त्याच्या इतर अद्भुत कथाहि सर्वांना 'हंसा' म्हणून सांगत आहेत. स्वत:ची दु:खें व स्वत:चा मूर्खपणा पाहून हंसा, असें तो लोकांना सांगत आहे, 'निसर्गाचा विद्यार्थी' (The Pupil of Nature) या पुस्तकांत अशिक्षित व जंगली मनुष्याच्या निरोगी मनाची सुधारलेल्या माणसाच्या विकृत व गुंतागुंतीच्या मनाशीं तुलना केली आहे. एक हुरॉन इंडियन फ्रान्समध्यें आला आहे. त्याच्या आत्म्याचा उध्दर व्हावा म्हणून मिशनरी त्याला ख्रिश्चन करूं पाहतात. तो नव्या कराराचा अभ्यास करून म्हणतो, ''माझी सुंताहि करा व मला बाप्तिस्माहि द्या. बायबलांतील सर्वांची सुंता केली आहे. ख्रिश्चन होण्याआधीं प्रत्येकानें ज्यू झालें पाहिजे !''

त्याला सर्व उलगडा करण्यांत येतो व तो पुढचें पाऊल टाकण्यास तयार होतो. बाप्तिस्म्यासाठीं तो मानेपर्यंत नदीच्या पाण्यांत शिरतो. ख्रिश्चनांना अशा रीतीनें बाप्तिस्मा द्यावयाचा नसतो असें जेव्हां त्याला सांगण्यांत येतें तेव्हां तो आपले खांदे उडवितो व पुन: कपडे घालून पापांची कबुली देण्यासाठी धर्मोपदेशकाकडे जातो. पापांचा पाढा वाचून झाल्यावर तो त्या धर्मोपदेशकास खुर्चीवरून खालीं ओढतो व आपण त्याच्या जागीं बसून त्याला स्वत:ची पापें कबूल करावयास सांगतो. तो इंडियन त्या धर्मोपदेशकाला आग्रहपूर्वक म्हणतो, ''बायबलांत असें सांगितलें आहे कीं, एकमेकांनीं एकमेकांजवळ आपापलीं पापें कबुल करावीं.''

पुन: गोंधळांत पाडणारीं विवरणें त्या इंडियनांस सांगण्यांत येतात तो तुच्छतापूर्वक म्हणतो : ''बायबलांत न सांगितलेल्या अनंत गोष्टी तुम्ही येथें करीत आहां; आणि त्यांत जें करा म्हणून सांगितलें आहे तेंच नेमकें तुम्ही करीत नाहीं. मला हें कबूल केलेंच पाहिजे कीं, हें सारें पाहून मला आश्चर्य वाटतें व रागहि येतो.''

गोष्ट पुढें चालू राहते. हुरॉनचा संस्कृतीशीं संबंध आल्यामुळें कोणकोणत्या संकटांतून व अपत्तींतून त्याला जावें लागतें याची सारी हकीकत सांगण्यांत आली आहे. नाना साहसाच्या गोष्टी हुरॉनला कराव्या लागतात. तो शेवटीं अशा निर्णयाला येतो कीं, सैतानाची इच्छा होती म्हणून त्यानें आपणास सुसंस्कृत ख्रिश्चन केलें. तो म्हणतो, ''या सुसंस्कृत ख्रिश्चनांनीं मला ज्या रानटी पध्दतीनें वागविलें त्या पध्दतीनें माझ्या अमेरिकन बंधूंनीं मला कधींहि वागविलें नसतें. इंडियन रानवट असतील, सुधारलेले नसतील; पण या गोर्‍यांच्या देशांतील लोक तर सुधारलेले पशू आहेत !''

व्हॉल्टेअरच्या सर्व गोष्टींतून हे असेच प्रकार आहेत. या गोष्टींशीं तुलना करण्यासारखें वाङमयांत दुसरें नाहीं. या गोष्टींना संविधानकच नाहीं. व्हॉल्टेअरच्या तत्त्वज्ञानाच्या धाग्याभोंवती गुंफलेली, नाना असंबध्द संविधानकांची ही एक मालिका आहे. त्याच्या गोष्टींतील नायक शेतकर्‍यांच्या मुलींशीं, राण्यांशीं, मोठमोठ्या इस्टेटींच्या वारसदारणींशीं लग्न करतात. त्याचे डोळे जातात तरीहि ते सुखी असतात. ते म्हणतात, ''डोळे गेले तरी आम्ही तत्त्वचिंतन करीत बसूं, अंतर्मुख होऊं. त्यांचा प्रेमभंग होतो. त्यांना दु:ख इतकेंच कीं, या बाबतींत ते तत्त्वचिंतन करूं शकत नाहींत. संकटांत सांपडलेल्यांस ते साह्य करतात; पण त्यांच्यावर संकट आलें असतां त्यांना लाथा मिळतात. पण त्यांनीं गुन्हे केले म्हणजे त्यांना संपत्ति मिळते, मानसन्मान लाभतात. थोडक्यांत सांगावयाचें तर मानवी जीवनाच्या या सर्व लुटूपुटीच्या नाटकांतलीं ही पात्रें व्हॉल्टेअरबरोबर हिंडतात; व्हॉल्टेअर दोर्‍या ओढून त्यांना आपल्या अतिचपल बोटांनीं नाचवील तशीं तीं नाचतात. व्हॉल्टेअरचा विनोद म्हणजे अखंड वाहणारी विहीर आहे. त्या विनोदाच्या विहिरीला अंतच नाहीं. पण या विनोदाच्या विहिरींत पाणी नसून मद्य आहे. त्याला जीवनांतील विनोदाचा कैफ चढतो. तो आपल्या तेजस्वी विचारांनीं सार्‍या जगाला गुंगवून टाकतो, दिपवून सोडतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel