त्या दु:खाचा इन्कार करा म्हणजे तें तुमच्यापुरतें तरी नष्ट झाल्यासारखेंच आहे.''  हे स्टोइक म्हणजे ख्रिस्तपूर्व जगांतील आशावादी शास्त्रज्ञ.  यांच्याउलट दुसरे सुखवादी तत्त्वज्ञानीहि होते.  ते दु:ख आहे असें मानीत, पण सुखोपभोगांत रंगून माणसानें स्वत:ला दु:खाचा विसर पाडावा असें शिकवीत.  त्यांना 'उदरंभर तत्त्वज्ञ', 'शिश्नोदरपरायण तत्त्वज्ञानी' अशीं नांवे ठेवण्यांत येत.  त्यांना शांत व सौम्य अशा मानसिक व बौध्दिक आनंदापेक्षां प्रक्षुब्ध व मत्त करणारे शारीरिक आनंद आवडत. 'खा, प्या, मजा करा', हें त्यांचें ब्रीदवाक्य होतें.  'उद्यां एकादा अलेक्झांडर येईल व तुम्हांला मरावयास सांगेल ; म्हणून मिळेल तेवढा क्षण सुखांत घालवा.' असें ते सांगत.  या न समजणार्‍या जगांत, या अनाकलनीय संसारांत कसें वागावें हें न समजल्यामुळें हे सारे तत्त्वज्ञानी जणूं प्रयोगच करूं पाहत होते.  या जगाशीं कसें जमवून घ्यावें हेंच जणूं ते पाहत होते.  कोणी दु:खावर भर देई, कोणी सुखावर.  कोणी दु:खेंहि आशीर्वादरूप असें सांगत, कोणी सुख मिळेल तेवढें भोगून पदरांत पाडून घ्या असें सांगत.  अलेक्झांडरनें जीं सारखी युध्दें पेटविलीं त्यामुळें मानवी मन अस्वस्थ झालें होतें.  रबरी चेंडूप्रमाणें मानवी मन केव्हां या बाजूला तर केव्हां त्या बाजूला, केव्हां वर तर केव्हां खालीं, फेकलें जात होतें, केव्हां इकडे तर केव्हां तिकडे ओढलें जात होतें.  कोणी त्याला आशेकडे ओढी तर कोणी निराशेकडे ; कोणी त्याला भोगाकडे ओढी तर कोणी त्यागाकडे.  कोणी म्हणे, 'दु:खें भोगा', तर कोणी सांगे, 'सुखें भोगा.'  कोणी विषयलंपटतेचें तत्त्वज्ञान पसरवीत तर कोणी 'जें जें होईल तें तें पाहावें' असें सांगत.  जगांत धर्म राहिला नव्हता.  जुन्या ईश्वरानें मानवी मनाची व मनोरथांची वंचना केली होती व मानवजात ज्याच्यावर विश्वास टाकूं शकेल असा नवीन ईश्वर अद्यापि लाभला नव्हता.  'जुना ईश्वर गेला, नवीन ईश्वराचा पत्ता नाहीं.' अशी स्थिति होती.

परंतु या सुमारास सॅमॉस बेटांत एक तरुण वाढत होता.  त्याचें नांव एपिक्यूरस.  धर्म नसतांहि सुखी कसें व्हावें हें तो शिकविणार होता, देवदेवतांच्या मदतीशिवाय हें जीवन नीट कसें जगतां येईल हें शिकविणार होता.

- ३ -

एपिक्यूरस अलेक्झांडरच्या जन्मानंतर पंधरा वर्षांनीं म्हणजे इ.स. ३४१ मध्यें जन्मला.  त्याचा बाप अथीनियन होता.  तो शिक्षकाचा धंदा करी.  परंतु त्याला पगार फारच थोडा होता.  त्यामुळें त्याच्या पत्नीला धार्मिक गंडे, मंतरलेले ताईत वगैरे विकून महिन्याचीं दोन्ही टोंकें पुरीं करावी लागत.  ती अंगारे-धुपारे, जप-जाप्य करून संसार चालवी.  ती मनुष्यांना भुतांखेतांपासून, प्रेतांपिशाच्चांपासून मुक्त करणारी बिनपदवीची वैदू होती.  लहानग्या एपिक्युरसला आईच्या या फसव्या धार्मिक जादूटोण्यांत मदत करावी लागे.  या गोष्टी पाहून त्याला बाळपणींच धर्माविषयीं मनापासून तिटकारा वाटूं लागला.

अगदीं तरुणपणींच अध्यात्माविषयीं त्याची आवड व तीव्र बुध्दिमत्ता या दिसून आल्या.

एके दिवशीं गुरुजी शिकवितांना म्हणाले, ''हें जग मूळच्या अव्याकृत प्रकृतींतून जन्माला आलें.''  एपिक्युरसनें विचारलें, ''पण ती अव्याकृत प्रकृति कोणीं उत्पन्न केली ?''  पंतोजी म्हणाले, ''मला ठाऊक नाहीं.  त्याचें उत्तर एकादा खरा तत्त्वज्ञानीच तुला केव्हां तरी देईल.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय