकून त्यांनीं अलेक्झांडर हाच आपला पुढारी अशी घोषणा केली व ते त्याच्या पूर्वेकडील विस्तृत प्रदेशावरच्या स्वारींत सामील झाले.