वाङ्मयांतच विलीन होऊं लागल्यामुळें लष्करी कर्तव्यांत व शिस्तींत त्याचें नीट लक्ष नसे. तो निर्मितीचा भक्त होता, विनाशाचा नव्हता. जरी त्याला अद्यापि लष्करी गणवेषाचा अभिमान वाटत होता, जरी तीं सुंदर पदकें व चकचकीत बटणें त्याला आवडत, तरी युध्दाचें खरें स्वरूप त्याच्या लक्षांत येऊं लागलें होतें. वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यानें 'स्वारी' ही कादंबरी लिहिली--लष्करशाहीविरुध्द त्यानें केलेली ही पहिली निर्भय घोषणा. तींत तो लिहितो, ''या जगांत शांततेनें राहणें अशक्यच आहे काय ? हें जग किती सुंदर आहे ! वर अनंत तारांकित आकाश ! असें सुंदर आकाश व अशी रमणीय धरणी यांच्यामध्यें राहून या मानवांच्या मनांत व्देष व मत्सर राहतात तरी कसे ? आपल्याच भावांना ठार करावें, त्यांचा सूड घ्यावा, असें यांना वाटतें तरी कसें ? निसर्गाचा स्पर्श होतांच खरोखरीं मानवी हृदयांतील सारी दुष्टता, सारी कटुता, वितळून जावी, अदृश्य व्हावी. 'सत्यं-शिवं-सुन्दरम्' चें अत्यंत जवळचें रूप, त्याचा साक्षात्कार म्हणजे हें निसर्ग-दर्शन होय. त्यानें आपण स्वत: नको का प्रेमळ व सुंदर व्हावयाला--निष्पाप व निर्मळ व्हावयाला ?''
अद्यापि त्यानें प्रत्यक्ष युध्द पाहिलें नव्हतें. लुटुपुटीच्या लढाया व हालचालीच त्यानें पाहिल्या होत्या. युध्दाचें प्रतिबिंब, युध्दाची नक्कल त्यानें पाहिली असली तरी अस्सल युध्द त्यानें पाहिलें नव्हतें, तें पाहण्याची वेळ आली. १८५३ सालीं रशियानें तुर्कस्तानविरुध्द युध्द पुकारलें. 'झारच्या महान् वैभवासाठीं तुम्हीहि आपणांस करतां येईल तें थोडेंफार करा', असें टॉल्स्टॉयला सांगण्यांत आलें. प्रथम देशभक्तीच्या भावनेनें तोहि वाहवून गेला. इतर रशियन तरुणांप्रमाणें तोहि एकदम भीषण झाला, व्रूच्र झाला. त्याच्यावरून जणूं एक प्रकारची रानटी पण धार्मिक उत्साहाची लाटच गेली ! बाळपणींच्या गूढगुंजनाकडे तो पुन: वळला. तो तुर्कांना मरीत हाता व ईश्वरांशीं बोलत होता. रशियनांवर ईश्वराची कृपा होती व तुर्कांवर त्याचा कोप होता, यासाठीं तो ईश्वराची प्रार्थना करी, प्रभूचे आभार मानी. संकटकालीं देवानें आपले प्राण वांचविले म्हणून तर तो फारच कृतज्ञता प्रकट करी. युध्दाच्या एन गर्दीतहि कांहींतरी मोठ्या कामासाठीं ईश्वर आपणास वांचवीत आहे असें त्याला वाटे, असा गूढ अनुभव त्याला येई. १८५५ सालच्या मार्चच्या पांचव्या तारखेस तो डायरींत लिहितो :-
''एक महान् विचार माझ्या मनांत आला आहे. त्या विचाराच्या साक्षात्कारार्थ मी आपलें सारें जीवन देईन असें मला वाटतें. मी आपलें जीवन त्या ध्येयार्थ देऊं शकेन. कोणता हा विचार ? कोणतें हें नवीन ध्येय ? नव्या धर्माचा पाया घालण्याचा विचार मला स्पच्रला आहे.''
कोणता हा धर्म ?--अप्रतिकाराचा, आंतरराष्ट्रीय बंधुतेचा, शांततेचा. पण हा महान् विचार मनांत डोकावत असतांच एकीकडे तो तुर्कांना कंठस्नान घालीत होता. कारण, झारची तशी आज्ञा होती. पण लवकरच त्याला या खाटिकखान्याचा वीट आला. क्रिमियन युध्दाच्या काळांत त्यानें तीन पुस्तकें लिहिलीं. पाहिलें देशभक्तीनें ओतप्रोत भरलेले आहे. दुसर्यांत 'मानवां'नीं एकमेकांचा संहार करण्याबाबत तो लिहितो. पण तिसर्याच्या प्रस्तावनेंत आपल्या प्रजेला तोफांचा चारा करणार्या शास्त्यांचा त्यानें धिक्कार केला आहे.
तो युध्दाकडे जितकें जितकें अधिक पाहत राहिला, तितकें तितकें युध्दाचें अधिक यथार्थ दर्शन त्याला झालें.