प्रकरण ४ थें
देवत्व पावलेला नास्तिक बुध्द
- १ -
मानवजात जणूं एकाच कुटुंबाची आहे. एकाच कुटुंबाच्या अनेक शाखा सर्वत्र पसरल्या आहेत. आकाशांतील इतर तेजोगोलांच्या मानानें पृथ्वी ही फारच लहान आहे. आणि लहानशा पृथ्वीवरील हें मानवकुटुंब म्हणून फारच लहान वाटतें. आणि या सर्व विश्वपसार्यांत पृथ्वीवरील मानवासारखा प्राणी अन्यत्र नाहीं असें आजचें ज्ञान तरी सांगत आहे. सर्व विश्वांत अपूर्व व अद्वितीय असा हा मानव आहे. त्याच्या जातीचा प्राणी विश्वांत अन्यत्र नाहीं. मानवजातीचे सारे सभासद परस्परांशीं प्रेमानें व बंधुभावाने वागतील असे वाटणें स्वाभाविक आहे. परंतु आश्चर्य वाटतें, कीं दोन मानवजाती जर एकत्र आल्या तर त्यांचा परस्परांत पहिला परिचय जो होतो तो मारामारीच्या रूपानें होतो.
या मानवांत कांहीं तर विचित्र वेडेपणा आहे असें वाटतें.
हा मानवी वेडेपणा आपण इजिप्तमध्यें, मेसापोटेमियामध्यें व पॅलेस्टाईनमध्यें पाहिला. हा वेडेपणा दूर करूं पहाणार्या कांही संस्फूर्त अशा दैवी पुरुषांचे प्रयत्नहि आपण पाहिले. आतां आपण आपलें लक्ष पृथ्वीच्या दुसर्या एका भागाकडे देऊं या. हिमालयाच्या खिंडींतून जे लोक हिंदुस्थानच्या मैदानांत उतरले, त्यांनीं ऐतिहासिक जीवनाची पहिली मंगलप्रभात कशी सुरू केली तें जरा पाहूं या.
कित्येक शतकें हिंदुस्थान जगापासून जसा अलग होता ! एका बाजूस हिमालय, दुसर्या बाजूस अपरंपार सागर या दोन मर्यादांच्यामध्यें त्या हिमयुगांत आलेले कांही खुजे कृष्णवर्ण लोक येऊन राहिले होते. हे रानटी काळे लोक सदैव भटकत असत. आपले कळप बरोबर घेऊन त्यांना चारीत चारीत ते सर्वत्र हिंडत. हळूहळू त्यांनीं ओबडधोबड अशीं दगडी हत्यारे शोधलीं. पुढें कांहीं हजार वर्षांनंतर त्यांनीं तांब्याचा शोध लाविला. मेसापोटेमिया व इतर पाश्चिमात्य देश यांच्याशीं थोडाफार दर्यावर्दी व्यापार त्यांनीं सुरू केला.
जवळजवळ दहा हजार वर्षे या मूळच्या हिंदुस्थानी लोकांनीं हें प्राथमिक जीवन चालविले, परंतु हिमालयापलीकडे दुसरी एक उत्साही मानवजात वाढत होती. हे लोक उंच, गौरवर्णी व सामर्थ्यसंपन्न होते. आशियाच्या वायव्य दिशेस कास्पियन समुद्राजवळ हे प्रथम रहात होते. पांच हजार वर्षांपूर्वी त्यांच्यांत एक प्रकारची अस्वस्थता व प्रक्षुब्धता पसरली. त्यांच्यांत एकदम चैतन्य संचारलें. ते पृथ्वीच्या सर्व भागांत पसरूं लागले. कांहीं मध्य आशियांतील इराणांत आले. आणि म्हणून या सर्वांनाच इराणियन किंवा आर्यन असें नांव मिळालें.