म्हणून मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तो ईश्वराची प्रतिकृति म्हणून जन्मलेला नाहीं. तो पडलेला-अधोगत-देवदूत नसून उत्क्रान्तीच्या सोपानानें उन्नत होत असलेला रानटी पशु आहे, रानटी मानव आहे. त्याचा मार्ग उत्तरोत्तर वरचा आहे. तो अधिक खालीं नाहीं जाणार. या जगांत जें जें सजीव आहे. जें जें जीवनार्थ धडपडत आहे, त्या त्याशीं मानवाचा संबंध आहे. त्याच्यामध्यें पशुत्वाचे व लाखों, क्रोडों प्राण्यांचे अंश आहेत. जीवन उत्क्रांत होत असून मनुष्याला अद्यापि एक प्राणी म्हणूनच म्हणावें लागेल; पण प्रेमाची अपरंपार-अनंत-शक्ती असणारा हा प्राणी आहे.

- ५ -

खुद्द डार्विनचेंच जीवन त्याच्या उत्पत्तीचा सबळ व उत्कृष्ट पुरावा आहे,  त्याची प्रेमशक्ति सारखी वाढत होती. त्याच्या उत्पत्तीसाठीं त्याच्यावर टीका, निंदा, शिव्याशाप, यांची लाखोली वाहण्यांत आली तरी त्यानें निंदकांविरुध्द एकहि कटु शब्द उच्चारला नाहीं. आपल्या सहकार्‍यांशीं त्याचा एक नम्र साहाय्यक म्हणून तो वागे; त्यानें त्यांच्यावर कधींहि वरचष्मा गाजविला नाहीं. ज्यांचीं नांवेंहि कोणास माहीत नस्त. अशा प्रयोगशाळेंतल्या कामगारांविषयीं व माहिती गोळा करून देणार्‍यांविषयीं तो फार कृतज्ञता दाखवी. ते अमोल मदत देत. डार्विन त्यांना विज्ञानशास्त्रांतील हमाल म्हणे. प्राणी कितीहि क्षुद्र असला तरी तो त्याचा तिरस्कार करीत नसे. प्राणिमात्र त्याला पवित्र वाटे. बुध्दला सार्‍या विश्वाविषयीं अपार प्रेम वाटे, तसाच थोडासा डार्विनचा प्रकार होता. तो बुध्दाच्याच जातीचा होता;  त्याला सारें जीवन पवित्र वाटे. सजीव प्राण्यांविषयीं बोलावें तसें तो झाडेंमाडें, तृणवेली, वगैरेंविषयींहि बोले. त्यानें लावलेल्या एकाद्या झाडाचें अगर गवताचें रोंवलेले अगर खोंवलेलें पान वर आलें कीं त्याची ती हुषारी पाहून तो म्हणे, ''अरे लबाडा, वर आलास ? मीं तुला अडकवून, डांबून ठेवलें तरी वर डोकें काढलेंसच अं?'' अशी त्यांची प्रेमानें खरडपट्टी काढून तो त्यांच्यावर रागावावयाचा. कांहीं बीजांकुरांवर प्रयोग करतां करता तो चिडून म्हणे, ''हीं भिकारडीं चिमुरडीं मला पाहिजे त्याच्या नेमकें विरुध्द करतात ! चावट कोठचीं !'' प्रत्येक रोपटें त्याला जणूं व्यक्तित्वसंपन्न पवित्र व्यक्तीच वाटे. फुलांचे सौंदर्य पाहून त्याची जणूं समाधि लागे ! फुलांपासून मिळणार्‍या निर्दोष व निरुपम आनंदाबद्दल तो सदैव कृतज्ञता प्रकट करी. तो फुलांच्या पाकळ्यांना अगदीं हळुवारपणें स्पर्श करी, त्या वेळीं त्याच्या डोळ्यांत एकाद्या संताचें अपरंपार प्रेम वा एकाद्या बालकाचें निष्कपटी कुतूहल दिसे. त्याचा ख्रिश्चन धर्मावर विश्वास नव्हता तरीहि त्याचा स्वभाव मात्र ख्रिस्तासारखा होता. तो म्हणे, ''ईश्वरानें कोणाला एकादा ग्रंथ दिला यावर माझा तरी विश्वास बसत नाहीं.''  तो अज्ञेयवादी होता. अपरंपार दु:खानें भरलेल्या या जगाची रचना एकादा ज्ञानी ईश्वर करणें शक्य आहे का असें तो विचारी. तो लिहितो, ''या जगाच्या पाठीमागें कांहीं कल्याणावह योजना तर नाहींत नाहीं, पण मुळीं योजनाच असेलसें वाटत नाहीं.''  पण तो केवळ नास्तिक नव्हता. तो जपून जाणारा होता. तो या निर्णयाप्रत आला कीं, ''हा सारा विषय मानवी बुध्दरच्या अतीत आहे. मनुष्यानें आपलें कर्तव्य करावें म्हणजे झालें.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel