दुसर्यांच्या जीवनाला वळण देण्याची जबाबदारी उचलण्यापूर्वीच जीवन काय आहे हें त्यांनीं अनुभवलें पाहिजे, जगांतील टक्केटोणपे त्यांनी खाल्ले पाहिजेत, पंधरा वर्षे प्रत्यक्ष जगांत त्यांनीं वावरलें पाहिजे. आतां वय पन्नास वर्षांचे होईल. आतां तत्त्वज्ञानी राजे-राण्या व्हायला तीं सारीं समर्थ ठरतील. आदर्श राज्यांत तत्त्वज्ञानीच शास्ता होण्यास पात्र असतो. ''तत्त्वज्ञानी तरी शास्ते झाले पाहिजेत किंवा शास्त्यांनीं तरी तत्त्वज्ञानी बनले पाहिजे. जोंपर्यंत अशी स्थिती येत नाहीं तोपर्यंत जगांतील दु:खांचा अंत होणार नाहीं.'' शिक्षणामुळें व नैसर्गिक योग्यतेमुळें तत्त्वज्ञानी हेच उत्कृष्ट स्त्री-पुरुष. शासनसंस्थेनें जे उत्कृष्ट स्त्री-पुरुष निर्माण केले ते म्हणजे हे तत्त्वज्ञ. आणि जे उत्कृष्ट आहेत त्यांनींच राज्यकारभाराचें सुकाणूं हातीं घेणें योग्य. या तत्त्वज्ञानी शासकांचा शेवटचा, तिसरा, परमोच्च वर्ग. खालच्या व मधल्या वर्गांनीं या उच्च वर्गांचें ऐकलेच पाहिजे. या उच्च वर्गीय शास्त्यांत प्रामाणिकपणा असावा म्हणून त्यांची खासगी मालमत्ता असतां कामा नये. त्यांचें जें कांहीं असेल तें सारें सामुदायिक. ते सार्वजनिक भोजनालयांत जेवतील, बराकींतून झोंपतील. स्वार्थी वैयक्तिक हेतु नसल्यामुळें हे शास्ते लांचलुचपतीच्या अतीत राहतील. एकच महत्त्वाकांक्षा सदैव त्यांच्या डोळ्यांसमोर असेल आणि ती म्हणजे मानवांमध्यें न्यायाची कायमची प्रस्थापना करणें.
- ५ -
आदर्श शासन-पध्दतीचें असें हें संपूर्ण चित्र आपण पाहिलें. या आदर्श राज्य-पध्दतीच्या नगरीच्या दरवाजावर ''न्यायाची नगरी ती ही'' अशीं अक्षरें आपण खोदून ठेवूं या. या न्यायाच्या नगरींत शिरून तिच्यांतील कांही मनोहर विशेष, कांहीं प्रसन्न व गंमतीचे प्रकार, पाहूं या. पहिली गोष्ट म्हणजे या तत्त्वज्ञानी शासकांनीं ग्रीकांचा धार्मिक आचार्य व उद्गाता महाकवि जो होमर त्याला व त्याच्या महाकाव्यांना हद्पार केलें आहे. त्या महाकाव्यांतील देव वासनांविकारांनी बरबटलेल्या मानवांप्रमाणेंच आदळआपट करितात. इलियडमधील देवदेवता पोरकट वाटतात. किती त्यांचे अहंकार ! किती त्यांचे काम-क्रोध ! असला हा धर्म निकामी आहे ; त्याची शुध्दता केली पाहिजे ; त्याच्यांतील सारा रानटीपणा नष्ट केला पाहिजे. दुष्ट रुढि, भ्रामक कल्पना, चमत्कार, इत्यादि गोष्टी धर्मांतून हद्दपार केल्या पाहिजेत. मानवी बुध्दीला न पटणारा, तिच्याशीं विसंगत असणारा असा धर्म असण्यापेक्षां धर्म नसलेला बरा.
प्लेटोच्या आदर्श राज्यामध्यें देवदेवतांची ही अशी दुर्दशा आहे. परंतु मानवां-मानवांतील संबंध कसे राखायचे ? मानवांतील व्यवहार कसे चालवायचे ? मुख्य गोष्ट म्हणजे या सर्व व्यवहारांत न्यायबुध्दि असावी. केवळ धंदेवाईकपणा ही गोष्ट त्याज्य आहे. ती मानवाचा अध:पात करणारी आहे. धंदेवाईक माणसाला यशस्वी रीतीनें धंदेवाईक होणें व प्रामाणिकहि असणें या दोन्ही गोष्टी कशा साधतील ? प्लेटोच्या आदर्श राज्यांत गुन्हेगारांना करुणेनें वागविण्यांत येतें, त्यांच्यावर अंकुश असतो, बंधनें असतात ; परंतु त्यांना शिक्षा देण्यांत येत नाहीं. मनुष्य गुन्हा करतो ; कारण त्याला नीट शिक्षण मिळालेलें नसतें. ज्याला स्वत:चे ज्ञान नाहीं, आपल्या सभोंवतालच्या बंधूंविषयींहि ज्याला ज्ञान नाहीं, अशा अज्ञानीं पशुसम मनुष्याची कींवच करायला हवी. खोडसाळ व दुष्ट घोडा फटके मारून साळसूद होणार नाहीं. वठणीवर येणार नाहीं.