पण आश्चर्य हें कीं, ज्या क्षणीं तो सुखाचा नाद सोडतो, त्याच क्षणीं तें त्याला लाभतें. समुद्राजवळची अफाट दलदल दूर करून ती जागा मानवी निवासाला योग्य अशी बनविण्याची एक विशाल कल्पना त्याला सुचते. तो म्हणतो, ''येथें मी घरें बांधीन; त्यांत लाखों लोक स्वातंत्र्यांत नांदतील व रोज काम करून अधिकाधिक स्वतंत्र होतील.'' हा विचार मनांत येऊन त्याचें हृदय आनंदानें भरून जातें. तो आयुष्यभर याच आत्मविस्मृतीच्या ध्येयाकडे नकळत जात होता. हाच तो शेवटचा मंगल क्षण, सोन्याचा क्षण ! याला तो म्हणूं शकतो, ''क्षणा, थांब. किती रे सुंदर तूं !'' अखेर त्याच्या जीवनांतील परमोच्च क्षण येतो व त्याचें जीवन समाप्त होतें. सैतानाचा जय झाला असें बाह्यत: तरी दिसतें. विजयाचें बक्षीस म्हणून सैतान फॉस्टचा आत्मा नेऊं इच्छितो. पण गुलाबपुष्पवृष्टींत देवदूत फॉस्टचा आत्मा स्वर्गांत नेतात. कारण, फॉस्टनें खूप चुका केल्या, खूप पापें केलीं, तरी या सार्या धडपडींतून व चुकांतून तो नकळत प्रकाशाकडेच जात होता.
स्वर्गांत सर्वांआधीं त्याला कोण बरें अभिवादन करतें ? मार्गरेटच. तिनें पाप केलेले असतें व फॉस्टच्या पापामुळें तिला मरावें लागलेलें असतें. पण सारें विसरलें जातें, सार्याची क्षमा करण्यांत येते. ती आता त्याला सन्मार्ग दाखविते. पुरुषाची शाश्वत उध्दारकर्ती स्त्रीच होय.
- ७ -
आपल्या जीवनाचें परमोच्च कार्य पुरें करून फॉस्टप्रमाणें आतां गटेहि अनंतशयनीं पहुडावयाला तयार असतो. गटेचे चहाते त्याचा ब्यायशीवा वाढदिवस मोठ्या थाटमाटानें साजरा करणार होते; पण या उत्सव-सभा-रंभाच्या गोंधळांतून व गडबडींतून निसटण्यासाठीं तो इल्मेनोच्या डोंगरांत पळून गेला. तेथें एक पर्णकुटि होती. कार्ल आयस्ट व तो त्या पर्णकुटींत कितीदां तरी बसले होते ! कित्येक वर्षांपूर्वी त्यानें पेन्सिलीनें लिहिलेल्या ओळी अद्यापि तेथें होत्या. कोणत्या बरें त्या ?
''या सर्व डोंगरशिखरावर नि:सीम शांति आहे, झाडांच्या टोंकांवरहि गंभीर शांतता आहे. जराहि वारा, थोडाहि श्वास तेथें आढळणार नाहीं. वनांतील लहान लहान पांखरांनींहि आपले सारे आवाज बंद केले आहेत. आतां अधीर नको होऊं; शांत हो. लवकरच तुलाहि चिर विश्रांति लाभेल.''
पर्णकुटींत बसून पूर्वी लिहिलेल्या त्या ओळी त्यानें पुन: वाचल्या. त्याच्या डोळ्यांत पाणी आलें. त्यानें तें पुसून टाकलें व 'होय, तुलाहि लवकरच चिर विश्रांति लाभेल.' हे शेवटचे शब्द पुन: पुन: मनांतल्या मनांत उच्चारले. तो घरीं परतला. त्यानें थोडे दिवस आणखी कांही मंत्रमुग्ध करणारीं गाणीं निर्मिलीं. अत्यंत सुंदर गीतें. हीन म्हणतो, ''त्या गीतांतील शब्द आपणांस जणूं मिठी मारतात व त्यांतील विचार व त्यांचा अर्थ आपलें चुंबन घेतात.'' आणि शेवटचा क्षण आला. १६ मार्च १८३२ रोजीं त्याला अंथरुणांतून उठवेना; सहा दिवसांनीं त्यानें आपले डोळे शांतपणें मिटले. कुटुंबांतील मंडळी नि:स्तब्ध शांतपणें सभोवतीं बसली होती. त्याच्या जीवनाचें गान अनंत नि:स्तब्धतेंत—अत्यंत शांतींत विलीन झालें !
त्याच्या तोंडाचे ऐकूंच् आलेले शेवटचे शब्द 'अधिक प्रकाश' हे होते.