''तुझें घरदार सोड, सारी प्रिय आप्तमंडळी सोड व जोन ! फ्रान्सच्या राजाच्या मदतीला जा'' असा आदेश तिला ऐकूं आला. तेव्हां तिनें थरथरत विचारलें, ''मी एक क्षुद्र मुलगी आहें. मला घोड्यावर बसतां येत नाहीं, लढावें कसें हेंहि माहीत नाहीं.'' तेव्हां सेंट मायकेलनें तिला सांगितलें, रॉबर्ट डी बॉड्रिकोर्ट याच्याकडे जा. तो डॉमरेमी गांवचा व व्हॉकूलूर्स शहरचा स्वामी आहे. तो तुला सारी मदत देईल, माणसें देईल, साधनें देईल, मग तूं चिनॉन येथें जा. तेथें फ्रान्सच्या गादीचा वारस—तो भित्रा डॉफिन—सातवा चार्लस, जित देशाचा अनभिषिक्त राजा एका राजवाड्यांत राहत आहे.''

जोन देवदूतांच्या सांगीप्रमाणें बॉड्रिकोर्टकडे गेली. पण तो साशंक होता. तो तिला मदत करीना. तथापि सामान्य जनता तिच्याभोंवती गोळा झाली, तिच्या मदतीला आली. ते मध्ययुगांतील श्रध्दाळू ख्रिश्चन होते. त्याचा तिच्या सांगण्यावर विश्वास बसला. देवदूत वगैरे सर्व त्यांना खरें वाटलें. लोकांनीं तिला एक घोडा विकत घेऊन दिला व हत्यारी लोकांची एक टोळीहि तिच्याबरोबर दिली. जनतेचा हा उत्साह पाहून बॉड्रिकोर्टहि शेवटीं उत्साहित झाला व त्यानें जोनला एक समशेर बक्षीस दिली. आणि इ.स. १४२९ च्या वसंतॠतूच्या प्रारंभी सतरा वर्षांची ही किसानकन्या जोन पुरुषाच्या पोषाखांत आपल्या सैनिकांसह दु:खीकष्टी फ्रान्सचें दु:ख दूर करण्यासाठीं, मायभूमीच्या जखमा बर्‍या करण्याच्या ईश्वरदत्त जीवनकार्यासाठीं निघाली.

- ४ -

फ्रान्सचा कायदेशीर राजा सातवा चार्लस हा चंचल वृत्तीचा, दुबळा, मूर्ख, भोळसट व श्रध्दाळू असा असंस्कृत मनुष्य होता. जोन त्याच्यासमोर आली तेव्हां त्याचे दरबारी लोक त्याच्याभोंवती होते. पण राजा कोणता हें ओळखण्यास तिला अडचण पडली नाहीं. कारण, तो राजवाड्यांतील अत्यंत कुरूप पुरुष होता. तो पंधराव्या शतकांतील सर्व प्रकारच्या धार्मिक चमत्कारांवर भोळसट कथांवर विश्वास ठेवणारा होता. त्याला जोननें आपली सर्व कथा निवेदन करतांच त्याचा तिच्यावर एकदम विश्वास बसला. मर्लिनचें व अ‍ॅव्हिगनॉनच्या मेरीचें तें भविष्य त्यालाहि स्फूर्ति देतें झालें. 'एक कुमारी फ्रान्सला वांचवील' असें तें भविष्य होतें व त्याच्यासमोर ती कुमारी उभी होती. ती ईश्वराच्या आज्ञेनें संनध्द व राजाला विजय आणि मुकुट देण्याला सिध्द होती. त्या किसान-किशोरीची ती उत्कट इच्छा सातव्या चार्लस राजाचीहि इच्छा झाली.

देवदूतांच्या म्हणजेच तिच्या मनच्या योजनेप्रमाणें तिला दोन गंभीर कर्तव्यें पार पाडावयाचीं होती. एक, शापित इंग्रजांच्या हातून ऑर्लीन्स शहर मुक्त करणें व दुसरें, डॉफिनला र्‍हीम्स शहरीं नेऊन राजा करणें. फ्रान्सचा—फ्रान्सच्या राजघराण्यांतला—पहिला ख्रिश्चन राजा क्लोव्हिस याला ज्या पवित्र तेलानें राज्याभिषेक करण्यांत आला होता त्याच तेलानें ती डॉफिनलाहि राज्याभिषेक करूं इच्छीत होती.

राजानें जोनचें ईश्वरदत्त कार्य मान्य केलें व तिला सेनापति नेमलें. जे कांही सैन्य तो आपल्या निशाणाभोंवती गोळा करूं शकला त्याचें आधिपत्य तिच्याकडे देण्यांत आलें. स्त्रियांनीं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढणें ही त्या काळांत कांही अपूर्व गोष्ट नव्हती. अमीन्सच्या लढाईत तीस स्त्रिया जखमी झाल्या होत्या. बोहेमियांतील जोहान्स हस याच्या अनुयायांतील कित्येक स्त्रियांनींहि लढाईत भाग घेतला होता. मध्ययुगांतील असा एकहि वेढा नसेल, कीं ज्यांत एकाद्या स्त्रीनें अपूर्व शौर्य गाजविलें नव्हतें—नांव केलें नव्हतें. जोनची लष्करी मदत घेणें ही गोष्ट चार्लसला चमत्कारिक वाटली नाहीं. त्याला ती गोष्ट साहजिक वाटत होती. त्याच्या दृष्टीनें तींत अनैसर्गिक असें कांहीच नव्हतें. जुन्या करारांतील डेबोरा, जूडिथ व जेल या स्त्रिया त्याला आठवल्या. त्या स्त्रियांनीं ईश्वराच्या मदतीनें इझ्राएलचे शत्रू पराभूत केले होते. तशीच आज ती जोन उभी राहिली होती. फ्रान्सच्या शत्रूंना जिंकण्यासाठीं देवदूतांनींच तिलाहि बोलाविलें होतें. देवदूत मायकेल तिला मार्ग दाखवीत तिच्यापुढें चालला होता. तिच्या दोहों बाजूंस सेंट कॅथेराइन व सेंट मार्गराइट होते. अशा रीतीनें प्रभूचा आदेश पार पाडण्यासाठी निघालेली ही संस्फूर्त किसानकन्या इंग्रजांना हांकून देण्याच्या कामीं आपणास नक्की मदत करील असें राजाला वाटलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय