बिशपांना असें कळविण्यांत आलें कीं, परधर्मी कोण, कॅथॉलिक मताचे कोण नाहींत, हें हुडकून काढण्यासाठीं त्यांनीं बातमीदार नेमावे. सामान्य कॅथॉलिकापेक्षा ज्यांची ज्यांची राहणी निराळी असे, त्यांच्या मरणयाद्या होऊं लागल्या. याद्या आल्या म्हणजे बिशप त्यांची छाननी करून ज्यांना शिक्षा देणें योग्य त्यांना शिक्षा देत. जे बिशप भरपूर प्रमाणांत नास्तिकांस जाळीत नसत त्यांना पोप पदच्युत करी. कमींत कमी इतके तरी जाळले गेलेच पाहिजेत असें ठरवून दिलें जाई. प्रत्येकानें आपला आंकडा पुरा करणें भाग असे. नाहीं तर धर्माधिकारापासून त्याची हकालपट्टी होई. बिशपांनीं या नास्तिकांना जरा दया दाखविली तर त्यांच्यावरच नास्तिकपणाचा आरोप लादला जाऊन त्यांना तुरुंगांत टाकण्यांत येई. अशा रीतीनें पोप आपला नरमेघ तेज राखी आणि ईश्वराचें वैभव वाढवी. ईश्वराचें वैभव वाढवितां वाढवितां तो स्वत:हि कुबेर बने. कारण जो जो जाळला जाई त्याची त्याची मालमत्ता चर्चच्या ताब्यांत येई.

पण बिशप कितीहि धर्मोत्कट असले तरी ते पोपचें समाधान होण्याइतके रक्तपिपासु नव्हते. तद्वतच ते या वधकर्मांत तितके वाकबगारहि नव्हते. ख्रिश्चन धर्मी युरोपांतील सर्व पाप नाहींसें करण्यासाठीं, सारे परधर्मीय निवडून त्यांचें निर्मूलन करण्यासाठीं, चांगलें शिक्षण दिलेलें गुप्त पोलिसांचें सैन्य उभारण्याची जरुरी होती. म्हणून पोपनें डोमिनिक पंथीयांची मदत मागितली. सन्त डॉमिनिक—तरवारीनें बाप्तिस्मा देण्याच्या मताचा अध्वर्यु—याचे अनुयायी कसे असतील हें सांगण्याची जरुरीच नाहीं. या डोमिनिक पंथीयांस धार्मिक दुष्टतेचें नीट शिक्षण देण्यांत येत असे. पोपनें या शिक्षणाचा उपयोग करून घेण्याचें ठरविलें आणि इन्क्विझिशन नांवाची अत्यंत प्रभावी व फायदेशीर संस्था उभी केली. ग्रेगरीनें डोमिनिकांना लिहिलेल्या पत्रांत त्यांच्या कर्तव्यांविषयीं असा उल्लेख आहे :—

''एकाद्या शहरांत तुम्ही गेला म्हणजे तेथील बिशप, क्लर्जी व लोक यांस एकत्र बोलवा व त्यांना धर्मश्रध्देवर एक गंभीर प्रवचन ऐकवा. नंतर तुमच्या न्यायासनासमोर आणल्या जाणार्‍या संशयास्पद नास्तिकांची चौकशी करण्याच्या कामीं शहरांतील प्रतिष्ठिताांचें साह्य घ्या. चौकशींअंतीं अपराधी ठरतील त्यांना सांगा, 'अत:पर चर्चची आज्ञा संपूर्णपणें व बिनतक्रार मानली पाहिजे.' जर ते नाकारतील तर त्यांना योग्य ती शिक्षा द्या.''

जे कॅथॉलिक धर्माचे नव्हते, जे पोपला नास्तिक वाटत, त्यांच्याविरुध्द पोप इतका कां उठला होता ? एक गोष्ट म्हणजे नास्तिकांना—कॅथॉलिक धर्म न मानणार्‍यांना—पोपचें तें वैभव व त्याचा तो डामडौल पसंत नसत. मध्ययुगांतील ते ख्रिश्चन जणूं समाजवादी होते ! ते जणूं तात्विक अराजकवादी होते ! टॉल्स्टॉय व इमर्सन यांचे ते जणूं पूर्वदूत वा आध्यात्मिक पूर्वजच होते ! मध्ययुगांत असल्या लोकांचे नाना संघ होते व त्या सर्वांना एक गोष्ट समान होती : ख्रिस्ताच्या अहिंसक वृत्तीवर श्रध्दा. धर्मोपदेशक व भटभिक्षुक यांची मगरुरी त्यांना खपत नसे. ते म्हणत, ''ख्रिस्ताला जगांत डोकें टेंकावयाला घरहि नव्हतें; पण ते पोप तर राजवाड्यांत राहतात ! ख्रिस्त ऐहिक सत्ता व संपत्ति तुच्छ मानी, तर हे पोप सत्तालोलुप आहेत ! मानसन्मान व धनदौलत यांच्यासाठीं हपापलेल्या या रोमन कॅथॉलिक धर्मगुरुंत व ख्रिस्तात थोडें तरी साम्य आहे का ?'' पुढच्या काळांतील क्वेकरांप्रमाणें हे कॅथॉलिक नसलेले लोक जोरजुलुमाच्या, तद्वतच द्वेष, देहान्तशासन, युध्दें यांच्याहि विरुध्द प्रचार करीत. इतिहासकार व्हॅकॅन्दार्ड लिहितो, ''या लोकांच्या अशा क्रान्तिकारक विचारसरणीमुळें ते केवळ कॅथॉलिक पंथाविरुध्द होते इतकेंच नव्हे, तर देशद्रोही व समाजद्रोहीहि होते. आणि या अशा शान्तिदूतांना, या धोकेबाज लोकांना, ठार मारण्यांत चर्चची केवळ आत्मरक्षणाचीच दृष्टि होती. अशा लोकांच्या विचारांना वाटेल ती किंमत देऊन पायबंद घालणें जरूर होतें.''

पण काय, हजारोंच्या प्राणांची किंमत ? 'होय,' हे इतिहासकार म्हणतात. व हें मत एकाद्या मध्ययुगीन धर्मोपदेशकाचें नसून अर्वाचीन काळांतील कॅथॉलिक इतिहासकाराचें आहे हें पाहून जरा गंमत वाटते. इन्क्विझिशनची वृत्ति कांही ठिकाणीं अद्यापि जिवंत आहे तर एकूण ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel