फिडियसनें अथेन्सची जी अमोल सेवा केली, तिचें बक्षीस या यथार्थ अथीनियन पध्दतीनें अथीनियन जनतेनें त्याला दिलें.  फिडियसला दूर करून पेरिक्लिसचे शत्रू आतां अनॅक्झेगोरसकडे वळले.  हा पेरिक्लिसचा आवडता आचार्य होता आणि आतां त्याचा उत्कृष्ट मित्रहि होता.  त्याच्यावर अज्ञेयवादाचा आरोप लादण्यांत आला.  धार्मिक बाबतींतील मतस्वातंत्र्य नवीन कायदा करून नष्ट करण्यांत आलें.  हा नवा कायदा म्हणजे जणूं पेरिक्लिसलाहि आव्हानच होतें.  कारण धार्मिक बाबतींत देवादिकांविषयींचीं त्याचीं मतें सनातनी पध्दतीचीं नव्हतीं.  परंतु सार्वजनिकरीत्या धार्मिक मतांची चर्चा तो टाळी.  आणि अशा रीतीनें तो काळजी घेऊं लागला.  कारण किती झालें तरी तो मुत्सद्दी होता, तत्त्वज्ञानी नव्हता.

परंतु त्याची वारांगना अस्पाशिया हिला अटक करण्यांत आली.  त्याच्यावर हा सर्वांत प्रखर असा प्रहार होता, हा फार मोठा आघात होता.

- ४ -

अस्पाशिया ही मूळची इजियन समुद्रावरच्या मिलेट्स शहरची रहाणारी.  अथेन्समध्यें अर्थातच् ती परदेशी होती.  कायदेशीररीत्या तिचा व पेरिक्लिसचा विवाह होऊं शकत नव्हता.  परंतु तरीहि पतिपत्नी म्हणून दोघें एकत्र रहात होतीं.  पेरिक्लिसनें आपल्या पहिल्या पत्नीशीं काडीमोड केली होती.  अस्पाशिया व पेरिक्लीस यांचे एकमेकांवर फार प्रेम होतें.  अस्पाशिया ही क्षुद्र वारांगना नव्हती.  सुसंस्कृत, सुशिक्षित व सुंदर अशा वारांगनांचा एक विशिष्ट वर्ग अथेन्समध्यें होता, त्यांत शोभणारी ती होती.  अथेन्समधले लोक स्वत:च्या मातीच्या झोंपड्यांपेक्षां सार्वजनिक इमारतींवर ज्याप्रमाणें अधिक प्रेम करीत, त्याप्रमाणें स्वत:च्या पत्नीपेक्षां ते या वारयोषितांवर अधिक प्रेम करीत.  अथेन्समधील स्वतंत्र नारी-मग त्या विवाहित असोत वा अविवाहित असोत कमी मानल्या जात.  कारण त्या अशिक्षित असत.  त्यांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती.  घरांतील गुलामांबरोबर व गुराढोरांबरोबर त्यांनीं रहावें.  एकाद्या प्रतिष्ठित अथीनियन पुरुषाला बुध्दीनें आपल्या बरोबरीची अशी एकादी स्त्री सार्वजनिक संगतीसाठीं हवी असली तर तो थेट त्या वारयोषितांकडे जाई.  या विशिष्ठ वर्गांतील वारयोषितांना बौध्दिक शिक्षण मिळालेलें असे.  जो सुप्रसिध्द पुरुष त्यांच्याकडे येई त्याला शारीरिक व बौध्दिक आनंद द्यायला त्या समर्थ असत.

या ज्या धंदेवाईक सहचरी नारी असत, त्यांच्यामध्यें अस्पाशिया ही अत्यंत सुंदर व अति बुध्दिमती अशी होती.  अथेन्समधील बुध्दिमंतांच्या मंडळांतील ती तेजस्वी तारका होती.  ती जणूं त्या मंडळाची अभिजात नेत्री होती !  तिच्या मंदिरांत तत्त्वज्ञानी, मुत्सद्दी, संगीतज्ञ, कवि, कलावान् सारें जमत.  इतरहि सुसंस्कृत अशा विलासिनी वारांगना तेथें गोळा होत असत.  अस्पाशिया जमलेल्या लोकांना बौध्दिक मेजवानी देई.  ती तात्त्विक वादविवाद करी आणि मोठमोठे तत्त्वज्ञानीहि माथा डोलवीत.  तेथें जमा होणार्‍या इतर विलासिनीहि आलेल्या प्रतिष्ठितांची करमणूक करीत.  सॉक्रे़टीस अस्पाशियाकडे वरचेवर जाणारांपैकीं एक होता.  कितीतरी पुरुषमंडळी आपल्या बायकांना घेऊन अस्पाशियाकडे येत.  अस्पाशियाबरोबरच्या सुंदर व मार्मिक अशा चर्चा कानीं पडून आपल्या बायका जरा शहाण्या व सुसंस्कृत व्हाव्या असें त्यांच्या पतींना वाटे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel