प्रकरण ८ वें
अधिक चांगल्या जगाचें स्वप्न खेळविणारा प्लेटो
- १ -
इतिहासकारांनीं युध्दांतील विजयांवर फार भर दिला आहे. परंतु संस्कृतीची गति पाहिली कीं युध्दांतील विजयांत वैभव नाहीं आणि पराजयांत लज्जास्पद असें कांही नाहीं ही गोष्ट दिसून येईल. संस्कृतीच्या विकासाचा व वाढीचा युध्दांतील जयापजयाशीं कांहींहि संबंध नाहीं. एकाद्या राष्ट्राला किंवा शहराला मोठेपणा मिळविण्यासाठीं युध्दांतील विजयाचीच आवश्यकता असते असें नाहीं. स्पार्टानें पेलापोनेशियन युध्दांत विजय मिळविला, परंतु त्यामुळें स्पार्टाचें महत्त्व वाढलें नाहीं. त्याची कीर्ति वाढली नाहीं. स्पार्टन लोक अज्ञात व रानटी राहिले. अथेन्सचा त्या लढाईंत पराजय झाला, परंतु मानवी प्रगतीचें निशाण हातीं घेऊन अथेन्सच पुढें सरसारवलें.
विजयाची पूजा करणार्या मानवजातीच्या शिक्षकांना ह्या ऐतिहासिक गोष्टीचा सहज कसा विसर पडला कोणास ठाऊक ! विजयाची स्तोत्रें गाणार्या या लोकांना आठवण करून देण्याची जरूरी आहे कीं, प्लेटो व अॅरिस्टॉटल ह्या ग्रीक इतिहासांतील अलौकिक बुध्दीच्या विभूती पराभूत राष्ट्राच्याच नागरिक होत्या.
- २ -
ख्रि.पू. ४२७ मध्यें प्लेटोचा जन्म झाला. पेरिक्लीसच्या मरणानंतर एक वर्षानें तो जन्मला. गटेप्रमाणें प्लेटोलाहि ईश्वरानें सर्व प्रकारच्या देणग्या दिल्या होत्या. कोणतीहि उणीव नव्हती. सुखी आईबाप, सुंदर शरीर, निरोगीनिकोप मन, आरोग्य, सारें त्याच्याजवळ होतें. प्लेटो या शब्दाचा अर्थ रुंद खांद्यांचा. तो होताच तसा. पेलापोनेशियन लढाईच्या धुमश्चक्रीच्या काळांत तो लहानाचा मोठा होत होता. त्याला प्रारंभी लष्करी पेशा आवडला. परंतु वयाच्या विसाव्या वर्षी सॉक्रे़टिसाची व त्याची गांठ पडली. साक्रे़टिसाचा प्रभाव त्याच्यावर पडला आणि युध्दाचा धंदा सोडून तो ज्ञानोपासनेकडे वळला.
त्या दिवसापासून सॉक्रे़टिसाच्या मरणापर्यंत तो त्याचा शिष्य होता. सॉक्रे़टिसाच्या अवतींभवतीं असणार्या तरुण बुध्दिमंतांच्या मेळाव्यांत तोहि शिरला. हे सारे तरुण कधीं सॉक्रे़टिसाबरोबर जात, तर कधीं त्याला आपापल्या घरीं ते बोलावीत. तेथें मग विचार-भोजनाची मोठी मौज असे. अथेन्समधील मी मी म्हणणारे तत्त्वज्ञ व पंडित तेथें गोळा होत. सॉक्रे़टीस त्या सर्वांना वादविवादांत कोंडीत नेई. आणि शेवटीं आपला मूर्खपणा ते कबूल करीत. त्या चर्चा ऐकणें म्हणजे ज्ञानामृताची मधुर मेजवानी होती. सॉक्रे़टीस दिसायला कुरूप होता. परंतु वृत्तीनें तो संत होता. शांत स्वभावाचा व सौम्य वृत्तीचा तो होता. थट्टाविनोद त्याला आवडे. कधीं कधीं संस्फूर्त होऊनच जणूं तो बोले. पायांत काहीं न घालणारा हा थोर तत्त्वज्ञानी अथेन्समधील कोणासहि वादांत हटवीत असे. धंद्यानें तो शिल्पकार, मूर्तिकार होता ; परंतु बहुधा कधींहि तो तें काम करीत नसे. तिकडे त्याच्या कुटुंबीयांची उपासमार होत असे. आणि इथें तो सामाजिक न्यायावर प्रवचनें देत असे. तो स्वत:ला अत्यन्त शहाणा समजे. कारण तो म्हणे, ''मला कांही समजत नाहीं, एवढें तरी मला समजतें ; परंतु इतरांना एवढेंहि समजत नाहीं.'' त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्या तत्त्वज्ञान्यांनीं जीवनाचें कोडें सोडविण्याचा प्रयत्न केला होता. सॉक्रे़टिसाला त्यात गोडी नव्हती. तो म्हणे, ''जग जाणण्याची हिंमत नका धरूं. तो अहंकार आहे. तुम्हीं स्वत:ला समजून घेतलें तरी पुष्कळ होईल.''