तो जरा अहंमन्य, चिडखोर व अभिमानी होता. स्वत:च्या मतांपेक्षां वेगळीं मतें असणार्यांकडे तो उपहासात्मक असहिष्णुतेनें पाही, त्यांना तुच्छतेनें वागवी. तो नेहमीं जणूं तापलेला असे, प्रक्षुब्ध असे ! वाद करावयासाठीं त्याच्या अस्तन्या जणूं सरसावलेल्या असत ! तो जणूं लढाईच्या पवित्र्यांत उभा असे ! पण विसांवा घेण्याच्या वृत्तींत असतां, वादळ शमलेलें असतां, तो अत्यंत प्रेमळ, शांत, कोमल, गोड, स्वागत करणारा, दयाळू नि:स्वार्थी व दंभहीन दिसे.
घरांत नेहमींच चणचण असल्यामुळें तो चिडखोर बनला होता. ऑटो रुहल 'कार्ल मार्क्स' या पुस्तकांत लिहितो, ''सहा जणांचें तें कुटुंब लहानशा दोन खोल्यांत खुराड्यांत राहावें तसें राहत असे. उद्यां पोटाला मिळेल कीं नाहीं, याची रोज विवंचना असे. कपटे, बूट, हे सुध्दां गहाण पडले ! बाहेर जाऊन यावयास कोटहि नसल्यामुळें मार्क्सला घरांतच बसून राहावें लागे.
१८५२ चा ईस्टरचा दिवस. त्या दिवशीं त्याची एक मुलगी देवाघरीं गेली. मुलीची आई लिहिते, ''लहानगी फ्रॅन्सिस्का आजारी पडली. खोकला व ताप यांचा खूप जोर होता. ती तीन दिवस मृत्यूशीं झगडत होती. गरीब बिचारी ! तिला किती तरी कष्ट होत होते, वेदना होत होत्या ! आणि पुढें सारें संपलें ! तिचें तें चिमणें शरीर पाठीमागच्या लहानशा खोलींत होतें. आम्ही सर्व पुढच्या खोलींत आलों. रात्रीं सर्व जण खालीं फरशीवरच झोंपलों होतों... आम्ही अत्यंत विवंचनेंत असल्या वेळीं हें लाडकें बाळ आजारी पडलें व गेलें. ...एका फ्रेंच निर्वासितानें मला दोन पौंड दिले त्यांतून मीं शवपेटी विकत घेतली व त्या पेटींत आतां बाळ शांतपणें विश्रांति घेत आहे. ही मुलगी यां जगांत आली तेव्हां तिला पाळणाहि नव्हता आणि ती जगांतून निघाली तेव्हां तिच्यासाठीं शवपेटीहि मिळणें कठिण होतें.''
कार्ल मार्क्सच्या घरीं दारिद्र्य, भूक, उपासमार, रोग, ही मंडळी वरचेवर येऊं लागली. तो त्या शतकांतील मोठ्यांतल्या मोठ्या लेखकांपैकीं एक होता. पण त्याला लेखणीनें उपजीविका करणें अशक्य झालें. कारण, तो एक नवीन धर्म देत होता, नवीन धर्माचें तेजस्वी वाङ्मय विकूंच् इच्छीत होता. तें कोण घेणार ? नवीन धर्माचा शोध करणार्याचें काम मोठें कठिण असतें; त्याला मोबदला मिळत नसतो, कृतज्ञता मिळत नसते. मार्क्सचे जुन्या मूर्ती फोडून टाकणारे क्रान्तिकारक विचार वाचावयाला क्वचितच कोणी तयार असत. आणि पैसे देऊन ते विकत घ्यावयाला तर जवळजवळ कोणीच तयार नसे.
नवधर्म देणार्या प्रेषितानें कधींहि लग्न करूं नये. ज्याला हातांत क्रॉस घ्यावयाचा आहे, ज्याला हौतात्म्य पसंत करावयाचें आहे, त्यानें आपल्या आपत्तीचें ओझें आपल्या लहान मुलांच्या लहान खांद्यांवर देणें बरें नव्हे. फ्रेडरिक एंजल्सची कायमची मधुर व निरपेक्ष उदारता न मिळती तर मार्क्सचें सारें कुटुंब मातींत गेलें असतें. एंजल्स हा आपल्या बापाच्याच कारखान्यांत बुक-कीपर होता. तो स्वत: फारसें मिळवीत नव्हता, तरीहि मार्क्सच्या अत्यंत निकडीच्या गरजा भागविण्यासाठीं तो पुन: पुन: पैसे देई. पण मार्क्सची गरज कधींच पुरी होण्यासारखी नव्हती. जेवढें येई तेवढें हवेंच असे. मार्क्स व त्याचें कुटुंब यांसाठीं एंजल्सनें मनापासून केलेला त्याग ही मानवजातीच्या इतिहासांतील सोन्याच्या अक्षरांनीं लिहून ठेवण्यासारखी गोष्ट आहे. त्यांची आमरण मैत्री होती. मार्क्स एंजल्सकडे पुन: पुन: मागे व एंजल्सच्या मदतीचा प्रवाहहि सारखा अखंड त्याच्याकडे वाहत राही. एंजल्स कधीं रागावला नाहीं कीं त्यानें कधीं 'नाहीं' म्हटलें नाहीं. एका पत्रांत मार्क्स लिहितो, ''पुन: तुमच्याजवळ मदत मागण्यापेक्षां माझा अंगठा मी तोडून टाकीन.'' आणि त्या पत्राचें उत्तर म्हणून एंजल्सनें दहा पौंडांचा चेक पाठविला; दुसरा एक पंधरा पौंडांचा चेक त्यानें पुन: पाठविला; नंतर पुन: नाताळची भेट म्हणून त्यानें पंचवीस पौंडांचा चेक पाठविला; आणि हें असें सारखें चालू असे.
एंजल्सच्या मार्क्सबरोबर असलेल्या मैत्रीकडे एंजल्स कोणत्या दृष्टीनें पाही ? मानवजातीच्या मुक्ततेसाठीं केलेली ती जणूं धंद्यांतली भागीदारी होती ! एंजल्सनें मार्क्स जिवंत राहावा म्हणून मदत केली आणि मार्क्स 'श्रमजीवी लोकांचें तें बायबल'--'कॅपिटल'--लिहीत राहिला.
आर्थिक प्रश्नांच्या रूढ विचार-प्रक्रियेंत ज्या महाग्रंथानें बाँब टाकला, त्या ग्रंथांतील मुख्य गाभा आपण थोडक्यांत पाहूं या.