- २ -
रोमच्या नांवानें स्वत:ची महत्त्वाकांक्षा पुढें ढकलावी, आपले स्वार्थ साधावे, अशी त्याची इच्छा होती. नांव रोमचें, स्वार्थ आपला ! रोमचें नुकसान झालें तरी हरकत नाहीं, पण आपला स्वार्थ साधलाच पाहिजे असें त्याचें मत होतें. पहिल्या प्रथम आपला स्वार्थ, मग रोमचा ! आधी आपली पूजा, नंतर रोमची ! पहिली महत्त्वाकांक्षा स्वत:च्या मोठेपणाची, दुसरी रोमच्या वैभवाची ! रोमला बाजूस सारून तो आपला मोठेपणा साधी व जगाची होळी करून रोमला मोठें करूं पाही. आपल्याच देशबांधवांना लुटून, सावकारी करून तो स्वत: संपन्न झाला व 'इतरांना लुटून तुम्ही श्रीमंत व्हा' असें त्याचें आपल्या देशबांधवांना सांगणें असे. 'कार्थेज लुटा, धुळीस मिळवा व गबर व्हा' असें तो बिनदिक्कत उपदेशी व त्यासाठीं वक्तृत्वांतील सर्व प्रकार व सार्या हिकमती तो योजी. उपरोध, आरोप, प्रार्थना, अश्रू, गडगडाट—सारे प्रकार, सार्या भावना, तो उपयोगांत आणी. रोमन लोकांच्या स्वार्थी भावना जागृत करण्यासाठीं, त्या जागृत होऊन ते पक्के दरोडेखोर बनावे व त्यांच्या गुन्हेगारी वृत्तीहि जागृत व्हाव्या म्हणून तो अपूर्व भाषणें करी. तो पराकाष्ठेचा नाटकी होता. त्याचे हावभाव, त्याचा आवेश, त्याचें सारें कांही बेमालूम असे. एकदां आपलें सीनेटमधलें भाषण त्यानें संपविलें न संपविलें तोंच त्याच्या झग्याच्या टोंकाला बांधलेले अंजीर गांठ सुटून एकदम भराभर खालीं पडले. कांही सीनेटकरांनीं ते अंजीर उचलले व 'किती सुंदर ! केवढाले तरी मोठे हे !' अशी त्यांची प्रशंसा केली. लगेच कॅटो जणूं सहज म्हणाला, ''असे अंजीर कार्थेजच्या आसपास होतात. गलबतांतून रोमपासून तेथवर जाण्याला फक्त तीन दिवस लागतात.''
सीनेटमधली त्याचीं भाषणें म्हणजे द्वेष-मत्सरांचीं जणूं उपनिषदेंच असत. तीं घटिंगणांसमोर गाईलेलीं जणूं द्वेषाची गीतेंच असत. त्याचे शब्द ऐकण्यास श्रोते जणूं उत्सुक असत. त्याचे रानवट बेत हाणून पाडण्यासाठीं मूठभर प्रामाणिक लोक प्रयत्न करीत, पण अशा मूठभरांच्या विरोधाला कोणी भीक घालीत नसत, तिकडे कोणी लक्षहि देत नसत. वृध्द व पोक्त सीनेटरहि युध्दासाठीं उत्सुक होते. कारण, लढणार व मरणार तरुण व विजयध्वज मिरवून वैभवाचे वारसदार होणार मात्र वृध्द सीनेटर अशी वांटणी निश्चित होती. पैसेवाले, पेढीवाले हेहि कॅटोच्याच बाजूचे होते. कारण, त्यांना कार्थेजियनांच्या स्पर्धेची दहशत वाटे. कार्थेजची सत्ता, संपत्ति व वैभव हीं वाढलीं तर रोमचें कसें होणार, आपल्या व्यापाराचें काय होणार अशीं साधार भीति त्यांना सदैव भेडसावीत असे. कॅटोप्रमाणें त्यांनाहि वाटे कीं, रोमची भरभराट व्हावयास पाहिजे असेल तर कार्थेजचा नाश झालाच पाहिजे.