मॅझिनी मानवजातीवर प्रेम करणारा होता. त्या प्रेमासाठीं त्याला भोगाव्या लागलेल्या हालांचा हा आरंभ होता. या वेळेपासून पन्नास वर्षेंपर्यंत मॅझिनीचा कैद, हद्पारी व इतर कष्ट सतत भोगावे लागले. त्याला एका किल्ल्यांत ठेवण्यांत आलें. तेथून समोर महासागर दिसे. महासागराचें भव्य दर्शन हा त्याला मोठा आधार होता. तो लिहितो, ''मी जेव्हां जेव्हां गजांच्या खिडकीपाशीं जाईं, तेव्हां तेव्हां अनंत अंबर व अगाध सिंधु हीं अनन्ततेचीं दोन प्रतीकें सदैव माझ्या डोळ्यांसमोर असत. सृष्टींतील तिसरी भव्य व उदात्त वस्तु म्हणजे आल्प्स पर्वत. त्याचे दर्शन मात्र मला येथून होत नसे.''  त्याच्या शांत व निस्तब्ध एकांतवासांतील चिंतनाला येथें त्याला भरपूर वेळ होता. मुक्त अशा संयुक्त युरोपच्या योजनेचा त्यानें येथें खूप विचार केला. त्याच्या लक्षांत आलें कीं, या ध्येयासाठीं कार्बोनरी संस्था निरुपयोगी होती. त्याला या संस्थेंतील गुप्तता व विधिसमारम्भ मुळींच आवडत नसत. मुक्त होताच एक नवीन संस्था काढण्याचें त्यानें ठरविलें. पोकळ बाह्य विधींपेक्षां प्रत्यक्ष क्रियात्मक चळवळींवर जोर देणार्‍यांची ती संस्था व्हावयाची होती. 'तरुण इटली' असें तिचे नाव ठेवण्यांत यावयाचें होतें. या संस्थेचे त्रिविध उद्देश होते : इटलीचें एकीकरण, इटलींत रिपब्लिकची स्थापना व सर्व युरोपचें-युरोपांतील सर्व स्वतंत्र व समान राष्ट्रांचें-फेडरेशन करणें.

१८३१ सालच्या फेब्रुवारींत तो मुक्त झाल्या; पण मुक्त होतांच 'देश सोडून जा' असें त्याला बजावण्यांत आलें. तो फ्रान्समध्यें गेला ! पण तेथेंहि स्वातंत्र्यवीरांना थारा नव्हता, त्यांची जरुरी नव्हती, असें त्याला आढळून आलें. त्याला फ्रान्समधून हांकून देण्यांत आलें. तेथून तो स्विट्झर्लंडमध्यें गेला. त्याची आमरण क्लेशयात्रा सुरू झाली.

स्विट्झर्लंडमधून तो कॉर्सिकाला गेला. तेथें त्यानें पवित्र कराराच्या संघाविरुध्द बंड करण्याची खटपट केली. तो स्वभावानें सौम्य होता. रक्तपातानें त्याच्या अंगावर कांटा उभा राही. हिंसा त्याला तिरस्करणीय वाटे. 'यंग इटली' या संस्थेच्या जाहीरनाम्यांत तो लिहितो, ''मोठमोठ्या क्रांत्या बागनेटांपेक्षां तत्त्वांनींच अधिक यशस्वी होत असतात. .... अंध पाशवी बळानें विजयी वीर, हुतात्मे व ठार मरणारे मिळतील; पण अशा विजयांतून पुढें जुलूमशाहीच उत्पन्न होते.''  पण गांधी ज्याप्रमाणें केवळ सत्याच्या व अहिंसेच्या शस्त्रांवर विसंबून होते त्याप्रमाणें मॅझिनी नव्हता. अजिंक्य अशा ध्येयरूपी तलवारीवर सर्वस्वीं विसंबून राहण्याइतका आत्मविश्वास अगर धीर मॅझिनीच्या ठायीं नव्हता. त्यानें भौतिक शास्त्रांचा आधर घेतला व मग अधिक प्रभावी भौतिक शस्त्रांनीं त्याचा पराजय केला. इटलीचें एकीकरण करण्यांत त्याला यश आलें; पण इटलींत रिपब्लिक येण्याऐवजीं इटलींत-संयुक्त इटलींत--राजशाही आली.

- २ -

इटलींत राजशाही आली या गोष्टीला मॅझिनीनें मोठ्या दु:खानें मान्यता दिली; पण त्यास ध्येय म्हणून ही गोष्ट पसंत नव्हती.तो लिहितो, ''मी मोठ्या दु:खानें राष्ट्राच्या इच्छेपुढें मान नमवीत आहें. पण राजशाहीच्या अनुयायांत वा सेवकांत मात्र माझी गणना करतां येणार नाहीं.''  आपल्या ध्येयाचा शेवटीं विजय होईल अशी त्याची श्रध्द होती. तो म्हणतो, ''भविष्यकाळच माझी श्रध्द सत्यावर आधारलेली होती कीं नव्हतीं हें ठरवील.''  त्याच्या महत्त्वाकांक्षेचा निम्मा भाग पूर्ण झाला होता. इटलीचें एकीकरण झालें होतें;  पण इटलीचें हें शरीर अद्यापि बंधनांतच होतें. मॅझिनीचें इटलीवर प्रेम होतें; पण देशापेक्षां त्याला स्वातंत्र्य अधिक प्रिय होतें. स्वत:च्या देशांतून त्याला हद्दपार करण्यांत आलें होतें. तो जगाचा नागरिक झाला होता. त्याची राष्ट्रीयता म्हणजे आंतरराष्ट्रीयतेचा आरंभ होता. त्याची राष्ट्रीयता त्याला आंतरराष्ट्रीयतेकडे नेणारी होती. वुइल्यम लॉइड गॅरिझन लिहितो, ''त्याच्या आत्म्याचा पूर्ण विकास झाला होता. त्याचें स्वातंत्र्यप्रेम जाति वा देश यांनीं मर्यादित नव्हतें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel