युनायटेड स्टेट्स् म्हणजे कांहीं अद्यापि आदर्श देश नव्हे. त्यांत खूप अन्याय आहे, गोंधळ आहे, करपशन आहे, लांचलुचपत आहे, वशिलेबाजी आहे, दैन्य आहे, दुर्दशा आहे, खूप क्लेशहि आहेत. तो अद्यापि रानटीपणाच्या जंगलांतच वावरत आहे. पण त्यांतून मार्ग काढण्यासाठीं प्रेसिडेंट रुझवेल्ट प्रामाणिकपणें प्रयत्न करीत आहे. कन्फ्यूशियस किंवा मॅझिनी यांच्याइतका मोठा रुझवेल्ट नसला, तरी तो नि:संशय शूर, निर्भय व प्रामाणिक आहे व त्यानें चालविलेला सामाजिक प्रयोग बहुधा फसणार नाहीं. त्याच्यामागून कोणीहि प्रेसिडेंट होवो, त्यानें रुझवेल्टच्या पावलावर पाऊल टाकल्याशिवाय चालणार नाहीं. कारण, त्यानें अमेरिकेला सरळ सरळ मोठ्या प्रश्नास तोंड द्यावयास लावलें आहे. परिस्थितीकडे कानाडोळा करून आता भागणार नाहीं.

- ६ -

अमेरिकाच आजच्या जगाची आशा आहे. ती शांततेच्या मार्गांनीं कशी प्रगति करून घ्यावी हें शिकवीत आहे. १९४२ पर्यंत अमेरिका अज्ञात होती. राष्ट्रांच्या प्रयोगासाठीं जणूं ही चांगली टेस्ट-ट्यूब व्हावी अशी प्रभूची इच्छा असल्यामुळें ती तो बरेच दिवस तयार करीत असावा. जुनाट झालेल्या युध्दाच्या मार्गानेंच आपलीं भांडणें मिटविण्यास शिकलेले युरोपांतील लोक येथें आल्यावर आपआपले मतभेद, आपआपल्या अलग राष्ट्रीयता व आपआपलीं धार्मिक पृथक्त्वें विसरून सस्नेह सहकार्यानें नांदूं लागतात. युनायटेड स्टेट्स् हेंच पहिलें आंतरराष्ट्रीय राष्ट्र आहे. परस्परांशीं झगडणार्‍या व लढणार्‍या जातीजमातींचें एका प्रेमळ राष्ट्रकुटुंबात परिवर्तन करणें शक्य आहे हें अमेरिकेंनें प्रत्यक्ष प्रयोगानें सिध्द केलें आहे. सर्व मानवजात एक कशी हाईल या तत्त्वज्ञानी संतांपुढें सदैव उभ्या असलेल्या प्रश्नाचें-शाश्वत संशोधन चालू असलेल्या या कूटाचें-अंतिम उत्तर अमेरिकाच देईलसें दिसतें. इंग्लंडची स्वातंत्र्यप्रीति, फ्रान्सची सौंदर्यप्रीति, जर्मनीची विज्ञानभक्ति, रशियाची गूढताभक्ति, आयर्लंडचें काव्यप्रेम, इटलीचें संगीतप्रेम, आफ्रिकेची उत्कट विकारिता, नॉर्वे व स्वीडन याचें धैर्य, इंग्लंडची शान्ति, पौर्वात्यांची दिव्यतेची तहान, या सर्व गोष्टी, हे सारें सुंदर विशेष अमेरिकेच्या भट्टींत घातले जात असून त्यांतून नव्या संस्कृतीचें सुंदर सोनें निर्माण होत आहे.

आज या क्षणीं आजूबाजूस अंधार आहे, प्रतिगामी शक्ती जोरात आहेत-घोड्यावर स्वार आहेत. जग आणखी एका महायुध्दाकडे खेंचलें जात आहे. पण येत्या कांहीं वर्षांत केवढीहि मोठी आपत्ति आली तरी सुध्दां ती जाईल, ती जाणारा रोग ठरेल. कारण, मानवजातीचें शरीर निरोगी आहे; ते हुकूमशाहीच्या व युध्दाच्या रोगांशीं झगडून त्यांना पिटाळून लावील. मानवजात पूर्ण निरोगी होईल. तिला हे रोग पुन: जडणार नाहींत. मानवजात अपार व अनंत चुका-घोडचुका-करते हं तर खरेंच; पण तिला न्यायाचीहि शाश्वत भूक आहे. गटेच्या फॉस्टप्रमाणें ती चुका करून शिकत आहे. ती कितीहि मूर्ख, रानटी, जंगली, दांभिक, युध्दप्रिय, असहिष्णु, स्वार्थी व मुत्सद्दी असली तरी अंत:प्रेरणेनेंच जणूं प्रकाशाकडे जात आहे. तिला प्रकाशाकडे जाण्याची इन्स्टिंक्ट (उपजतबुध्दि) आहेच. अमेरिका तिची मार्गदर्शक आहे असें दिसतें. अमेरिकेंतील सामाजिक लोकसत्ता एकादे दिवशीं सर्व जगाचें सामाजिक लोकशाहींत परिवर्तन करील, सर्व जगाला सामाजिक लोकशाहीकडे नेईल.

समाप्त

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय