लोकांची अशी समजूत आहे कीं, क्वेकर भितुरडे असतात. शांतीचा प्रचार करणार्‍या दुबळ्यांचा हा संघ. झगडण्याची भीति वाटत असल्यामुळें हे जीवनांत प्रत्यक्ष भाग घेण्याला भितात; पण वस्तुस्थिती अगदीं वेगळी आहे. क्वेकरांचा इतिहास हा जगांतील अत्यंत रोमहर्षण इतिहास होय. जॉर्ज फॉक्स व कायदा न मानणारे त्याचे सैनिक प्रत्यक्ष-क्रियात्मक प्रतिकाराचे पुरस्कर्ते होते. ते मवाळ किंवा क्रियाशून्य प्रतिकाराचे पुरस्कर्ते नव्हते. सर्व प्रकारच्या अन्यायांशीं-वाईट गोष्टींशीं-झगडण्याचा उपदेश ते निर्भयपणें करीत. ते प्रथम चढाई करीत व शत्रूच्या गोटाला जाऊन भिडत. उपवास, कैद, अत्याचार, मरण, कशाचीहि त्याना भीति वाअत नसे-ते राजासमोरहि कधीं टोपी काढीत नसत. राजांच्या डामडौलाचा त्यांना तिटकारा वा़टे गुलामांना मुक्त करा असें ते जगांतल्या गुलामांच्या धन्यांना ***, धर्मोपदेशकांच्या उध्दटपणाबद्दल त्यांची हजेरी घेत, अन्याय करणार्‍या न्यायाधीशांची कानउघडणी करीत. युध्द सुरू असतांहि सैनिकांस शस्त्रें खालीं ठेवावयास सांगण्याला ते कचरत नसत.

तो एकदां ''तुम्ही माणुसकी दाखवा, दया व प्रेम दाखवा, माणसांसारखे वागा'' असा उपदेश करीत असतां एकानें त्याच्या तोंडावर ठोसा मारला, तरी रक्त पुसून फॉक्सनें आपलें प्रवचन पुढें चालू केलें. त्यानें उलट कधींहि मारलें नाहीं. स्वत:च्या लढाचा लढण्याचें त्याच्याजवळचें अधिक प्रभावी हत्यार म्हणजे बुध्दि. न्याय्य गोष्ट पटवून देण्याची तो पराकाष्ठा करी. एकदां तर त्याला गुंडांनीं खालीं पाडून लाथांखालीं इतकें तुडविलें कीं, शेवटीं तो मूर्छित झाला. पण शुध्दीवर येतांच उभा राहून व हात पसरून तो म्हणाला, ''या, मारा. हे बघा माझे हात, हें माझें डोकें, हे माझे गाल. हाणा, मारा.'' तेव्हां एका धर्माहू गवंड्यानें आपल्या हातांतल्या फिरावयाच्या वेळीं नेण्याच्या काठीनें खरोखरच त्याला चांगलें झोडपून काढलें ! या गुंडांवर कायदेशीर इलाज करण्याचा त्याला देण्यांत आलेला सल्ला त्यानें मानला नाहीं. तो म्हणे, ''माझें काय त्यांच्याशीं भांडण आहे, का वैयक्तिक हेवादेवा आहे ? मी सर्वांच्या स्वातंत्र्यासाठीं लढत आहे. जगाच्या स्वातंत्र्याच्या या विश्वव्यापी लढाईंत माझ्या जीवनाची काय मातब्बरी ! प्रभूनें माझ्यावर हल्ला करणार्‍यांस क्षमा केली असतां मी त्यांच्या बाबतींत कां त्रास घ्यावा ?''

आणि यानंतर तो शांतीचा-युध्दविरोधाचा-प्रचार सर्वत्र करूं लागल्यामुळें त्याला तुरुंगांत घालण्यांत आलें. तेव्हांपासून त्याचें सारें आयुष्य तुरुंग व प्रचार यांतच विभागलें गेलें. तुरुंगांतून सुटतांच प्रचार, कीं पुन: तुरुंगवास, असें सारखें सुरू होतें. मानवांवर प्रेम करण्याच्या गुन्ह्यासाठीं त्याला तुरुंगवासाची शिक्षा मिळाली. तो ज्या कोठडींत होता, तिचें वर्णन त्यानें पुढीलप्रमाणें केलें आहे :-

''मला उंच टॉवरमध्यें ठेवण्यांत आलें होतें. दुसर्‍या कैद्यांच्या कोठड्यांतला सारा धूर तेथें येई. धुक्याप्रमाणें दाट येणारा तो धूर जणूं भिंतींवर चिकटून बसे. तीन कुलुपांच्या आंत मला कोंडण्यांत येत असे. धूर फार झाला तरी वरचा एकादा दरवाजा उघडण्यासाठींहि दुय्यम जेलर येत नसे. आपण धुरांत गुदमरून जाऊं असेंच जणूं त्याला वाटत असावें ! शिवाय माझ्या अंथरुणावर गळतहि असे. कधीं बाहेर थंडी असे, कधीं पाऊस पडत असे. गळूं नये म्हणून व्यवस्था करावयाला मी गेलों कीं माझा सदरा भिजून ओलाचिंब होऊन जाई. सर्व हिंवाळा पडून राहण्यांत गेला. थंडीनें मी गारठून जात असें; माझी उपासमारहि होत असे. माझ्या शरीराला सूज आली, अवयव बधिर होऊन गेले !''

आयुष्याचा बराचसा भाग जॉर्ज फॉक्सला अशा प्रकारच्या तुरुंगांत काढावा लागला. पापभीरूं व ईश्वरभीरू इंग्रज लोक कैद्यांपेक्षां आपल्या कुत्र्यांचीच काळजी अधिक घेत. जॉर्ज फॉक्सची मुक्तता होणें शक्य असल्यास त्याच्याऐवजीं तुरुंगांत पडण्यास-स्वातंत्र्य गमावण्यास-किती तरी क्वेकर-बंधू तयार होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय