- २ -

बुध्दांचें मूळचें नांव शाक्यमुनि सिध्दार्थ.  शाक्य कुळांत त्यांचा जन्म झाला.  हिमालयाच्या छायेखालीं उत्तर हिंदुस्थानच्या एका भागांत त्यांचा जन्म झाला.  लहानपणीं त्या हिमालयाकडे त्यांनीं अनेकदां पाहिलें असेल.  बर्फाचीं पांढरीं शुभ्र पागोटीं घालून शांतपणें उभ्या असलेल्या महाकाय देवांच्या जणूं मूर्तीच अशीं तीं हिमालयाचीं शिखरें बुध्दांना आकृष्ट केल्याशिवाय कशीं राहिलीं असतील ?  हिमालयाचीं तीं उत्तुंग धवल शिखरें खालच्या मुलांचे चाललेले खेळ मोठ्या करुणेनें पहात असतील व म्हणत असतील, 'किती पोरकट यांचे हे पोरखेळ !'

बुध्दांचा पिता शाक्य जातीचा राजा होता.  राजवाड्यांत सुखोपभोगांत हा बाळ वाढला.  बुध्द अत्यंत सुंदर होते.  राजवाड्यांतील महिलांचा तो आवडता असे.  राज्यांत भांडणें नव्हती.  लढाया व कारस्थानें नव्हतीं.  खाणेंपिणें, गाणें, शिकार करणें, प्रेम करणें, मजा करणें म्हणजेच जीवन.  वाटलें तर स्वप्नसृष्टींत रमावें.  हिंदूंसारखे स्वप्नसृष्टींत रमणारे दुसरे लोक क्वचित्च असतील.  एकोणिसाव्या वर्षी गौतमाचें लग्न झालें.  पत्नीचें नांव यशोधरा.  सुखाचें गोड असें सांसारिक जीवन सुरू झालें.  कशाचा तोटा नव्हता.  एकाद्या पर्‍यांच्या गोष्टींतील राजाराणीप्रमाणें दोघें स्वप्नसृष्टींत जणूं रंगलीं.  मानव जातीपासून जणूं तीं दूर गेलीं.  अशीं दहा वर्षे गेलीं.  अद्याप मूलबाळ नव्हतें. तीच काय ती उणीव होती.  गौतम सचिंत झाला.  ईश्वरानें सारें दिलें.  परंतु मुलाची सर्वोत्तम देणगी त्यानें कां बरें दिली नाहीं असें त्याच्या मनांत येई.  अत्यंत सुखी अशा जीवनांतहि विफळ आशा कां बरें असाव्या ?  दुधांत मिठाचे खडे कां पाडावे ? हें जीवन जगण्याच्या लायकीचें तरी आहे का ?

एके दिवशीं रथांत बसून तो हिंडायला बाहेर पडला होता.  सारथी छन्न बरोबर होता.  रस्त्यावर एक जीर्णशीर्ण म्हातारा मनुष्य त्यांना आढळला.  त्याचें शरीर गलित झालें होतें.  जणूं सडून जाण्याच्या बेतांत होतें.  त्याचा सारथी म्हणाला, 'प्रभो, जीवन हें असेंच आहे.  आपणां सर्वांची शेवटी हीच दशा व्हायची आहे.'

पुढें एकदां एक रोगग्रस्त भिकारी त्यांना आढळला.  सारथी म्हणाला. ''हें जीवन असेंच आहे.  येथें नाना रोग आहेत.''

गौतम विचारमग्न झाला.  इतक्यांत न पुरलेलें असें एक प्रेत दिसलें.  तें प्रेत सुजलेलें होतें, विवर्ण झालें होतें.  घाणीवर माशांचे थवे बसावे त्याप्रमाणें त्या प्रेताभोंवतीं माशा घोंघावत होत्या.  सारथी छन्न म्हणाला, 'जीवनाचा शेवट असा होत असतो.'

इतके दिवस गौतम राजवाड्यांतील सुखांत रंगलेला होता.  अशीं दु:खद दृश्यें त्यानें पाहिलीं नव्हतीं.  परंतु आज जीवनांतील सारे दु:खक्लेश त्यानें प्रत्यक्ष पाहिले.  या जीवनाची शेवटीं चिमूटभर राख व्हायची हें त्यानें जाणलें.  जीवनाचा हा केवढा अपमान !  सार्‍या खटाटोपांची का अशीच इतिश्री व्हायची ?  त्या ज्यू प्रेषितांप्रमाणें बुध्दांनींहि निश्चय केला.  मानवी दु:खावर उपाय शोधून काढण्याचें त्यांनीं ठरविलें.  ज्यू धर्मात्मे 'मनुष्य प्राणी मूर्ख आहे' म्हणून ओरडत होते.  परंतु बुध्द एक पाऊल पुढें गेले.  ईश्वराच्या दुष्टपणाविरुध्द बुध्दांनीं बंड आरंभिलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय