नीरोच्या नव्या लीलांचा हा नुसता प्रारंभ होता.  या अग्नि-दिव्य-संगीताच्या नाटकाचा त्यानें सुरू केलेला दुसरा अंक त्याच्यावाचून दुसर्‍या कोणासहि करतां आला नसता.  नव्या ख्रिश्चन धर्मीयांनीं रोमला ही आग लावली असा आरोप त्यानें त्यांच्यावर केला व त्यांना भव्य-दिव्य शिक्षा देण्याचें ठरविलें.  रोम शहरांतहि शिक्षेचा असा अतिमानुष प्रकार पूर्वी कधीं झाला नव्हता.  रोमच्या त्या भव्य क्रीडांगणांत त्या दिवशीं मशालींची मोठी आरास करण्यांत आली होती व ती पाहण्यासाठीं सार्‍या शहरवासीयांना बोलावण्यांत आलें होतें.  तो विचित्र दीपोत्सव होता !—तेथें जिवंत मशाली जवळ होत्या !—अणकुचिदार खांबांना ख्रिश्चन स्त्रीपुरुषांना बांधून त्यांच्या सर्वांगास मेण वगैरे ज्वालाग्राही पदार्थ चोपडण्यांत आले होते व एका ठराविक क्षणीं खूण होताच त्यांना पेटविण्यांत आले !  हस्तिदंती व सोन्याच्या रथांत बसून नीरो त्या रंगणांत आला ; त्याच्या पाठोपाठ सुंदर स्त्रिया व पर्‍या होत्या.  संगीत चाललें होतें, वाद्यें वाजत होतीं ; लाखों रोमन हर्षानें टाळ्या पिटूं लागले ! ते जणूं बेहोषच झाले होते ! जसा राजा तशी प्रजा.  नीरो लोकांची सलामी घेत होता.  उजवीकडे, डावीकडे, विनयानें मान लववून तो प्रजेच्या अभिवादनांचा सादर स्वीकार करीत होता.  त्याचा रथ जळणार्‍या ख्रिश्चनांच्या प्रकाशांत चमकणार्‍या टायबर नदीच्या सोनेरी तीरावरून धडधडत गेला.  आपण केवढी उत्कृष्ट कामगिरी केली, किती अतर्क्य व अतुलनीय आपली लीला असे विचार मनांत येऊन आनंदानें व धन्यतेनें त्याला कृतार्थता वाटत होती !  त्याचें हृदय फुलून गेलें होतें ! रात्रीच्या अंधारांतून त्यानें जिवंत ज्वालांचें महाकाव्य निर्मिलें !  धन्य त्याची ! पृथ्वीवर वा स्वर्गांत कोठेंहि अशी कलात्मक निर्मिती कोणीहि कधीं केली नसेल.  कोणाच्याहि प्रतिभेला असली निर्मिती सुचली नसेल.  नीरो हा सुर-नरांमधील 'कवीनां कवि:' होता !

- ५ -

ख्रिश्चनांची होळी केल्यावर नीरो रोमनांची पूजा करण्यास निघाला.  त्याला शहरांत शेंकडों शत्रू होते,  त्यांचा नि:पात करण्याचें त्यानें ठरविलें.  रोज सकाळीं रोममधल्या प्रमुख नागरिकांना पत्रें लिहून तो ''नीरोसाठीं व राज्याच्या हितासाठीं तुम्ही स्वत:ची हत्या करा'' अशी आज्ञा करी.  त्याच्याविरुध्द कारस्थानें केलेल्या लोकांचाच तेवढा तो त्या यादींत समावेश करीत असे असें नव्हे, तर ज्यांच्या ज्यांच्यावर तो या ना त्या कारणानें नाराज होता त्या सर्वांचा समावेश करी ; ज्यांची ज्यांची मालमत्ता त्याला हवी होती, वा ज्यांच्या ज्यांच्या मरणानें त्याच्या पित्त्यांना आनंद झाला असता, त्यांचीहि भरती त्यानें त्या हत्याकांडांत केली व नंतर कांही दिवसांनीं त्या पित्त्यांसहि यमसदनास पाठविलें.  त्या पिसाटाच्या माथेफिरू लहरीपासून कोणीहि सुरक्षित नव्हता.  त्यानें सक्तिनें आत्महत्या करण्यास ज्यांस भाग पाडलें त्यांत नीरोचा गुरु प्रसिध्द पंडित आचार्य सिनेका हाहि होता.  तो वृध्द झाला होता तरी त्यालाहि त्यानें 'मरा' म्हणून फर्माविलें. पेट्रोनियस नामक बाळपणींच्या एका प्रियतम मित्रालाहि त्यानें आत्महत्या करावयाला आज्ञापिलें.

आपल्या अतुल कलात्मक प्रतिभेनें जगाला थक्क करून सोडावें अशी त्याची महत्त्वांकांक्षा होती.  रोममध्यें तर त्यानें आपल्यामधल्या दिव्य कलेचें भरपूर प्रदर्शन केलेंच होतें ; आतां सौंदर्योपासक ग्रीस देशात जाऊन ग्रीक जनतेलाहि स्वत:ची आश्चर्यकारक कलात्मक प्रतिभा दाखवावी असें त्याच्या मनानें घेतलें.

तो गलबतांत बसून ग्रीसला जावयास निघाला.  त्यानें टाळ्या पिटणारे पांच हजार भाडोत्री लोक बरोबर घेतले, तद्वतच ज्या शेंकडो लोकांना त्यानें नुकतीच मृत्यूची शिक्षा फर्माविली होती त्या अभाग्यांनाहि बरोबर नेलें.  ग्रीसमध्यें कलेची पूजा करतां करता जो थोडा वेळ विरंगुळा म्हणून मिळत जाईल त्या वेळीं त्यांच्या मरणाची गंमत पाहण्यास मिळून थोडीफार करमणूक होईल हा त्यांना बरोबर नेण्यांतला त्याचा हेतु होता.

नीरो ग्रीक लोकांची आपल्या मूर्खपणानें करमणूक करीत असतां गॉल प्रांतांत त्याच्याविरुध्द बंडाळी माजली.  नीरो लगबगीनें धांवपळ करीत रोमकडे परतला.  फ्रान्समधील बंडाचा वणवा तोंपर्यंत स्पेनपर्यंत पसरत आला.  स्पेनचा गव्हर्नर गाल्बा याला सैनिकांनी 'रोमचा सम्राट्' म्हणून जाहीर केलें.  लष्करानें 'नीरो राज्याचा शत्रु आहे' असें जाहीर करून त्याला मृत्यूची शिक्षा फर्माविली !

सैन्याचा राजवाड्यास वेढा पडण्यापूर्वीच तो पळून जाऊन एका वृध्द नोकराच्या खेड्यांतल्या घरांत लपून बसला. 'पकडले जाण्यापूर्वी आत्महत्या करा' असे त्याच्या मित्रांनीं त्याला सुचविलें ; पण त्याच्या ठायीं तेवढें धैर्य कोठें होतें ? पाठीमागच्या एका खोलींत प्राणान्तिक भीतीनें अंग चोरून तो लपून बसला होता.  पहांट होत आली.  आपल्या लपण्याच्या जागेकडे घोडेस्वार येत आहेत असें ऐकतांच त्यानें हातांत सुरा घेतला, खंजीर घेतला ; पण स्वत:च्या छातींत त्याला तो खुपसून घेववेना.  शेवटीं त्यानें एका नोकराला सांगितलें, 'माझा हात धर व खुपस.' त्या नोकरानें लावलेल्या जोरामुळें खंजीर छातींत शिरला.

त्याचे शेवटचे शब्द कोणते होते ? खंजीर छातींत घुसत असतां तो म्हणाला, ''केवढ्या महाकलावन्ताला आज जग गमावून बसत आहे !'' त्याला जगाची कींव वाटली.  या जगांत आतां नीरो नसणार ! दुर्दैवी, हतभागी जग !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय