प्रकरण २ रें
हंसरा, दु:खवादी एपिक्यूरस
- १ -
कसें मारावें हें माणसांना अलेक्झांडरनें शिकविलें ; कसें जगावें हें त्यांना तत्त्वज्ञान्यांनीं शिकविलें. १९१४ सालच्या महायुध्दामुळें ज्याप्रमाणें तरुण पिढीच्या डोळ्यांवरील भ्रमपटलें दूर झालीं, त्याचप्रमाणें प्राचीन काळीं अलेक्झांडरच्या जागतिक युध्दामुळें नवीन पिढी निर्भ्रान्त झाली. जे संशयात्मे होते ते जीवनाच्या मूल्यांविषयीं व देवाच्या विचित्र लहरींविषयीं प्रश्न करूं लागले. जे निरर्थवादी होते, कशांतच कांही अर्थ नाहीं असें म्हणणारे होते, ते सर्व मानवी आशा-आकांक्षांची टर उडवूं लागले. विरून जाणार्या चंचल ढगांच्या पाठोपाठ पळत जाण्याप्रमाणें, मावळणार्या इन्द्रधनुष्याच्या पाठीमागें लागण्याप्रमाणें, या आपल्या आशा-आकांक्षा निष्फळ ठरणार आहेत, म्हणून त्यांच्यासाठीं धडपडण्यांत कांही अर्थ नाहीं असें ते म्हणत. निराशावादी व दु:खवादी तत्त्वज्ञानी तर याच्याहि पलीकडे जाऊन म्हणत, ''हें जीवन जरी कितीहि सुखमय व आनंदपूर्ण दिसलें तरी तेथे दु:खाची नांगी आहेच ; अत्यंत आनंदाच्या क्षणांतहि दु:ख लपलेलें असतें ; प्रत्येक फुलांत डंख मारणारी गांधीलमाशी असते ; प्रत्येक सुखाभोंवती दु:खाचा विळखा असतो ! दोन झोंपांमधलें एक अत्यंत कटू स्वप्न म्हणजे जीवन ! जीवनाआधीं शून्य ! जीवनांनंतरहि शून्य ! दोन शून्यावस्थांमधला क्षणिक बुडबुडा म्हणजे जीवन ! हा बुडबुडा जितक्या लवकर फुटेल, हें स्वप्न जितक्या लवकर विराम पावेल, भंगेल, तितकें चांगलेंच.'' हेगेसियस नांवाचा एक अत्यंत निराशावादी व दु:खवादी तत्त्वज्ञ होता. तरुणांनीं करण्यासारखी सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे आत्महत्या हें आपल्या विद्यार्थ्यांस पटवून देण्यासाठीं तो सारखी खटपट करी. ही गोष्ट प्रतिपादण्यांत त्यानें आपलें सारें आयुष्य वेंचिलें ; पण तो स्वत: मात्र ऐशीं वर्षांचा होऊन अगदीं स्वाभाविकपणें हें जग सोडून जाण्याची पाळी येईपर्यंत जगला ! आत्महत्या करा असें तो लोकांना सांगे ; पण त्यानें स्वत: मात्र कधींच आत्महत्येचा प्रयत्नहि केला नाहीं. त्याला जेव्हां कोणीं तरी प्रश्न केला कीं, 'जें तुम्ही लोकांना उपदेशितां तें स्वत:च कृतींत कां आणीत नाहीं ?' तेव्हां त्यानें उत्तर दिलें, ''मला माझ्या इच्छेविरुध्द मोठ्या कष्टानें व दु:खानें जगावें लागत आहे. मरणें किती चांगलें हें लोकांना पटवून देण्यासाठीं तरी जगणें मला भाग आहे ! काय करावयाचें ?''
- २ -
या तत्त्वज्ञान्यांच्याविरुध्द दुसरा एक अशा तत्त्वज्ञान्यांचा वर्ग होता कीं, त्यांना निरर्थक दिसणार्या या जीवनांतहि आशा-तंतु दिसल्यासारखा वाटे. जीवनाच्या या अर्थहीन दिसणार्या विणावटींतहि बुध्दिमान् अशा विणकराचा हात दिसतो असें ते म्हणत. या जीवनांत कांही तरी हेतुमयता, योजकता आहे, हें अगदींच नि:सार व पोकळ नाहीं, यांत थोडाफार अर्थ आहे, असें त्यांना वाटे. ते 'सर्वसह' वादी स्टोइक म्हणत कीं, ''हें जीवन आशीर्वादरूप आहे. आपणांस जीं संकटें वाटतात तीं वस्तुत: दु:खरूप नसून आपलें मन अधिक खंबीर व गंभीर व्हावें, अधिक सामर्थ्यसंपन्न व काटक व्हावें म्हणून आपल्या मार्गांत मुद्दाम टाकलेले अडथळे असतात ; त्या संकटांतहि आईची मंगल कृपाच असते. जे पापाची शक्ति मान्य करतात, त्यांच्यावरच जगांतल्या दु:खांची व जगांत जें जें असत् आहे त्याची सत्ता चालू शकते ; पापाची शक्ति मान्य करणारांनाच पाप अपाय करूं शकतें ; भुताला भिणार्यांच्याच छातीवर भूत बसतें. दु:खाला स्वत:ची अंगभूत शक्ति नाहीं. दु:खानें रडणारा कोणीच न भेटला तर दु:ख काय करील ? तुमच्या दुबळेपणामुळेच दु:ख प्रबळ आहे.