तो घरींच शिकला. त्याचा बाप ग्रीक व लॅटिन या भाषांचा पंडित व शिस्तीचा मोठा भोक्ता होता. पित्यानें एक अभ्यासक्रम आंखला व तो मुलाकडून पुरा करून घेतला; पण या अभ्यासानें त्याची बुध्दि प्रगल्भ झाली तरी कल्पना-शक्ति मात्र वाढली नाहीं. गटेची आई साधी, सरळ, सुंदर, आनंदी, बहुश्रुत व मनमोकळी होती. तिनें बरेंच वाचलें होतें. गटे जन्मला तेव्हां ती फक्त अठरा वर्षांची होती. ती स्वत:च रचलेल्या गोष्टी मुलास सांगे व त्यांतील पात्रें निर्माण करण्यांत तद्वतच त्यांचीं संविधानकें तयार करण्यांत त्याची मदत घेई. उत्तेजन देऊन तिनें गटेच्या ठायीं काव्यात्मक शक्ति जागृत केली. गटे म्हणतो, ''जीवनाची गंभीर दृष्टि मी पित्याजवळून घेतली व गोष्टी सांगण्याचें प्रेम मातेजवळून घेतलें.''
गटेनें कायद्याचा अभ्यास करावा अगर प्राध्यापक व्हावें असें त्याच्या पित्यास वाटे; पण गटेला कायद्याची वा अध्यापनाची आवड नव्हती. वडील नाखुष होऊं नयेत म्हणून तो १७६५ सालीं लीपझिंग-विद्यापीठांत दाखल झाला; पण स्वत:ला राजी राखण्यासाठीं, पुस्तकांचा विद्यार्थी होण्याऐवजीं तो जीवनाचा विद्यार्थी झाला. त्याचा बाप सुखवस्तु होता; तो त्याला भरपूर पैसे पाठवून देई. त्यामुळें त्याला विवंचना माहीत नव्हती. गटे घरच्या रुढिमय जीवनाचीं बंधनें तोडून उड्डाण करूं इच्छीत होता. जगांतील जीवनाच्या बेछूट वाटांनीं तो जाऊं लागला व प्रयोग करूं लागला. त्याला गुरुजनांविषयीं यत्तिंच्चित् सुध्दां आदर वाटत नसे. आपल्या प्राध्यापकांच्या इतकेंच आपणालाहि देवाविषयीं व जगाविषयीं ज्ञान आहे असें गटेला वाटे. वर्गाची खोली सोडून लोकांच्या घरीं गेल्यास अधिक ज्ञान व अनुभव मिळवितां येतील अशी त्याची समजूत होती. ''लोकांच्या संगतींत, बैठकींत, नाचगानांत, नाटकें पाहण्यांत, मेजवान्यांत व रस्त्यांतून ऐटीनें हिंडण्यांत वेळ कसा छान जातो ! वेळ किती पटकन् निघून जातो हें समजतहि नाहीं ! खरेंच, किती सुंदर काळ जातो हा ! पण खर्चहि फार होतो. माझ्या पिशवीवर किती ताण पडतो हें सैतानालाच माहीत !'' असें गटे म्हणे.
या वेळच्या गटेच्या असंयमी व उच्छृंखल जीवनाविषयीं त्याचा एक विद्यार्थी बंधु लिहितो, ''झाडांवर अगर दगडांधोंड्यांवरहि एक वेळ परिणाम करतां येईल; पण गटेला शुध्दीवर आणणें कठिण आहे.'' पण तो आपण होऊन शुध्दीवर आला. तो जन्मभर मदिरा व मदिराक्षी यांच्या बाबतींत प्रयोग करीत होता. जे अनुभव येत त्यांचें तो काव्यांत रूपांतर करी व ते अमर करी. लीपझिग येथील समाजाविषयीं जें कांहीं शिकण्याची जरुरी होती तें सारें शिकून त्यानें लीपझिग सोडलें व तो एकान्तासाठीं खेड्यांत गेला. तेथें तो दूरवर फिरावयास जाई, शेक्सपिअर व होमर वाची आणि स्वत:ची काव्यमय स्वप्नें मनांत खेळवी.
गटेचें जीवन-ध्येय एकच होतें. काव्य हा त्याचा आत्मा होता; त्यासाठींच त्याचें जीवन होतें. त्यानें अगदीं बालपणांतच वाङ्मयीन कार्याला सुरुवात केली होती. वयाच्या सतराव्या वर्षी त्याचें पहिलें नाटक प्रसिध्द झालें. या सतरा वर्षांच्या मुलानें कोणत्या विषयावर नाटक लिहिलें असेल ? 'विवाहितांचे व्यभिचार व दुष्ट प्रकार' यावर ! नाटकाचें नांव 'पाप-बंधुं.' या नाटकांतील चर्चा, प्रश्नोत्तरे, वादविवाद, वगैरे सतरा वर्षांच्या तरुणानें लिहिणें आश्चर्यकारक वाटतें. तारुण्यांत लिहिलेल्या कोणत्याहि पुस्तकांत शिकवण असते, तशी यांतहि आहे. जन्मभर पापें केलेल्या व तदर्थ फळें भोगणार्या वृध्द, दु:खीकष्टी, उदासीन लोकांचें शहाणपण हें या नाटकाचें थोडक्यांत सार अगर तात्पर्य आहे. लीपझिगचा हा तरुण तत्त्वज्ञानी मोठ्या दुढ्ढाचार्याचा आव आणून म्हणतो, ''बहुधा आपण सारेच अपराधी आहों. आपण सारेच चुकतों, पापें करतों. म्हणून सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे सर्वांनीं एकमेकांस क्षमा करणें व सर्वांनीं एकमेकांचें विसरणें.''
लीपझिग येथें गटे अगदीं स्वच्छंदपणें वागत होता. तेथें रात्रंदिवस चाललेल्या विषयोपभोगांमुळें गटे जवळजवळ मरणार असें वाटलें. १७६८ सालच्या उन्हाळ्यांत तो रक्तस्त्रावानें बराच आजारी पडला. तो बरा होणार कीं नाहीं याची शंका वाटत होती; पण तो बरा झाला व अंथरूण सोडून हिंडूंफिरू लागला. आपल्या बाबतींत निराश झालेल्या पित्याला व आपणावर खूप प्रेम करणार्या मातेला भेटावयासाठीं तो घरी गेला. पुत्र वकील व्हावा अशी पित्याची इच्छा होतीं; पण तो झाला कवि !