- ४ -
सेंट फ्रॅन्सिसला फारसें शिक्षण मिळालेलें नव्हतें. त्याच्या ठायीं लहान मुलाची श्रध्दा होती, तशीच निर्मळ व खरीखुरी भक्तिहि होती. तो मान्य करो वा न करो, प्राचीन काळच्या सर्वांभूतीं परमेश्वर मानणार्या तत्त्वज्ञान्यांप्रमाणेंच तोहि जणूं सर्वत्र प्रभु पाही. त्याला सर्वत्र चैतन्य दिसे. सर्व परस्परसंबध्द वाटे. हें सारें एकजीव आहे, जणूं एकाच दोर्यांत ओंवलेलें आहे, हे एकाच विराट देहाचे जणूं भिन्न भिन्न भाग आहेत असें त्याला वाटे. तो एकाद्या मुलाप्रमाणें पांखरांना आपली भावंडें मानी, वारा व सूर्य त्याला जणूं भाऊ वाटत व पृथ्वी म्हणजे जणूं सर्वांची प्रेमळ प्राणमय माताच वाटे. होमरकालीन प्राचीन लेखकांत हीच भावना सर्वत्र आढळते; प्राचीन कवी सर्वत्र चैतन्य व पुरुषत्व पाहत. प्राचीन ॠषी पृथ्वीला मानवांची माता व अनंत आकाशाची पत्नी मानून प्रणाम करीत. दुसर्याहि एका प्राचीन देशांत आपणांस हाच विचार आढळतो--अमेरिकेंतील इंडियन सूर्याला पिता मानीत, पृथ्वीला—या शस्यश्यामला पृथ्वीला-माता मानीत, सूर्याचें व वसुंधरेचें संगीत ऐकत. ते इंडियन, ते होमरप्रभृति कवि, ते सेंट फ्रॅन्सिस वगैरे संत, सारे सजीव व निर्जीव सृष्टींत प्राणमय संबंध पाहत. ते केवळ काव्य म्हणून असें मानीत असें नव्हे, तर त्याना तसा आन्तरिक अनुभवच येत असे. ते सारी सृष्टि जणूं मानवाच्या कुटुंबांत आणीत. हें करणें कोणाला बालिश वाटेल तर वाटो, पण त्यांत अनुपम माधुर्य तद्वतच सौंदर्य आहे यांत मुळींच संशय नाहीं. सेंट फ्रॅन्सिस पांखरांविषयींच बोलतो असें नव्हे, तर तो पांखरांबरोबरहि बोलतो. ज्या सारासिनांना ख्रिश्चन करण्यासाठीं तो गेला होता त्यांना भेटून परत येत असतां त्याला वाटेंत पक्ष्यांचा थवा भेटला. तेव्हां एकाद्या लहान मुलाप्रमाणें तो त्या पांखरांस म्हणाला, ''तुम्हीं येतां माझ्या धर्मांत ? तुम्ही ख्रिस्ताचीं व्हा, परस्परांस प्रेम द्या, भांडूं नका.'' तीं पाखरें गोड किलबिल करीत होतीं—नव्हे, जणूं त्याचें अंत:करणपर्वूक प्रेमळ स्वागतच करीत होतीं ! तो आनंदला, वेडा झाला. आपणांतहि पांखरांच्या संगीतापेक्षां अधिक दिव्य व मधुर संगीत आहे असें त्याला वाटे. ''माझ्यांतल्या संगीतानें मलाहि नाहीं का या पांखरांचें स्वागत करांत येणार ?'' असें मनांत येऊन तो प्रेमळ व गोड शब्दांत त्या पांखरांस म्हणाला, ''लहान भावंडांनो, प्रेमळ बहिणींनो, आतांपर्यंत मीं तुमची किलबिल ऐकली, आतां तुम्ही माझीं गीतें ऐका.'' आणि त्यानें त्या पंखवाल्या श्रोतृवृंदास आपलें प्रवचन ऐकविलें. त्यानीं आपले आत्मे वांचवावे, स्वत:चा उध्दार करून घ्यावा, असा उपदेश त्यानें त्यांना केला. चिकित्सक वाचकांस जरी हें सारें हास्यास्पद वाटलें तरी सेंट फ्रॅन्सिसनें आपल्या अग्निनारायण-बंधूला केलेलें आवाहन अत्यंत उदात्त आहे यांत शंकाच नाहीं. फ्रॅन्सिसची दृष्टि कमी होत होती. अजीबात अंधळें व्हावयास नको असेल तर एक डोळा लाल सांडसानें जाळून घ्या असें डॉक्टरांनीं सांगितलें व भट्टींतून लाल सांडस बाहेर काढला. फ्रॅन्सिस प्रेमळपणें उठला, एकाद्या प्रेमळ सजीव मित्राला बालावें तसें तो त्या लाल सांडसाला म्हणाला, ''अग्ने, हे बंधो, ईश्वरानें तुला बलवान्, सुंदर, उपयोगी बनविलें आहे; मजशीं नीट वाग; मला फार दुखवूं नको हो !''