सफरीहून परत आल्यावर त्यानें आपली भाची एम्मा वेडवुड हिशीं विवाह केला. त्याला पुढें दहा मुलें झालीं. या मुलांचे खरे पूर्वज कोण याचाहि शोध तो करीतच राहिला. त्यानें खेड्यांत एक घर खरेदी केलें;  त्याच्याभोंवतीं विस्तृत बगीचा होता. सुदैवानें त्याला पोटासाठीं काम करण्याची अवश्यकता नव्हती. त्याच्या वडिलांनीं भरपूर मिळवून ठेवलें होतें. आपलीं मुलें कांहींहि कष्ट न करतां नीट जगूं शकतील, आळसांत राहूं शकतील अगर आपल्या उज्ज्वल प्रतिभेची व अपूर्व बुध्दिमत्तेची करामत दाखवूं शकतील अशी सोय त्यांनीं करून ठेवली होती. चार्लस डार्विन आपल्या प्रतिभेच्या पूजनांत रमला.

लग्न करण्याच्या किंचित् आधीं त्याची प्रकृति बरीच खालावली होती, ती कधींच सुधारली नाहीं. तो जवळजवळ चाळीस वर्षे आजार्‍यासारखाच होता, तरीहि त्यानें एकट्यानें दहा माणसांइतकें काम केलें ! प्रथम त्यानें 'बीगल' वरून केलेल्या प्रवासाचें इतिवृत्त प्रसिध्द केलें. हें पुस्तक शास्त्रीय असूनहि एकाद्या मनोरंजक कादंबरीप्रमाणें रसाळ वाटतें. हरएक गोष्ट लिहितांना त्याच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय असे. लिहिलेलें सर्वांना समजेल अशी भाषाशैली तो वापरी. तो लिहितो, ''लहान लहान जुने सॅक्सन शब्द वापरणें चांगलें. 'एकादें लहान रोपटे अफू घेतल्याप्रमाणें जणूं गुंगीत असतें आणि अशा वृत्तीनेंच तें जगतें,' असली वाक्यें कानाला इंग्रजी नाहीं वाटत. त्याचें भाषांतर करावेंवें वाटतें; पण हेंहि खरें कीं, भाषाशैली अति सोपी, सहजसुंदर व प्रासादिक असावी यासाठीं फार श्रम घेणें बरें नाहीं. वाग्वैभव केवळ निरुपयोगी असेंहि नाहीं. लिखाणांत परमोच्च वक्तृत्व असूनहि फारसा आटापिटा न करतां प्रसाद व सहजसुंदरता दोन्ही साधतां येतील तर चांगलेंच.''

भाषा सहजसुंदर व स्वच्छ आणि विशद अर्थ सांगणारी व्हावी म्हणून डार्विननें खूप प्रयत्न केले. सुंदर लिहिणें प्रथम त्याला जड जात होतें. पण अविरत प्रयत्नानें त्यानें स्वत:ची एक विशिष्ट भाषाशैली बनविली. मोकळी, सोपी व मनोहर भाषाशैली त्यानें निर्मिली. त्याच्या जीवनाचें ब्रीदवाक्य 'सतत प्रयत्नानें कार्य होतें' हें होतें. काव्याविषयीं आपणास फार आवड नसल्याबद्दल त्याला वाईट वाटे, तरीहि पण 'बीगलवरील प्रवास' या त्याच्या पुस्तकांत कवितांचे पुष्कळ उतारे आहेत. ब्राझिलचें पुढील वर्णन पाहा :— ''येथील जमीन म्हणजे एक विस्तृत, अनिर्बंध, भव्य, भीषण व वैभवसंपन्न असें निसर्गाचें जणूं उष्ण मंदिरच आहे. पण निसर्गाच्या या घराचा कब्जा मानवानें घेतला आहे. येथें मानवानें ठायीं ठायीं सुंदर घरें व लहान लहान बागा निर्मिल्या आहेत.''  ब्राझिलची भूमि पाहून त्याला प्रथम काय वाटलें तें पाहा : तो म्हणतो, ''आनंदाच्या व आश्चर्याच्या वादळांत मी बुडून गेलों'' व मग लिहितो, ''नारिंगे, संत्रीं, नारळ, ताड, आंबे, केळीं, वगैरेंचीं बाह्य रुपयें पृथ पृथ आहेत. पण या भिन्न भिन्न वृक्षवनस्पतींचीं सहस्त्रावधि सौंदर्यें शेवटीं एक भव्य अशी सौन्दर्यकल्पना देतात आणि वेगवेगळीं सुंदर रूपें विलीन होऊन एकच सौंदर्यकल्पना मनांत राहते. पण ही विविधता गेली तरीहि अस्पष्ट पण अत्यंत सुंदर अशा आकृतींचीं चित्रें हृदयफलकावर राहतातच.''

'बीगलवरील प्रवास' हें पुस्तक लिहून शंभर वर्षें होऊन गेलीं तरीहि तें पुस्तक अरबी भाषेंतील सुरस गोष्टींप्रमाणें गोड वाटतें. डार्विनचें यानंतरचें पुस्तक मात्र केवळ शास्त्रीय होतें, त्यात निसर्गाच्या स्वरूपाविषयीं बरीच माहिती असून समुद्रांतल्या बार्नेकल नामक प्राण्यांचीहि हकीकत आहे. हा प्राणी आपल्या शिंपल्यांत डोक्यावर उभा असतो व आपल्या पायांनीं तोंडांत अन्न फेंकतो. हें पुस्तक डार्विन आठ वर्षें लिहीत होता. त्याच्या आयुष्यांतलीं हीं आठ वर्षें अत्यंत उपयोगी कामांत गेलीं. या एका विषयाला सतत आठ वर्षें चिकटून बसून डार्विननें स्वत:मध्येंहि जणूं बार्नेकलची चिकाटी बाणवून घेतली. असल्या विषयावर निरर्थक इतके प्रयत्न करण्याबद्दल डार्विनचे मित्र त्याची खूप टिंगल करीत; पण डार्विन हळूहळू 'सर्वांत मोठा सृष्टिज्ञानी व निसर्गाभ्यासी' अशी आपली प्रतिष्ठा प्रस्थापित करीत होता व आपल्या आयुष्यांतल्या सर्वांत मोठ्या कामासाठीं आपलें मन-आपल्या मनाचे स्नायू-मजबूत करीत होता.

हीं आठ वर्षे किती मोलाचीं ! तो सारखा माहिती मिळवीत होता व चिकित्सक बुध्दीनें त्या माहितींतून सत्य शोधीत होता,  निवडानिवड करीत होता. 'निरनिराळया जातींची उत्पत्ति आणि मानवाची उत्क्रांति (मानवाचा अवतार)' यासंबंधींची आपली उत्पत्ति पूर्णावस्थेस नेऊं पाहत होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel