त्याचें कौटुंबिक जीवन सुखाचें नव्हतें. तें वादळी होतें. दुसर्यांच्या बायकांजवळ तो यशस्वी होई, पण स्वत:च्या पत्नीच्या बाबतींत तो अपेशी होता. दुसर्यांच्या बायकांच्या बाबतींत तो वुइल्यम दि काँकरर असला तरी त्याच्या स्वत:च्या घरीं मात्र निराळीच परिस्थिती होती. मरेपर्यंत त्याची पत्नी त्याला सतावीत होती. त्यानें आपल्या मृत्युपत्रांत तिला केवळ आपला एक भिकार बिछाना—चांगला होता तो मात्र नव्हे हो ! —ठेवला.
थोडक्यांत त्याची जीवनकथा ही अशी आहे. पण या हकीकतीनें त्याच्या मनाचा थांग लावून घेण्यास प्रकाश मिळत नाहीं. मनुष्य या दृष्टीनें त्याच्याच नाट्यसृष्टींतल्या कॅलिबन नांवाच्या पात्राहून फार फार तर थोड्या उच्च दर्जाचा तो होता असें म्हणतां येईल. कॅलिबन हा अत्यंत क्षुद्र वृत्तीचा व क्षुद्र वासना विकारांत लडबडलेला असा दाखविण्यांत आला आहे. पण मानवजातीचा शिक्षक या दृष्टीनें आपण त्याच्याकडे पाहिल्यास तो पृथ्वीवरचा नसून स्वर्गांतील आहे असें वाटतें. तो अतिमानुष वाटतो. क्षुद्र मनाच्या या मानवांत तो चुकून जन्माला आला असावा असें वाटतें.
जगांतील अत्यंत प्रतिभासंपन्न प्रज्ञावंतांनीं शेक्सपिअरच्या बुध्दीचें मोजमाप करण्याची खटपट केली, त्याची विचारसृष्टि तर्कदृष्टीनें मांडून दाखविण्याची त्यांनीं पराकाष्ठां केली, पण तो खटाटोप यशस्वी झाला नाहीं. टीकाकार त्याला रोमन कॅथॉलिक म्हणतात. कोणी त्याला नास्तिक म्हणतात, कोणी देशभक्त मानतात, तर कोणी युध्दविरोधक मानतात. कोणी त्याला प्रवचनकार समजतात, तर कोणी त्याला सिनिक म्हणजे कशांतच अर्थ नाहीं असें म्हणणारा मानतात. कोणी त्याला मानव्यवादी म्हणतात, तर कोणी संशयात्मा म्हणतात. कोणी त्याला राजांचा बडेजाव करणारा म्हणतात, तर कोणी त्याला स्वप्नसृष्टींत रमणारा लोकशाहीचा पुरस्कर्ता मानतात. वस्तुत: तो यापैकीं कांहीच नव्हता; पण असें असूनहि तो सारें काहीं होता असें विरोधाभासानें म्हणावें लागतें ! कोणाहि एका मनुष्याचे वा मानवसंघाचे जे विचार अगर त्याच्या ज्या कल्पना असूं शकतील त्यांच्यापलीकडे शेक्सपिअरचे विचार व कल्पना जात. तो विचार-सिंधु होता, कल्पनाविश्वंभर होता. तो जें जें पात्र निर्मी, त्याच्या त्याच्या जीवनांशीं तो तितक्याच प्रेमानें व सहानुभूतीनें जिळून जाई. कॅलिबाशीं तो जितका एकरूप होई, तितकाच प्रॉस्पेरोशींहि. शेक्सपिअरची मनोबुध्दि मानवजातीच्या मनोबुध्दीला व्यापून राहिलेली होती. तिजशीं एकरूप झाली होती.
शेक्सपिअरचें पृथक्करण करण्याचा प्रयत्न मी करणार नाहीं किंवा त्याची विचारसृष्टि विवरूनहि सांगणार नाहीं. कारण, असा प्रयत्न करणें निरुपयोगी आहे. पण मी त्याच्या विशाल मनोभूमीच्या कोंपर्यांत शिरून पाहणार आहें. त्याच्या अनंत बुध्दीच्या सागरांत बुडी मारून पेलाभर शहाणपण मिळालें तर मी आणणार आहें.
या दृष्टीनें शेक्सपिअरच्या तीन नाटकांकडे आपण जरा नजर टाकूं या. पहिल्या नाटकांत तो उपहास करणारा दिसतो, दुसर्यांत केवळ ऐहिक दृष्टीचा दिसतो, तिसर्यांत तत्त्वज्ञानी दिसतो. कोणतीं बरें हीं तीन नाटकें ? १ टिमॉन ऑफ अथेन्स, २ हॅम्लेट, ३ टेंपेस्ट.
- २ -
टिमॉन ऑफ अथेन्स या नाटकांत एकाद्या ज्यू प्रेषिताप्रमाणें जगांतील अन्यायांविरुध्द तो गर्जना करतो व शिव्याशाप देतो. दुसर्या नाटकांत तो फक्त जीवनाचें प्रतिबिंब दाखवितो, नीतीचे पाठ देत बसत नाहीं. जेव्हां कधीं त्या वेगानें जाणार्या नाट्यक्रियेंत मध्येंच क्षणभर जीवनांतील टीकेचें एकादें वाक्य उच्चारण्यासाठीं तो थांबतो, तेव्हां जणूं काय दुसर्या एकाद्या गोलावरून उतरलेल्या माणसाप्रमाणें या जगाला क्षुद्र व तुच्छ समजून तो फेंकून देतो ! या जगाला तो फार महत्त्व देत नाहीं. हें जग म्हणजे मूर्खांची कथा, फुकट आदळआपट व आरडाओरड, निरर्थक पसारा असें म्हणून तो निघून जातो. पण या 'टिमॉन ऑफ अथेन्स' नाटकांत जगाबद्दलचा त्याचा तिरस्कार क्रोध-ज्वालेंत परिणत झालेला दिसतो. जीवन ही मूर्खानें नव्हे तर कपटपटु सैतानानें सांगितलेली कथा असें येथें वाटतें. आणि जग निरर्थक न वाटतां द्रोह, नीचता, द्वेष दंभ, कपट, यांनीं भरलेलें दिसतें. टिमॉन हा अथेन्समधील एक श्रीमंत मनुष्य आहे. तो उदारपणामुळें आपली सर्व संपत्ति मित्रांना वांटून टाकतो. त्यांना तो कधीं नाहीं म्हणत नाहीं. मित्रांना त्यांच्या सावकारांचा तगादा लागला कीं तो त्यांचें कर्ज फेडून टाकी, मित्रांचीं लग्नें होत तेव्हां त्यांना आंदण देई, त्याचा नवा संसार मांडून देई, तो त्यांना मेजवानीस बोलावी व जातांना देणग्या देई, हिरेमोती देई. त्याचा कारभारी फ्लेव्हियस 'हें औदार्य अखेर तुम्हांला धुळीला मिळवील' असें सांगतो; पण आपली संपत्ति संपणार नाहीं व आपले मित्र कृतज्ञ राहतील असें टिमॉनला वाटतें. फ्लॅव्हियसच्या सांगण्याकडे तो लक्ष देत नाहीं व शेवटची दिडकी संपेपर्यंत दुसर्यांना देतच राहतो.