प्रकरण ३ रें
नवसृष्टीचा निर्माता शेक्सपिअर
- १ -

एक लाख वर्षेंपर्यंत निसर्ग मानवाचे निरनिराळे नमुने बनवीत होता, मानवांवर प्रयोग करीत होता. शेवटीं १५६४ सालीं सर्व संमीलित ज्ञान एकत्र ओतून निसर्गानें एक मूर्ति जन्माला घातली, ती शेक्सपिअर ही होय.

या जगांत अनेक अनाकलनीय गूढें असतात. शेक्सपिअरसारख्यांची अलौकिक बुध्दि हें एक गूढच आहे. शेक्सपिअरचे आईबाप सामान्यांहून सामान्य होते. त्याच्या पित्याला स्वत:ची सहीहि करतां येत नसे. तो मोजे विणी, लोंकर पिंजी. तो एका अज्ञात कुटुंबांत जन्मला, आकाशांत तेजानें तळपला; त्याच्या वंशांत पुन: पुढें कोणीहि चमकलें नाहीं. शेक्सपिअरच्या पूर्वी आणि नंतरहि त्याचें कुळ अज्ञातच होतें. त्याला तीन मुली होत्या. त्यांपैकीं दोघी दहा जणींसारख्या होत्या; पण तिसरी मात्र अगदींच अडाणी होती.

शेक्सपिअर म्हणजे निसर्गाची एक लहर होती. निसर्गाच्या हातून ही व्यक्ति नकळत जन्माला घातली गेली. तो मानवांत अतिमानुष, देव होता. त्याच्या मनाची खोली कार्लाइललाहि कळली नाहीं; जॉर्ज ब्रँडिसनेंहि त्या कामीं हात टेंकले. आणि कोणाहि टीकाकाराला तिचा अंत लागणार नाहीं, असें म्हणण्याचें धाडस मी करतो. शेक्सपिअर समजून घेणें म्हणजे सृष्टीचें गुंतागुंतीचें गूढच समजून घेणें होय. जीवनाचा हा जो विराट् खेळ चालला आहे, जीवनाचें हें जें विराट् नाटक चाललें आहे, तेंच शेक्सपिअरनें थोडक्यांत आपल्या नाट्यसृष्टींत निर्मिलें आहे. त्याचीं नाटकें म्हणजे सृष्टीची प्रतिनिर्मिति आहे. अमेरिकन कवि व तत्त्वज्ञानी सन्तामना एका सुनीतांत म्हणतो, '' शेक्सपिअरला निर्मून ईश्वरानें सृष्टि दुप्पट केली.''

शेक्सपिअरला जणूं देवाची बुध्दि व देवाची भाषा लाभल्या होत्या ! पण बाह्यत: मात्र त्याचें जीवन अगदीं निराळें होतें. या कविसम्राटाचें जीवन जगांतील अत्यंत नीरस जीवनासारखें होतें. वयाच्या चौदाव्या वर्षी तो एका खाटकाजवळ उमेदवार म्हणून राहिला. त्याच्या वयाच्या अठराव्या वर्षी सव्वीस वर्षांच्या एका बाईनें त्याला किंवा त्यानें तिला मोह पाडला. तिचें नांव अ‍ॅन हॅथावे. तिच्याशीं लग्न झाल्यावर लवकरच स्वत:चें स्ट्रॅटफर्ड गांव त्याला सोडावें लागलें. कारण हरणें चोरण्याच्या आरोपावरून त्याला अटक होणार होती. लंडनला आल्यावर तो रंगभूमीकडे वळला. तो सतरा वर्षे नाटकें लिहीत होता. नाटकांत बारीकसारीक कामहि तो करी. रंगभूमीवर काम करण्याबाबत तो उदासीन होता. आपलीं सारीं नाटकें छापून काढावीं असें त्याला कधींहि वाटलें नाहीं.

धंद्यांत त्यानें कमाई केली व तो थोडीफार सावकारी करूं लागला. ॠणकोनीं वेळेवर पैसे न दिले तर तो फिर्यादी करी. तो दरसाल एकदां कुटुंबीयांना भेटावयास जाई. आयुष्याच्या अखेरीस त्यानें स्ट्रॅटफर्ड येथें एक घर विकत घेतलें व तेथें तो मरेपर्यंत एकाद्या सुखवस्तु गृहस्थाप्रमाणें राहिला.

रंगभूमीवरील काम करणारे वागत तसाच तोहि वागे. तें वागणें मोठेंसें सुसंस्कृत अगर सदभिरूचीला पोषक होतें असें मुळींच नव्हे. एकदां तर त्यानें इतकी दारू घेतली कीं, तो रस्त्याच्या कडेला एका झाडाखालीं झिंगून पडला ! प्रेमाची विफलताहि त्यानें अनुभविली होती. तो आपल्या एका सुनीतांत लिहितो, ''माझी प्रियकरीण जेव्हां 'मी सत्यनिष्ठ आहें' असें सांगते, तेव्हां मी तिच्यावर विश्वास ठेवतों. पण ती खोटें बोलत आहे हें मला ठाऊक असतें.''  नारीजनांना आकर्षण वाटेल असा पुरुष तो नव्हता, पण कधीं कधीं आपल्या प्रतिस्पर्ध्यांना तो प्रेमस्पर्धेत जिंकी. टूले नामक एका तत्कालीन अभिनय करणार्‍यानें १६०२ सालीं शेक्सपिअरची म्हणून एक आठवण दिली आहे : शेक्सपिअरचा बरबॅज म्हणून एक नाटकी मित्र होता. त्याचा एका नागरिकाच्या पत्नीशीं संबंध होता. पण एके दिवशीं शेक्सपिअर तिच्याकडे गेला तेव्हां तिनें त्याचें स्वागत केलें व बरबॅज आला तरी ती व शेक्सपिअर रंगांत असल्यामुळें बरबॅज बिचारा बाहेरच उभा राहिला ! शेक्सपिअरनें निरोप पाठविला, ''तिसर्‍या रिचर्डच्या आधीं वुइल्यम दि काँकरर आला होता.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel