जेव्हां सायरसनें आपले दिग्विजय सुरू केले, तेव्हां क्रोशियसला मनांत वाटलें, कीं त्याच्याआधीं आपणच दिग्विजयाची दौड मारावी. म्हणून त्यानें देवाला कौल लावून विचारलें, ''इराणच्या सम्राटाबरोबर लढाई पुकारली तर तें शहाणपणाचें होईल कीं मूर्खपणाचें ?'' परंतु देवानें नेहमीप्रमाणें द्वयर्थी उत्तर दिलें. देवानें सांगितलें, 'जर तूं सायरसच्याविरुध्द जाशील तर मोठें साम्राज्य नष्ट करशील.' याचा अर्थ सायरसचें साम्राज्य नष्ट होईल किंवा स्वत: क्रोशियसच आपलें साम्राज्य गमावील असा होतो. देवानें दिलेला निर्णय निर्दोष होता. या ना त्या बाजूनें देवाचें म्हणणें खरेंच होणार होतें. देवाने दिलेला कौल नेहमींच खरा होत असतो.
परंतु देवानें दिलेल्या उत्तराचा क्रोशियसनें स्वत:ला अनुकूल असा अर्थ लाविला. क्रोशियसनें असा अर्थ लावला, कीं जर आपण सायरसशीं लढाई केली तर आपण विजयी होऊं व सायरसचें साम्राज्य रसातळास जाईल. समतोल विचारसरणीच्या व डोकें शाबून असलेल्या त्याच्या एका प्रधानानें युध्द करूं नका असें सांगितलें. तो म्हणाला, ''युध्द करून कांहीहि मिळणार नाहीं. उलट सारें गमावून बसाल. युध्द ही भयंकर गोष्ट आहे, तशीच ती मूर्खपणाचीहि आहे. युध्द ही गोष्ट निसर्गाच्या व्यवस्थेच्या विरुध्द आहे. कारण युध्दामुळें बापांना मुलांची प्रेतक्रिया करावी लागते. वास्तविक मुलांनी वडिलांना मूठमाती द्यायची असते, परंतु युध्दामुळें हे असे विपरीत प्रकार होतात. युध्द ही अनैसर्गिक वस्तु आहे.''
परंतु क्रोशियसनें तो उपदेश झिडकारला. त्यानें सायरसवर स्वारी केली. त्याचा पराजय झाला. घाईघाईनें तो आपल्या सार्डिस राजधानीस परत आला. परंतु सायरस पाठीवर होताच. त्याने सार्डिस शहराला वेढा घातला व फार त्रास न पडतां ती राजधानी जिंकली.
सायरसनें क्रोशियसला कैद केलें. आशियामायनरमधील ग्रीकांना शरण आणण्यासाठीं हार्पागॉस (या नांवाचा अर्थ 'लुटणारा' असा आहे.) नांवाच्या आपल्या अधिकार्यास मागें ठेवून सायरस पूर्वेस खाल्डिआकडे दिग्विजयार्थ निघाला. बाबिलोन ही खाल्डियाची राजधानी. बाबिलोन अति सुंदर शहर होतें. किती भव्य प्रासाद, किती उद्यानें-उपवनें ! तेथील स्त्री-पुरुष अत्यंत सुसंस्कृत होते. लंडनच्या आकारचीं पांच शहरें मावतील एवढा बाबिलोनचा विस्तार होता. आजच्या न्यू यॉर्कमधील सुधारणा व संस्कृति यांशीं शोभेल अशा तेथील सुधारणा व संस्कृति होत्या. बाबिलोनमध्यें न्यू यॉर्कपेक्षां धांवपळ कमी असेल, गति, वेग जरा कमी असेल, परंतु सदभिरुचि व सुसंस्कृतता यांत कमीपणा नव्हता. तें शहर एका विस्तृत मैदानाच्या मध्यभागीं वसलेलें होते. शहराभोंवतीं साठ मैल घेराच्या प्रचंड भिंती होत्या. त्या भिंतींना धातूंचे भक्कम दरवाजे होते.