हें सारें अंत:र्स्पूच्तीनें त्याच्या मनांत येई म्हणून तो करीत असे. जीवनाशीं त्याच्या चाललेल्या खेळांतलाच तो एक भाग होता. तो जें कांहीं करी, त्यांत योजना नसे, पध्दत नसे, विचार नसे. योजनेशिवाय काम करणें हीच त्याची योजना. दुसर्‍या देशांत पाहिलेलें जें जें त्याला आवडे, तें तें तोबडतोब आपल्या देशांत आणी. त्याचें अशिक्षित पण जिज्ञासु मन सारखें प्रयोग करीत असे. हॉलंडमध्यें एक दन्तवैद्य दांत काढीत आहे असें आढळलें, तेव्हां पीटरनें रशियांत परत येतांच स्वत: दांत काढण्यास सुरुवात केली. एका शस्त्रक्रियातज्ज्ञानें केलेलें ऑपरेशन त्यानें पाहिलें व लगेच स्वत:हि तसेंच एक ऑपरेशन करण्याची लहर त्याला आली; अर्थातच त्याचा रोगी मेला हें काय सांगावयासच पाहिजे ? कुटुंबियांची नुकसानभरपाई त्या रोग्याच्या प्रेतयात्रेस स्वत: हजर राहून त्यानें केली.

त्याला गलबतांचा नाद नित्य असल्यामुळें शेवटीं त्यानें बाल्टिक समुद्राकांठच्या दलदलीच्या प्रदेशांत एक शहर वसविलें व त्याला सेंटपीटर्सबर्ग असें जर्मन नांव दिलें. आपल्या परसांत असल्याप्रमाणें येथें आरमार राहील असें त्याला वाटलें. हें शहर सुंदर करण्यासाठीं त्यानें चौदाव्या लुईच्या दरबारांतून कांही कलावन्त व कारागीर मागवून घेतले. पण हें शहर बांधतां बांधतां एक लक्ष तीस हजर लोक मेले.

- ३ -

आपला देश सुसंस्कृत करण्यासाठीं तो जन्मभर धडपडला, पण स्वत: मात्र रानटीच राहिला. फ्रेंच दरबारांतले रीतिरिवाज रशियांत सुरू करावे असा त्याचा हट्ट होता. त्यानें आपल्या गुरुजींची पाठ वेतानें फोडली. तो तत्त्वज्ञानीं लोकांशीं चर्चा करी व शेतकर्‍यांच्या अंगांवर दारु ओतून त्यांना काडी लावून देई ! त्यानें अनाथांसाठीं अनाथालयें स्थापिलीं, पण स्वत:चा मुलगा अलेक्सिस याला आज्ञाभंगासाठीं मरेपर्यंत झोपडलें ! शरीररचनाशास्त्राचा तो अभ्यासी असल्यामुळें त्यानें पुढील विक्षिप्त प्रकार केला : त्याच्या एका वेश्येनें झारिनाची निंदा केल्याबद्दल त्यानें तिला शिरच्छेदाची शिक्षा दिली, तिचा वध झाल्यावर तिचें डोकें मागून घेऊन तिच्या थंडगार ओंठांचें चुंबन घेतलें आणि जमलेल्या लोकाना मानेमधील स्नायु व शिरा दाखवून त्याने शरीररचनेवर एक व्याख्यान झोडलें !

त्याला आपल्या प्रजेच्या मुंडक्यांशीं खेळण्याचें वेडच होतें. एकदां त्यानें एकाच वेळेस बारा हजार बंडखोर सैनिकांचीं धडें शिरापासून वेगळीं केलीं ! झारीना व्यभिचारीणि आहे हें कळल्यावर त्यानें तिच्या प्रियकराचें डोकें कापलें व तें अल्कोहॉलमध्यें बुडवून तिच्या टेबलावर जणूं पत्रलॉवरपॉट म्हणून ठेवलें ! तो झारिनाचाहि शिरच्छेद करणार होता; पण इतक्यांत स्वत:च आजारी पडून तो त्रेपन्नाव्या वर्षी (१७२५ सालीं) मेला. तेव्हां रस्त्यांतील लोक एकमेकांस म्हणूं लागले, ''मांजर मेलें; आतां उंदीर त्याला पुरतील.'' फ्रेडरिक दि ग्रेट लिहितो, ''हा पीटर म्हणजे एक शौर्यधैर्यसंपन्न पिशाच्चच होतें. मानवजातीचे सारे दोघ त्याच्या अंगीं होते, पण गुण मात्र फारच थोडे होते. शांतताकालीं दुष्ट, युध्दकालीं दुबळा, परकीयांनीं प्रशंसिलेला, प्रजेनें तिरस्कारिलेला हा राजा मूर्ख पण दैवशाली होता. सम्राटाला आपली अनियंत्रित सत्ता जितकी चालवितां येणें शक्य होतें तितकी त्यानें चालविली.''

मानवजातीची त्याला पर्वा नसे. तो जें कांहीं करी तें स्वत:च्या सुखासाठीं म्हणून करी. पण त्यानें केलेल्या अनेक खेळांत प्रजा साक्षर करणें हाहि एक हाता व त्यामुळें न कळत का होईना त्यानें स्वत:चें जणूं डेथ-वॉरंटच लिहिलें ! कारण, ज्ञानाचा आरंभ म्हणजेच अनियंत्रित सत्तेचा अंत. सेंटपीटर्सबर्गचा हा हडेलहप्प हुकूमशहाच पुढील रशियन राज्यक्रांतीचा आजोबा होय.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel